मला तूच शोधीत ये ना कधी..

जुन्या सावकारी ऋणासारखा
कसा जीवना तू उणा सारखा

विसरलाच जाणार मीही उद्या
शकासारखा वा हुणासारखा

जरी सत्य आले पुरासारखे
उभा ठाकलो मी तृणासारखा

अशी कागदा नाळ तोडू नको
इथे शब्द माझा भ्रुणासारखा

मला तूच शोधीत ये ना कधी
तुझ्या शोधतो मी खुणा सारखा

— अभिजीत

मनात जळते आहे एक शहर..

घराकडे पोचवतो आहे का
बघ रस्ता आठवतो आहे का

दु:खी आहे बहुधा हा जोकर
थोडा जास्त हसवतो आहे का

तास मिनिट सेकंदाचा चाबुक
काळ मला राबवतो आहे का

भेटीवेळी आला हा पाउस
भेट बघू लांबवतो आहे का

भूक तिला गाते अंगाई अन्
नाईलाज निजवतो आहे का

वाट पाहते एक रात्र हल्ली
एक दिवा मालवतो आहे का

मनात जळते आहे एक शहर
मीच फिडल वाजवतो आहे का

— अभिजीत दाते

चर्चा

रोज सवाशे कोटी चर्चा
पण अंती वांझोटी चर्चा

विसर मला मुद्द्यांचा पडतो
खास तुझी हातोटी चर्चा

प्रश्न लंगडे,बहिरे उत्तर
मुकी,आंधळी, थोटी चर्चा

भागवेल का तहान माझी
बंद नळाची तोटी चर्चा

भविष्य,बापू,स्कॅंडलनंतर
मकान, कपडा, रोटी चर्चा

वणवा होऊ शकली असती
ठरली पण शेकोटी चर्चा

— अभिजीत दाते
(०८-०५-२०१८)

अशी नियती असू दे की…

अशी नियती असू दे की
बरोबर ती असू दे की

नव्याने कोरडे होऊ
नवी भरती असू दे की

व्यथेला भाव येऊ दे
तुझी चलती असू दे की

सुखाची वेगळी व्याख्या
स्वतःपुरती असू दे की

दिव्यांच्या रोषणाईतच
जुनी पणती असू दे की

ज़री मी झिंग़लो नाही
नशा कळती असू दे की

कुणी नाही तिथे पोचू
दिशा भलती असू दे की

नभाला सोडले मागे
पुढे धरती असू दे की

पुन्हा प्रेमात माझ्या ती
खबर उडती असू दे की

— अभिजीत दाते  (३०-०९-२०१९)

कर मला ठिपका उन्हाचा..!

कर मला ठिपका उन्हाचा
भार कर हलका उन्हाचा

थेंबही नाही जमेला
का घडा फुटका उन्हाचा

हरितद्रव्या भाज भाकर
घे जरा चटका उन्हाचा

आम्र गुलमोहर असावा
खास जरिपटका उन्हाचा

चंद्र मिरवी चांदण्याला
तोडुनी लचका उन्हाचा

भर दुपारी ग्रहण झाले
केवढा विचका उन्हाचा

— अभिजीत दाते (२३/११/२०१६)

पूर्वी

फार नव्हता फरक पूर्वी
यायची पण सणक पूर्वी

शोषले कुठल्या जळूने
रक्त होते भडक पूर्वी

वाढले अंतर कशाने
हीच होती सडक पूर्वी

लाट होऊन यायची ती
व्हायचो मी खडक पूर्वी

औपचारिक होत गेली
भेट होती तडक पूर्वी

राहिले आहे पुसटसे
कोरलेले ठळक पूर्वी

मागणी होती सुखाला
मात्र नव्हती चटक पूर्वी

हरवला उत्सव कुठे तो
ज्यात होते टिळक पूर्वी

—  अभिजीत दाते
(लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाच्या २०१५ दिवाळी अंकात प्रकाशित)

 

वयासवे..

वयासवे म्हणतात मला हो निबर वगैरे तू
गाठशील तेव्हाच सुखाचे शिखर वगैरे तू

गुलाब चाफा शेवंती मोगरा माळताना
नकोस विसरु कोप-यातली तगर वगैरे तू

प्रतिष्ठापना तशी कधीची केली आहे मी
सवडीने पण बघ ह्दयाचे मखर वगैरे तू

आठवणींच्या जत्रेजागी मॉल इमोशनचे
केले मित्रा गाव मनाचे शहर वगैरे तू

बांधा, जिवणी, नजर, लाजणे पुरे जीवघेणे
खळी गालची त्यावर म्हणजे कहर वगैरे तू

शाली, स्वेटर, ब्लॅंकेटच मी पांघरतो अजुनी
ख-या उबेला दे ना आई पदर वगैरे तू

कातळ होउन रायगडाचा वीज उरावर घे
ताजमहाली हो वा संगमरवर वगैरे तू

— अभिजीत दाते

काय फ़रक पडतो…

नसेल कोणी तुझ्याबरोबर, काय फ़रक पडतो
कोणी नंतर कुणी अगोदर, काय फ़रक पडतो

तुझ्या रथाचा लगाम त्याच्या हाती आहे ना
उभे ठाकले समोर शंभर, काय फ़रक पडतो

वस्त्राने नग्नता मनाची कुठे झाकते रे
तुझे भरजरी माझे लक्तर, काय फ़रक पडतो

फुले मिळावी म्हणून केली बरीच धडपड पण
नशिबामध्ये होते अत्तर, काय फ़रक पडतो

काळा, गोरा, कुरुप, सावळा तुमच्या लेखी मी
आईच्या नजरेने सुंदर काय फ़रक पडतो

क्षणाक्षणाला जगण्यावरती सवाल करती ते
मग मी देतो इतके उत्तर, काय फ़रक पडतो

— अभिजीत दाते

राजे..

पुन्हा एकदा ती उठाठेव राजे
पुन्हा तेच हर हर महादेव राजे

जरी थाटमाटात दोन्ही जयंत्या
उद्याला कुठे आजचा चेव राजे

कुठे लुप्त झालेत बाजी वगैरे
कसे खोपड्यांचे इथे पेव राजे

लढूनी जिथे गाजला सिंह तुमचा
तिथे गाजते आमची ‘रेव’ राजे

कुठे शक्य झाले समजणे तुम्हाला
म्हणोनीच केले तुम्हा देव राजे

— अभिजीत दाते (१९/०३/२०१४ शिवजयंती)

आणखी..

नकोच माझा विषय आणखी
जरा टळू दे प्रलय आणखी

विसर तुझा पडला असता पण
जिवास नव्हती सवय आणखी

महाल नाही घरटे आहे
कुणास देउ ह्रदय आणखी

हवीहवीशी हार मिळेना
नकोनकोसे विजय आणखी

तुझ्यासवे नाव जोडलेले
हवे कोणते वलय आणखी

सजाच होती एक प्रकारे
दिलेस जेव्हा अभय आणखी

— अभिजीत