वाजले की तीन तेरा..!

लॉकडाऊनच्या मुहूर्तावर, कोरोनासुरमर्दीनी लसीला वंदन करून आणि रवी जाधव, गुरु ठाकूर, अजय अतुल, बेला शेंडे, अमृता खानविलकर आदींची माफी मागून सादर करीत आहोत आमच्या आगाऊ ‘लसरंग’ चित्रपटातील लावणी खास आपल्यासाठी –

वाजले की तीन तेरा..!

कोरोनाची नवी लाट
आता आलिया भरात
रोग वय, धर्म, जात
काही पाहीना…
कदी कवा कुटं कसा
कोरोना हा होतो असा
पैसा जातो भसाभसा
जीव ऱ्हाईना…

राखली की मर्जी तुमच्या जोडीनं नं मी आले..
कुंभमेळ्यात शाही स्नानात, चिंब ओली मी झाले…

राया सोडा आता तरी,
पोलिस नाक्यानाक्यावरी
दंडुक्याचा मार भारी साजणा..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

पुतनेवानी रुप झालं, गेले होते कधी पार्लरात
खुळावले किती दीस क्वारंटाईन केलं घरात
भवताली घोळ घाली मारामारी ही केंद्र राज्याची
नको घाई बघा बाई हाय नजर कुण्या वाझ्याची

नारी गं रानी गं हाय नजर कुण्या वाझ्याची

विकली शेती , मोडली एफडी,
पैका केला गोळा
स्विगी, अनबॉक्स, झोमॅटो खाऊन
गादीवरती लोळा

आता कुठवर झाकू, पैसा कुठवर राखू
एक भिशी मला माझी राहू द्या

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!
कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली..

लाखामदी बिल आलं, झाली उधारी खात्याखात्यात
काय होळी काय दिवाळी रंग फटाका कुठं घरात
बंद सारं, उघडे बार
शेअर मार्केट बी पुढं पळंना
आडोशाच्या दुकानाचं
कसं गुपित राखू कळंना..

नारी गं रानी गं कसं गुपित राखू कळंना..

इंस्टाग्रामवर डौल माझा
फेसबुकावर तोरा
फार्मसिस्टच्या ओळखीत आणली
रेमडेसिवीर सोळा’,
हवी आहे गुटखा बिडी, तरी कळ काढा थोडी
तलफ आताची ही पुढे जाऊ द्या..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

– अभिजीत दाते
(आवडल्यास नावासहित पुढे पाठवायला हरकत नाही)

आज सोशल डिस्टन्सिंग पाळतो हरी

सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी यांची माफी मागून एक लॉकडाऊन स्पेशल विडंबन

आज सोशल डिस्टन्सिंग पाळतो हरी
राधिके, जरा अजून थांब तू घरी ॥धृ.॥

तो तिथे हवालदार वाट रोखतो
पास दाविल्याविना पुढे न सोडतो
आर्जवे करुनही मुळी न ऐकतो
सांगते अजूनही तुला परोपरी ॥१॥

सांग श्याम मंडईत काय जाहले
मास्क घातल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास लाठीमार मार लागले
एकटीच वाचशील काय तू तरी ॥२॥

तो घरीच महाभारतात रंगला
वेबमालिकांसवे खुशाल दंगला
तो पहा पुनश्च लॉकडाऊन वाढला
काम कर घरुन पण म्हणेल नोकरी ॥३॥

मूळ गीत – आज गोकुळात रंग खेळतो हरी

का रे कोरोना

(गदिमा, सुधीर फडके आणि आशाताईंची माफी मागून हे कोरोना विडंबन)  

का रे कोरोना, का रे इबोला
अपराध माझा असा काय झाला
का रे कोरोना

घरी सर्व कामे मला एकटीला
कुणी ना विचारी येई सोबतीला
होम क्वारंटाईन तू वेगळ्या दिशेला  
अपराध माझा असा काय झाला

मास्कवाचुनी मी कुठे जात नाही
सोशल डिस्टंसिंग रे हळू बोल काही
हात साबणाने घेई धुण्याला  
अपराध माझा असा काय झाला

चार मे असावा असे रोज वाटे
हेच स्वप्न यावे पहाटे पहाटे
नको पाहणे हे पुन्हा भाषणाला
अपराध माझा असा काय झाला  

अभिजीत दाते

एकदा तरी …

एकदा तरी…

करेन वादग्रस्तसे विधान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

सदैव भालदार चोपदार का रहायचे
बनेन नाटकात या प्रधान एकदा तरी

तुला स्मरून काव्य रोज धाडले तुझ्याकडे
बघायचेस कागदी विमान एकदा तरी

उधार देत देत मी दिवाळखोर जाहलो
नफ्यात चालवेन का दुकान एकदा तरी

किती भकार अन् किती फुल्या फुल्या लिहायच्या
जपून वापरायची जबान एकदा तरी

चुना, लवंग कात टाकुनी तयार जाहले
खुशाल पिंक मार खाच पान एकदा तरी

कशास नेहमीच बाँड, बॅटमॅन पाहिजे
बघायचा उगीच शक्तिमान एकदा तरी

उमटवून मी किती बूटास घ्यायचे तिच्या
क्युपीड, रोख तिजवरी कमान एकदा तरी

—  अभिजीत दाते

कलमाडींची लावणी..

कॉमनवेल्थच्या नावाने,
पुण्याच्या या रावाने,
कोट्यवधी पैसा आहे ओढीला,
आता नका सोडू कलमाडीला..

माहितीचा कायदा लाखमोलाचा,
लागे छडा नव्या नव्या घोळाचा, घोळाचा बाई घोळाचा
तिहारात धाडू  राजा, चव्हाणही जोडीला
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..

जागी झाली जनता आलं लक्षात जी लक्षात
राहिला ना वाली कुणी पक्षात जी पक्षात
भोकं लागली पडाया ‘युपीए’ च्या होडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..

लाज थोडी ठेवा  जनामनाची,
तोड काही काढा काळ्या धनाची, धनाची बाई धनाची
लगाम घाला की जरा करप्शनच्या घोडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..

—  अभिजीत दाते

मूळ गीत — रेशमाच्या रेघांनी
कवयित्री  – शांता शेळके
प्रेरणा     – कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडींना झालेली अटक

लादेन म्हणतो चेपेन चेपेन, दाऊद म्हणतो चेपेन चेपेन.

सूचना – विडंबनातील नावाचे अगर व्यक्तींचे कुणाशी साधर्म्य असल्यास तो योगयोग समजू नये.

(संदीप – सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची माफी मागून)

लादेन म्हणतो चेपेन चेपेन, दाऊद म्हणतो चेपेन चेपेन.
न्याय खोटा, कोर्टं खोटी, कायदाच म्हणतो चेपेन चेपेन..!

हल्ला होतो अतिरेक्यांचा मंत्री बदलत बसतो सूट
दिल्लीवरुनी येता कोणी उचलत बसतो त्याचे बूट
बूट म्हणाले मंत्र्याला आणिक त्याच्या संत्र्याला
सुटला नाही ‘बुश’सुद्धा डावा, उजवा फेकेन फेकेन..!

‘कमळा’ नाही सुगंध उरला, ‘पंजा’ देतो नुसतीच थाप
‘इंजिन’ पळते मारित शिट्ट्या, घोळामध्ये ‘घड्याळ – चाप’
महाराष्ट्राची धरती रे
परप्रांताची भरती रे
अबू चालवे सायकल सायकल, लालू धरतो लालटेन लालटेन..!

मी बापूंना मारुन डोळा, भरतो माझा पेला रे.
जो प्याला तो मेला, जो ना प्याला तोहि मेला रे.
महागाईने फुटता घाम,
जेवण सोडा, घ्यावा जाम,
गव्हापासून दारू दारू, ज्वारीपासून शँपेन शँपेन..!

नुसते सोसत राहण्याची या जगण्यालाही हॅबिट रे,
एसेमेसवर जिंकते कासव, जाणून चुकले रॅबिट रे,
थकलो मी जरी दमलो मी,
शर्यतीत या रमलो मी,
मेंदू म्हणतो थांबा थांबा, मन म्हणतं धावेन धावेन..!

— अभिजीत दाते

मूळ कविता – साहेब म्हणतो चेपेन चेपेन
कवी – संदीप खरे

अग्गं बाई, बग बाई..!

(संदीप – सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची माफी मागून)

अग्गं बाई, बग बाई,
अग्गं बाई, बग बाई,
अग्गं बाई, बग बाई लागली कळ.
रिलीजला डिफेक्टची केवढी झळ.
थोडी न थोडकी “लागली” फार.
ऑफिसमधेच आता वीकएंडचे वार
अग्गं बाई, बग बाई.
अग्गं बाई, बग बाई

ऑटोमेशन स्क्रिप्ट चाले सो सो सूम..
ढोल्या ढोल्या कोडात ढूम ढूम ढूम..
टी एल बाई उगाचच तोर्‍यामधे खडी,
पी एम च्या जीवावर प्रोजेक्टची उडी.
अग्गं बाई, बग बाई..
अग्गं बाई, बग बाई..

क्वालिटी सेंटरचे उघडून दार
आर अँड डी कमेंट्सची बडबड फार
भांडायच्या ऐवजी करुया ठराव.
फिक्स बिक्स नको सीधे लाईव्ह मे जाव.
अग्गं बाई, बग बाई..
अग्गं बाई, बग बाई..

— अभिजीत दाते

मूळ गीत – अग्गोबाई ढग्गोबाई
कवी – संदीप खरे

अताशा असे हे मला काय होते..!

(संदीप-सलिलच्या चाहत्यांची क्षमा मागून)

अताशा असे हे मला काय होते.
कुण्या बारचे मद्य ओठात येते.
कसा पाहता पाहता तर्र होतो.
नशा केवढी ‘एक’ पेगात येते.

कधी वीट येतो तुझ्या श्रावणाचा.
कसा तांबडा रंग हो लोचनांचा.
नको ड्राय डे रोज यावी गटारी,
असा योग यावा सुरा प्राशण्याचा.

असा ऐकु येतो सायरनचा इशारा.
क्षणी बंद होतो कॅब्रेचा नजारा.
गटारात ज्या रोज जातो बुडोनी,
गटारास त्या मागु जातो उतारे.

अताशा असे हे मला काय होते
कुण्या बारचे मद्य ओठात येते

न बुधवार सुटले, न गुरुवार काही.
चकणे खायचे, प्यायचे फार नाही.
नको गंध निघण्या हवेच्या प्रवासा.
बडीशेप सोबत असे बारमाही.

अशी ही अवस्था कुणाला कळावी.
कुणाला पुसावी कुणी उत्तरावी.
किती बोल खातो, कारण तोल जातो.
असा तोल जाता कुणाला धरावे.

अताशा असे हे मला काय होते
कुण्या बारचे मद्य ओठात येते

— अभिजीत दाते

मूळ गीत – अताशा असे हे मला काय होते
कवी – संदीप खरे

अबू आझमीची लावणी..!

(शांता शेळके, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची क्षमा मागून)

(कालच्या विधानसभेतील प्रसंगानंतर अबू आझमी असंच काही म्हणत असावेत)

मनसेच्या कदमांनी,
आणि शिशिर शिंद्यांनी,
कानाखाली आवाज ऐसा काढीला…
हात नका लावू माझ्या दाढीला…

पर्वा केली नाही मी विनंतीची,
मतं मोठी माझ्यासाठी हिंदीची.. हिंदीची बाई हिंदीची
धावला वसंता पुढे, वांजळेही जोडीला…
हात नका लावू माझ्या दाढीला…

निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात.
चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात.
नऊ डबे अजुन बाकी “इंजिनाच्या” गाडीला…
हात नका लावू माझ्या दाढीला…

मने जिकली मराठी माणसाची,
मती गुंग झाली सेना भाजपाची… भाजपाची बाई भाजपाची
काय म्हनु दादरच्या राजा, तुमच्या कुरघोडीला…
हात नका लावू माझ्या दाढीला…

(या घटनेतून काहीतरी शहाणपण शिकुन आझमी असंअही म्हणतील अशी आशा करतो)

धन्य धन्य भाषा ज्ञाना- तुकयाची…
तीच बोली महाराष्ट्राच्या हृदयाची.. हृदयाची बाई हृदयाची…
मराठीत बोलीन मीही, हिंदीहट्ट सोडीला..!
हात नका लावू माझ्या दाढीला..!

— अभिजीत दाते

मूळ गीत — रेशमाच्या रेघांनी
कवयित्री — शांता शेळके
प्रेरणा — मनसेचा विधानसभेतील राडा

भारनियमन..!

(संदिप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांची क्षमा मागून)

एसी असता फ्रीज असता गरम होऊ लागले.
जाहले इतुकेच होते भारनियमन वाढले.

मीटरावीण सदनी त्याच्या बल्ब कैसा पेटला.
आकड्याने चोरताना काल त्याला पाहिले.

एवढे का घोळ करिसी वीज नियामक मंडळा,
तू दिलेले बिल खिशाला फार वाटू लागले.

वीज जाता बंद टीव्ही संगणकही पांगळा.
पोर ते क्रिडांगणावर खेळ मांडू लागले.

लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे.
मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले.

भर पहाटे अन दुपारी वीज काढून टाकली.
राहती इन्व्हर्टरावर, सुख तयांना लाभले.

— अभिजीत दाते

मूळ गीत – मेघ नसता वीज नसता
कवी – संदिप खरे