मला तूच शोधीत ये ना कधी..

जुन्या सावकारी ऋणासारखा
कसा जीवना तू उणा सारखा

विसरलाच जाणार मीही उद्या
शकासारखा वा हुणासारखा

जरी सत्य आले पुरासारखे
उभा ठाकलो मी तृणासारखा

अशी कागदा नाळ तोडू नको
इथे शब्द माझा भ्रुणासारखा

मला तूच शोधीत ये ना कधी
तुझ्या शोधतो मी खुणा सारखा

— अभिजीत

काय फ़रक पडतो…

नसेल कोणी तुझ्याबरोबर, काय फ़रक पडतो
कोणी नंतर कुणी अगोदर, काय फ़रक पडतो

तुझ्या रथाचा लगाम त्याच्या हाती आहे ना
उभे ठाकले समोर शंभर, काय फ़रक पडतो

वस्त्राने नग्नता मनाची कुठे झाकते रे
तुझे भरजरी माझे लक्तर, काय फ़रक पडतो

फुले मिळावी म्हणून केली बरीच धडपड पण
नशिबामध्ये होते अत्तर, काय फ़रक पडतो

काळा, गोरा, कुरुप, सावळा तुमच्या लेखी मी
आईच्या नजरेने सुंदर काय फ़रक पडतो

क्षणाक्षणाला जगण्यावरती सवाल करती ते
मग मी देतो इतके उत्तर, काय फ़रक पडतो

— अभिजीत दाते