वाजले की तीन तेरा..!

लॉकडाऊनच्या मुहूर्तावर, कोरोनासुरमर्दीनी लसीला वंदन करून आणि रवी जाधव, गुरु ठाकूर, अजय अतुल, बेला शेंडे, अमृता खानविलकर आदींची माफी मागून सादर करीत आहोत आमच्या आगाऊ ‘लसरंग’ चित्रपटातील लावणी खास आपल्यासाठी –

वाजले की तीन तेरा..!

कोरोनाची नवी लाट
आता आलिया भरात
रोग वय, धर्म, जात
काही पाहीना…
कदी कवा कुटं कसा
कोरोना हा होतो असा
पैसा जातो भसाभसा
जीव ऱ्हाईना…

राखली की मर्जी तुमच्या जोडीनं नं मी आले..
कुंभमेळ्यात शाही स्नानात, चिंब ओली मी झाले…

राया सोडा आता तरी,
पोलिस नाक्यानाक्यावरी
दंडुक्याचा मार भारी साजणा..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

पुतनेवानी रुप झालं, गेले होते कधी पार्लरात
खुळावले किती दीस क्वारंटाईन केलं घरात
भवताली घोळ घाली मारामारी ही केंद्र राज्याची
नको घाई बघा बाई हाय नजर कुण्या वाझ्याची

नारी गं रानी गं हाय नजर कुण्या वाझ्याची

विकली शेती , मोडली एफडी,
पैका केला गोळा
स्विगी, अनबॉक्स, झोमॅटो खाऊन
गादीवरती लोळा

आता कुठवर झाकू, पैसा कुठवर राखू
एक भिशी मला माझी राहू द्या

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!
कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली..

लाखामदी बिल आलं, झाली उधारी खात्याखात्यात
काय होळी काय दिवाळी रंग फटाका कुठं घरात
बंद सारं, उघडे बार
शेअर मार्केट बी पुढं पळंना
आडोशाच्या दुकानाचं
कसं गुपित राखू कळंना..

नारी गं रानी गं कसं गुपित राखू कळंना..

इंस्टाग्रामवर डौल माझा
फेसबुकावर तोरा
फार्मसिस्टच्या ओळखीत आणली
रेमडेसिवीर सोळा’,
हवी आहे गुटखा बिडी, तरी कळ काढा थोडी
तलफ आताची ही पुढे जाऊ द्या..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

– अभिजीत दाते
(आवडल्यास नावासहित पुढे पाठवायला हरकत नाही)

पंचा आणि जन्मठेप..!

दोन ऑक्टोबरला भाषणं बघ..
अठठावीस मेला चर्चा बघ..
तीस जानेवारीला श्रद्धांजल्या बघ..
सव्वीस फेब्रुवारीला आदरांजल्या बघ..

साबरमतीला पिकनिक काढ.
अंदमानला सहल काढ.

रेडिओवर ‘वैष्णव जन तो’ ऐक
मोबाईलवर ‘जयोस्तुते’ ऐक

सत्याचे प्रयोग वाच.
सहा सोनेरी पानं पण वाच.

दांडीयात्रा आठव, मार्सेलिसची उडी आठव.

हवं तर यांच्या सत्याग्रहाची थट्टा कर.
त्यांच्या शुद्ध भाषेच्या आग्रहाची टिंगल कर.

आणि काहीच जमत नसेल तर यांना टकलावरून चिडवत, त्यांना माफीवीर म्हणून हिणवत
आयत्या स्वातंत्र्याचा उपभोग घे..!

पण कुणाच्याच वाटेवरून जायचा विचार करू नको,

कारण तुला पंचा मानवणार नाही आणि जन्मठेपही झेपणार नाही

— अभिजीत दाते

तुला भेटलो

नमस्कार..

गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’

प्रथमच आधी प्रसंग ठरवून आणि आधी बांधलेल्या चालीवर लिहायचा प्रयत्न केलाय.
आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर नक्की शेअर करा..

अभिजीत

रिमझिम..

बाहेर सुखाचा पाऊस कोसळत असताना,
मी मात्र एकटाच उभा होतो आडोशाला आपल्याच कोषात..

त्याच वाटेने जाणाऱ्या दुःखाने हाक मारली मला,
आणि घेतलं आपल्यासोबत एकटेपणाच्या छत्रीत;.
घेत काळजी मी भिजणार नाही याची .

एका वळणावर आली अचानक तुझ्या सोबतीची झुळूक;
उडून गेली अलगद एकटेपणाची छत्री वाऱ्यावर;
आला नात्याला सुवास मृद्गंधाचा..

आता भिजत चाललो आहोत दोघेही
दूर मनाच्या क्षितिजावर दिसणाऱ्या समाधानाच्या इंद्रधनूच्या दिशेने.

बाहेरचा पाऊस थांबलाय कधीच;
आणि अंतरात सुरु आहे रिमझिम… रिमझिम…!

अभिजीत दाते

मैत्रीच्या पावसात..

आज म्हटलं पावसाला,
“माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.
न्हाऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब..!

मित्रांची इतकी गर्दी झालीय,
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय..!”

पाऊस रिमझिम हसला.
ढगांना सोबत घेउन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला,”काळजी नको.भिजून घे खूप .
सर्दी झाली तर घे पुन्हा मैत्रीचीच ऊब..!”

–  अभिजीत दाते

‘मुंबई स्पिरिट’

१३ जुलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या बाँबस्फोटावर सुचलेल्या या ओळी…

 

चेहर्‍यावरती धैर्य मात्र आतून सतत कण्हायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?

दुःख, वेदना मला कशाला, माझं काहीच गेलं नाही
बांधव वगैरे प्रतिज्ञेपुरतं, माझं कुणीच मेलं नाही
क्षणभर गहिवर आणून नंतर शीला, मुन्नी गुणगुणायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?

अप्रेझल, विंडो सीट, फेसबुक, डेली सोप एवढाच आमचा कोष असतो
बाकी सरकार, समाज नाहीतर आपल्या बॅडलकचा दोष असतो
लालबागच्या राजाच्या रांगेत तासन् तास शिणायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?

गेले ते सुटले खरोखर, इतरांचं जगणं टळत नाही
कुत्र्याच्या मौतीसारखं मरणं तरी आम्हाला छळत नाही
आपलं थडगं आपल्या हाती आणखी किती खणायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?

फणा असुनसुद्धा आमची गांडूळ जात असली पाहिजे
कारण म्हणे सेक्युलर छबी उभ्या जगाला दिसली पाहिजे
भाबडेपणी महासत्तेचं स्वप्न आम्ही विणायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?

—    अभिजीत दाते

कलमाडींची लावणी..

कॉमनवेल्थच्या नावाने,
पुण्याच्या या रावाने,
कोट्यवधी पैसा आहे ओढीला,
आता नका सोडू कलमाडीला..

माहितीचा कायदा लाखमोलाचा,
लागे छडा नव्या नव्या घोळाचा, घोळाचा बाई घोळाचा
तिहारात धाडू  राजा, चव्हाणही जोडीला
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..

जागी झाली जनता आलं लक्षात जी लक्षात
राहिला ना वाली कुणी पक्षात जी पक्षात
भोकं लागली पडाया ‘युपीए’ च्या होडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..

लाज थोडी ठेवा  जनामनाची,
तोड काही काढा काळ्या धनाची, धनाची बाई धनाची
लगाम घाला की जरा करप्शनच्या घोडीला..
आता नका सोडू कलमाडीला..
आता नका सोडू कलमाडीला..

—  अभिजीत दाते

मूळ गीत — रेशमाच्या रेघांनी
कवयित्री  – शांता शेळके
प्रेरणा     – कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडींना झालेली अटक

स्वतःची ओळख स्वतःलाच पटत नाही तेव्हा…

स्वतःची ओळख स्वतःलाच पटत नाही तेव्हा…
मी विचारतो आरशातल्या प्रतिबिंबालाच माझा परिचय.

आरसाही म्हणतो कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय खरं..अनेक वर्षांपूर्वी.
पण आता कसलातरी थर चढल्यासारखा वाटतोय चेहर्‍यावर…

मी खरवडून काढू पाहतो पुन्हा पुन्हा चेहर्‍यावरचा संधीसाधूपणाचा मुखवटा, स्वार्थाची पुटं,
आणि उगाचच होतो रक्तबंबाळ..!

मग आरसा हसून म्हणतो,
“तू स्वतःलाच बघत आलास माझ्यात वर्षानुवर्ष, बुडून राहिलास आपल्याच कैफ़ात..

आता चेहरा खरवडणं जमत नसेल तर निदान माझ्या अंगावरचा वर्ख तरी खरवडून टाक.

मग मीही होईन पारदर्शी,
माझ्यातून आरपार जग दिसेल तुला,

आणि त्या जगातल्याच कुणाच्यातरी डोळ्यात तुला दिसेल तुझा खराखुरा चेहरा..!”

 —  अभिजीत दाते

जत्रा..!

अविनाश ओगले यांच्या “जत्रा” या सुंदर गझलेचं हे विडंबन.

 

(“वधूवर मेळावा” नावाच्या जत्रेला)
उपवर वधू वरांच्या करतात येथ जत्रा.
दोनास चार करण्या भरतात येथ जत्रा.

नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या,
वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा.

झाले ठिकाण जत्रा चेहरे न्याहाळण्याचे.
चिरडून सर्व हृदये सरतात येथ जत्रा.

वरबाप ना दयाळू हुंड्यास का कठोर,
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा.

आता पुढील वर्षी पुन्हा नवीन आशा.
स्वर्गातल्याच गाठी स्मरतात येथ जत्रा ?

—  अभिजीत दाते