हरिहर – देर गए पर दुरुस्त आए..!

DSC_0032

एप्रिल २०१५ च्या वासोटा ट्रेकनंतर ट्रेकिंगशी संबंध तुटलाच. नाही म्हणायला कॅलिफोर्नियात ट्रेल केले खरे पण त्याला सह्याद्रीतल्या ट्रेकची सर नाही.सह्याद्रीत ट्रेक करताना इतिहासपुरुष आपलं बोट धरून चालवतोय असं वाटतं.त्यामुळे भारतात परतल्यावर कधी एकदा ट्रेकला जातोय असं झालं होतं. पण काही ना काही कारणाने तारीख पे तारीख होत राहिलं. अखेर गांधी जयंतीचा मुहूर्त मिळाला.ठिकाण ठरलं हरिहर उर्फ हर्षगड..!

हरिहर आपल्या त्रिकोणी माथ्याने त्र्यंबकच्या डोंगररांगेत गोंडा घाटावर नजर ठेवून दिमाखात उभा आहे. हरिहरचं वैशिष्ट्य म्हणजे कातळात जवळजवळ सत्तर अंशात कोरलेल्या साठ मीटर उंच पायऱ्या.असं म्हणतात की या पाय-यांची भुरळ ब्रिटिश अधिकारी ब्रिग्सलाही पडली आणि तोफेच्या माऱ्याने पायऱ्या उध्वस्त करण्याचा विचार त्याने बदलला. काहीसा धोकादायक पण काळजी घेतल्यास आनंद आणि थराराची अनुभूती देणारा असा हा हरिहर. इगतपुरीपासून साधारण ४८ आणि मुंबईहून सुमारे १२१ किलोमीटर.

ट्रेक ठरल्यावर कधी जायचं कसं जायचं यावर विचारमंथन सुरु झालं. आदल्या दिवशी रात्री निघायला कुणी तयार होईना. मग सकाळी लवकर निघायचं आणि पायथ्याच्या हर्षवाडीतून वर चढायचं असं ठरवलं . साधारण तासाभराची चढाई आहे. हरिहरावर निरगुडपाड्याहूनही जाता येतं. या चढाईला दोन ते अडीच तास लागतात. नितीन, त्याचा भाऊ प्रथमेश, रोहित, शैलेश, सौरभ आणि मी अशी गॅंग जमली. सागरगडाच्या ट्रेकपासून फोर व्हिलरच्या आरामदायक प्रवासाची सवय झालेले आमचे मावळे. ट्रेन,एसटी वगैरेचा प्रवास असला की पाच सहाला हजर राहाणाऱ्या मंडळींनी निघेपर्यंत सात वाजवले. नितीन, रोहित आणि मी एका गाडीत तर प्रथमेश, सौरभ आणि शैलेश एका गाडीत असे कळव्याहून निघालो. वाटेत आसनगावाजवळ नाश्ता केला आणि कसारा-विहीगाव-खोडाळा मार्गे निघालो. कसारा घाटाच्या सुरुवातीलाच एक रस्ता विहीगावला जातो. याच रस्त्यावर विहीगावचा प्रसिद्ध अशोक धबधबा आहे. याच वाटेवर पुढे वैतरणा धरणाचं बॅकवॉटर लागतं. मग तिथे थोडं फोटोसेशन केलं आणि पुढची वाट पकडली. या वाटेला पुढे घोटी वैतरणा वाट येऊन मिळते. नाशिकहून यायचं असेल तर ही वाट सोईची आहे. ही वाट पुढे त्र्यंबकला जाते. या वाटेवरून एक कच्चा रस्ता हर्षवाडीला गेला आहे. इथपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला. अकरा वाजता पोहोचलो पण बेत ठरल्याप्रमाणे पार पडत होता. हर्षवाडीचा रस्ता दगडधोंड्यानी भरलेला आहे. एका चढावर नितीनची डिझेलभक्षक कार चढली पण प्रथमेशची सीएनजी कार प्रयत्न करूनही चढेना. शेवटी इंजिनातून धूर यायला लागला. तेव्हा तो ग्रुप मागे फिरला. पुढे गेलेले आम्ही अर्धा तास वाट बघून पुन्हा मागे आलो. नेटवर्कची बोंब असल्यामुळे काय झालं ते कळवायला मार्ग नव्हता. बऱ्याच वेळाने एकदाचा फोन लागला आणि मंडळी निरगुडपाड्याला थांबली आहेत असं कळलं. मग सगळे निरगुडपाड्याला आलो आणि तिथून किल्ल्यावर जावं असं ठरलं. पोहे खाल्ले आणि किल्ल्याच्या वाटेला लागलो तेव्हा साडेबारा वाजत आले होते. आधीच एक तास उशीर,त्यात चढाईचा एक दीड तास वाढला. टाइमटेबलाचा पार बोऱ्या वाजला. पण आता एवढे आलोच आहोत तर जाऊयाच वर असा विचार केला. रोज साडेपाचला जोरदार पाऊस होतोय तेव्हा वेळेवर उतरा असा सल्ला टपरीवरच्या मामांनी दिला. तेव्हा तीन साडेतीनला परतीचा प्रवास सुरु करायचा असं नक्की करून किल्ल्याच्या वाटेला लागलो.

IMG_0936

झपाझप पावले टाकत, वाटेत भेटेल त्याला वाट विचारत निघालो. कुठे चुकलो कुणास ठाऊक,पण आपण बऱ्याच उजवीकडे आलो आहोत असं जाणवलं. एका धबधब्याच्या माथ्यावर पोचल्यावर परत वाट शोधायला सुरुवात केली. इथून दूरवर पायऱ्या दिसत होत्या पण जाण्याची वाट सापडत नव्हती. मग डावीकडे चालत निघालो आणि थोड्या वेळाने वाट सापडली. एव्हाना उन्हाने चांगलाच घाम काढला होता. मजल दरमजल करत पाय-यांपाशी येऊन पोचलो. इथे लिंबूपाणी मिळाल्यामुळे थोडी तरतरी आली. मग पाय-यांना भिडलो. या पायऱ्या गोरखगडाची आठवण करून देतात. प्रत्येक पायरीला एक खोबण आहे जी पकडून आपण वर चढू शकतो. जसजसं वर जावं तसतशी उंचीची जाणीव होऊ लागते. नवख्या ट्रेकर्स आणि उंचीची भीती असणा-यांनी जरा काळजी घ्यावी. पहिला टप्पा  पार केल्यावर दरवाजाची कमान लागते. तिथून पुढे जाण्यासाठी डोंगराच्या पोटातून रस्ता कोरला आहे. पुढे डोंगराच्या पोटातूनच वर जाण्यासाठी पायऱ्या लागतात ज्या पेठच्या कोथळीगडाची आठवण करून देतात. भर उन्हात या पायऱ्या दमछाक करतात. अर्थात माथ्यावरचा वारा आणि समोरचा नजारा हा सगळा शीण घालवून टाकतो. समोर फणी हिल आणि ब्रह्मपर्वताचा पसारा दिसतो. हा सगळा अवकाश डोळ्यात साठवून घेतला. “राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा” असं ज्या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राचं वर्णन गोविंदाग्रज करतात त्याचं हरिहर स्वरूप अनुभवलं. खालच्या पठारावरून बघितलं की हरिहरचा माथा शिवाच्या पिंडीसारखा दिसतो आणि पाय-यांचा कातळमार्ग हरीच्या कपाळावरच्या गंधासारखा शोभून दिसतो.’हरिहर’ हे नाव अगदी पटतं. अशी कलाकृती घडवणा-या निसर्गाला,त्याला आकार देणा-या कामगारांच्या, कलाकारांच्या हातांना , त्याच्यासाठी लढणा-या सैनिकांना आणि या कलाकृतीच्या सौंदर्याचा मान ठेवणा-या ब्रिग्सच्या सौंदर्यदृष्टीलाही मनोमन दाद दिली.

IMG_6582

या सगळ्यापासून दूर, अलिप्त, निर्विकार, तटस्थ घड्याळाने चारची वेळ दाखवली आणि सगळे परत वर्तमानकाळात आलो. उशीर झाल्याची जाणीव होतीच, त्यात दुरून प्रभू रामचंद्राची सेना येताना दिसू लागली. सोबत हवेतला गारवाही वाढायला लागला होता. थोडक्यात पावसाची लक्षणं होती. तेव्हा हरिहरच्या माथ्याला भोज्या करून खाली उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. पाय-यांशी येईपर्यंत टपोरे थेंब पडायला लागले. पाय-यांकडे तोंड करून उतरताना अंदाजाने पाऊल ठेवावं लागत होतं. आधीच पाठीवरच्या सॅक्स, त्यात कड्यावर दबा धरून बसलेली वानरसेना आणि हळूहळू जोर धरू लागलेला पाऊस. चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे निसरड्या झालेल्या पाय-यांवर काही अपघात होऊ नये म्हणून काळजी घेत होतो. शैलेश एकदा घसरला होता पण लगेच त्याने स्वतः ला सावरलं. हळूहळू सर्वांनी पाय-यांचा टप्पा पार केला. तोवर पाऊसही थोडा सैलावला. मग पटापट उतरायला लागलो. वाट हरवणं सापडणं चालू होतंच,पण उतरताना त्याची तितकीशी फिकीर नसते. अखेर साडेपाचच्या सुमारास पायथ्याशी पोचलो. डांबरी सडकेशी येऊन पोचतो न पोचतो तोच मुसळधार पाऊस सुरु झाला. मागे वळून पाहिलं तर हरिहरचा माथा दिसतच नव्हता. पार पावसाळी ढगात हरवून गेला होता. उतरायला थोडा उशीर केला असता तर पावसात अडकून पडलो असतो. पावसाची काहीच तयारी सोबत नेली नव्हती. वेळेवर निघालो हे नशीब. अर्थात हरिहरचा माथा पूर्ण बघता आला नाही याची रुखरुख होतीच. असो. सर सलामत तो ट्रेक पचास.

DSC_0036

अर्धा तास कोसळल्यावर पावसाने उसंत घेतली. एव्हाना पावसात वाट काढत दुपारची टपरी गाठली होती. मग चहा घेऊन ताजेतवाने झालो आणि लगेच गाड्या मुंबईच्या दिशेने दामटल्या. येताना घाटात ट्रॅफिक वगैरे लागलं नाही. साडेदहाला कळवा स्टेशन आणि अकराला घर. ट्रेकने थकल्याभागल्या देहाचं घराने स्वागत केलं. आता काही दिवस तरी चर्चेला एक नवीन विषय.. रुटीनला कंटाळलेल्या जीवाला एक बदल.. आठवणींच्या संचितात आणखी एक भर.. मला लिहायला एक नवा हुरूप..

त्या रात्री झोपायच्या आधीच मी लेखाचं शीर्षक ठरवून टाकलं होतं – “हरिहर” – देर गए पर दुरुस्त आए..!

—  अभिजीत

529274f1-f36a-4346-86d7-e14bf9b8e96b

(डावीकडून रोहित, शैलेश, सौरभ, प्रथमेश, मी आणि नितीन)

इर्शाळ(इरसाल)गड

irshal3किसी की मुस्कराहटों पे हो निसार, किसी का गम भी मिल सके तो ले उधार..” राज कपूरच्या गाण्याचा माझ्या मोबाईलचा रिंगटोन वाजला आणि मी फोन उचलला.
“हॅलो, अभिजीत, सारिका.”;
“बोल.”
“मी ट्रेकचा प्लॅन ड्रॉप करतेय. तुम्ही एन्जॉय करा.”
“ओके” मी फोन ठेवला.

फोन बंद करता करता सहज वेळ बघितली. सकाळचे सात. शॉक बसल्यासारखा अंथरूणातून उठलो. इर्शाळगडाच्या ट्रेकसाठी सगळ्यांना आठला पनवेलला भेटायला सांगितलं होतं आणि मी सात वाजेपर्यंत साखरझोपेतच…! “च्यायला, आज चांगलाच उद्धार होणार आहे. चान्स सोडणार नाहीत हे लोक.!” झटपट तयारी करून निघायच्या बेतात असताना परत फोन वाजला. यावेळी शीतल होती.
“अभिजीत, कुठे आहेस तू?”
“मी निघतोय आता.”
“अरे, आम्ही पनवेलला पोचलोय.”

निमूटपणे फोन बंद केला. शीतल आणि प्रगती कांदिवलीहून ठरल्याप्रमाणे आठच्या आधीच पनवेलला पोचले होते आणि अस्मादीक अजून डोंबिवलीतच. लग्नाला बाहेरगावची मंडळी येऊन हजर होतात आणि गावातली लोकं अगदी अक्षता टाकायच्या वेळेला पोचतात तसला प्रकार..! असो. सचिनसुद्धा होतो कधीकधी शून्यावर आऊट..!

ट्रेकची तयारी आदल्या दिवशी केली होतीच. बॅग उचलली आणि पनवेल स्टँडवर जाऊन पोचलो. बराच वेळ झाल्यावर गाडी मिळाली आणि तासाभरात आमची स्वारी पनवेलला हजर झाली. एव्हाना नऊ वाजले होते. ठरलेल्या शेड्युलच्या तासभर उशिरा. तोवर मंडळींनी उदरभरणाचा घाट घातला होता. ते आटपून सर्वजण मला पनवेलला स्टँडमध्ये भेटले. मग लगेच चौक इथे जाण्यासाठी सीक्स सीटर शोधली. अखेरीस दहा वाजता नितीन,वैभव,रोहित,पुष्कराज,अभिलाष अशी नेहमीची सीजीआयची गँग,प्रगती आणि शीतलची जोडगोळी आणि पहिल्यांदाच आमच्यासोबत ट्रेकला आलेला प्रणय अशी आमच्या नऊ जणांची टूर निघाली.

चौक हे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरचं पनवेलपासून सुमारे सतरा किलोमीटरवर असलेलं गाव. ते कर्जत पनवेल या नव्या रेल्वेमार्गावरचं स्टेशन देखिल आहे. पनवेलहून साधारण अर्ध्या तासात इथे पोचलो. समोरच इर्शाळगड आपल्या टोपीसारख्या माथ्यासह दिसत होता. चौकला रेल्वेमार्ग ओलांडून पलीकडे आलो. समोरच्या डांबरी सडकेवरून दहा पंधरा मिनिटं चालत गेल्यावर गडाच्या पायथ्याला असलेल्या नानिवली गावात आपण पोचतो. बाजूलाच मोरबे धरणाचा जलाशय आहे. गावात समोरच एक मोठा टेकडीवजा उंचवटा आणि त्यामागे इर्शाळगड दिसतो. प्रथमदर्शनी इर्शाळगड आणि ही टेकडी यांचं नक्की काय नातं आहे ते कळत नाही. मग उमगतं की ही टेकडी नव्हे तर गावात उतरलेली इर्शाळगडाची सोंडच आहे. इथूनच चढाईला सुरुवात होते.

अकरा वाजता चढाईला सुरुवात झाली. इतक्या उशिरा चढताना उन्हाचा त्रास होईल की काय अशी भीती वाटत होती. मात्र सूर्याजीपंत न्यू ईयर पार्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या हँगओव्हरमधून पूर्ण बाहेर आलेले नसावेत. त्यामुळे उन्हाचा कडाका फारसा जाणवत नव्हता. झपाझप चालायला सुरुवात केली. वाटेवर खुणेचे बाण होते, त्यामुळे चुकण्याची शक्यता नव्हती. सुरुवातीलाच चढण लागते आणि आपण डोंगराच्या सोंडेवरुन जसजसे वर चढू लागतो, तसतसे समोरच्या इर्शाळगडमाथ्याचे, सभोवतालच्या हिरवाईचे आणि मोरबे धरणाच्या विस्तृत जलाशयाचे विलोभनीय दृश्य बघायला मिळते. वाटेवरून चालताना लोहगडच्या “विंचूकाट्या”ची आठवण होते. वाट तासाभरात इर्शाळवाडीत आणून सोडते. इर्शाळवाडी ही दहा पंधरा घरांची वस्ती.वाडीतून समोरच गडमाथा,गिर्यारोहकांना आव्हान देणारा बेलाग सुळका आणि डोंगराला आरपार पडलेलं भगदाड,(ज्याला नेढं म्हणतात)अगदी स्पष्ट दिसतात.इथवर पोचायला आम्हाला दुपारचा एक वाजला होता. मग थोडीशी पोटपुजा उरकून घेतली. रिकाम्या होत चाललेल्या पाण्याच्या बाटल्या वाडीत भरून घेतल्या आणि पुढच्या वाटचालीला प्रारंभ केला.

इर्शाळवाडीपर्यंतची वाट फार मळलेली आणि ठळक आहे. त्यामानाने पुढची वाट तितकीशी मळलेली नाही.अर्थात खुणांचे बाण आहेतच.वाडीच्या डावीकडून जरा पुढे गेल्यावर उजवीकडे माथ्याकडे जाणारी वाट आहे.पण आम्ही गप्पांच्या ओघात बरेच पुढे निघून गेलो.मग वाटेत एका गावकर्‍याकडून कळलं की वाट मागे राहिली आहे.म्हणून मग जवळच्याच एका घळीतून वर चढायला सुरुवात केली.इथे भरपूर गवत होतं.त्यामुळे चालताना कसरत करावी लागत होती.वाट शोधता शोधता मी बराच पुढे निघून गेलो.बाकीचे बरेच मागे राहिले होते.बराच वेळ झाला तरी पायवाट सापडण्याची चिन्हं दिसेनात.मग मी सरळ वाडीचा रस्ता धरला. तिथे एका पोराकडून रस्ता माहित करून घेतला आणि आपल्या सोबत्यांना हाका मारत पुढे निघालो.पण त्यांना चालता चालता बाण सापडला होता आणि ते योग्य वाटेला लागले होते.ही वाट गडाच्या पश्चिम टोकाला घेऊन जाते.यथावकाश मीपण तिथे जाऊन पोचलो.वाट चुकण्याचं कारण म्हणजे नेढं आणि सुळका गडाच्या पूर्व टोकाला आहेत,तर वाट पश्चिम टोकाला घेऊन जाते. वास्तविक माथ्यावरूनच एका टोकाकडून दुसर्‍या टोकाला जायची निमुळती वाट आहे.

मी वर पोचल्यावर मग पुढे निघालो. आता ऊन्हाने आपलं अस्तित्त्व दाखवायला सुरुवात केली होती.बाणाच्या वाटेने पुढे निघालो.इथपर्यंतची वाट तशी सोपी आहे.पण यापुढची वाट अगदी डोंगरकडेने जात असल्यामुळे थोडी सावधगिरी बाळगावी लागते.वाटेत एक मोठी कपार लागते.तिथे ‘भ्रमंती’ ग्रुपचे काही जण विसाव्याला थांबले होते.त्यांच्याजवळ प्रस्तरारोहणासाठी आवश्यक दोर वगैरे सगळी सामग्री दिसत होती.सुळका सर करून आराम करत बसले होते.त्यांच्याकडून पुढची माहिती घेतली.पुढे थोडं कातळावर प्रस्तरारोहण करून नेढ्यापाशी पोचलो.वाटेत एक शिडीही आपली मदत करते.नेढ्याच्या तोंडाशी अमित देशमाने नावाच्या कुणा गिर्यारोहकाच्या नावाची संगमरवरी पाटी दिसते. तसंच वरच्या सुळक्याच्या पायाशी देखिल कुमार प्रकाश दुर्वे याच्या नावाची पाटी आहे. २३ जानेवारी १९७२ रोजी सुळक्यावरून पडून त्याचा दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला मुंबई ठाण्याचे गिर्यारोहक इथे जमतात. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळावं पण सावधपणे, नाहीतर अशा दुर्घटना होतात. सर्वसामान्यांच्या मनात गिरीभ्रमणाबाबत उगीचच चुकीच्या कल्पना घर करुन बसतात आणि एका आनंददायी छंदाला कायमचं मुकण्याची शक्यता निर्माण होते. असो.आम्ही ही सगळी माहिती आधीच जमा केली होती आणि त्यानुसार काळजी घेतच इथवर पोचलो होतो.प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत नसणार्‍यांनी नेढ्यापर्यंतच जाणं इष्ट.नेढ्यातून प्रबळगड, माथेरान आणि मोरबे धरणाचा प्रदेश सुरेख दिसतो.

नेढ्यापाशी जवळपास तासभर विसावा घेऊन आणि फोटोसेशन वगैरे आटपून साडेतीनच्या सुमारास परतीच्या वाटेला लागलो. चढताना केलेल्या कसरतीसारखी उतरतानाही नवशिक्या ट्रेकर्सना थोडी कसरत करावी लागते. सव्वाचारच्या सुमारास पुन्हा वाडीत दाखल झालो. यावेळी व्यवस्थित वाट धरल्यामुळे वाटेवर असलेले देवीचे छोटेखानी मंदीर बघायला मिळाले. वाडीत पुन्हा पाण्याची तरतूद करून खाली उतरायला सुरुवात केली.मुबलक वेळ असल्यामुळे रमतगमत उतरलो.वाटेत एका ठिकाणी मस्त विसावलो. भन्नाट वारा येत होता आणि फोटोग्राफीची मंडळींची हौस अजून पुरी झाली नव्हती. मग काय विचारता, सगळ्या परमुटेशन,कॉम्बिनेशन,पोझ वगैरे वापरून भरपूर फोटो काढून झाले.

अखेर पाच वाजता मंडळी पुढे निघायला उठली.अर्ध्या पाऊण तासातच पायथ्याच्या गावात पोचलो.धरणावर एक फेरफटका मारला आणि सव्वासहाला पुन्हा हायवेवरच्या चौक थांब्यावर हजर झालो.पनवेलला जाणारी सीक्स सीटर पकडली आणि सव्वासातला पनवेलला हजर झालो. पश्चिम उपनगरात राहणार्‍या दोस्तांना साडेसातची पनवेल-अंधेरी लोकल मिळाली आणि आम्ही सेंट्रलवाल्यांनी केतकी उपहारगृहाकडे मोर्चा वळवला.मग एकेक जण आपापल्या घराकडे रवाना झाला.साधारण साडेनऊला मी घरी पोचलो. एका मस्त ट्रेकची सांगता झाली.

हा ट्रेक तसा सर्वांनाच सोयीचा ठरला. जास्त परिचित ट्रेक नसला तरी जवळचा असल्यामुळे कुणालाच त्रास झाला नाही आणि अगदी रमतगमत ट्रेक पूर्ण झाला. नव्या वर्षाचा पहिला रविवार मस्त सार्थकी लागला. कोण म्हणतं की फक्त थर्टी फर्स्ट च्या पार्टीचाच हँगओव्हर राहतो असं. अशा ट्रेकचा हँगओव्हर कितीतरी पटीने अधिक असतो. पण तुमच्यात दुर्गभ्रमणाची झिंग हवी, कातळाला भिडण्याची जिद्द हवी आणि निसर्गाशी जवळीक साधण्याची आत्मीयता हवी. मग साधा ट्रेकच काय, आयुष्याचा ट्रेकसुद्धा मस्त सोपा होऊन जातो. आणि डोंगर कितीही मोठा असो, त्याच्या पोटात कुठेतरी मधुर पाण्याचं टाकं सापडतंच, तसंच आपल्या आयुष्यातदेखील असंच समाधानाचं टाकं सापडल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

हर ट्रेक कुछ कहता है..!

— अभिजीत दाते

irshal4

ट्रेकचे शिलेदार (डावीकडून वैभव, रोहित, अभिलाष, पुष्कराज, प्रणय, मी , प्रगती, शीतल , आणि बसलेला नितीन)

सागरगड

sagargad1
अलिबाग से आया है क्या? असं कुणी विचारल्यावर ‘हो’ असं उत्तर देता आलं असतं तर किती बरं झालं असतं. समोरच्याला वेड्यात काढायचं असेल आपल्याला तर काढू दे खुशाल, पण मांडव्यापासून आक्षी, नागाव, रेवदंड्यापर्यंत पसरलेला अथांग दर्या, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा कुलाबा, कनकेश्वर, दत्तशिखर यांसारखी देवस्थाने आणि हे सगळं मुंबापुरीपासून हाकेच्या अंतरावर.. प्रवाससुद्धा मस्त बोटीतून सागराची गाज ऐकत आणि लाटांशी झिम्मा खेळत.. जिथे दोन दिवसांच्या मुक्कामात मुंबईकरांचा आठवड्याचा शीण हलका होतो तिथेच अख्खा आठवडा गेला असता तर किती मौज.. अरे हो, या रत्नमालेत एका रत्नाचा उल्लेख राहिलाच.. सागरगड. अलिबागपासून ४ किमी वर असलेल्या खंडाळे गावातून सागरगडाची वाट आहे.आजवर ब-याचदा अलिबागची सैर झाली, पण सागरगडाला भेटीचा योग आला नव्हता. त्यामुळे यंदा वन दे ट्रेकचा विषय निघाल्यावर नाव सुचलं सागरगडाचं.

दरवर्षी पाऊस वेळेवर आला की ट्रेनचं वेळापत्रक कोलमडतं आणि त्याने टांग दिली की ट्रेकचं वेळापत्रक कोलमडतं. यावेळी वरूणराजे उगवलेच मुळी श्रावणात, त्यामुळे बाप्पा येऊन परत निघाले तरी आम्ही घरातच. वाटलं हा सीझन पण वाया जाणार. पण बाप्पांनी जाता जाता सुबुद्धी दिली बहुतेक आणि धडाधड ट्रेक ठरला. गंमत म्हणजे यावेळी ज्याला विचारावं तो यायला तयार. शैलेश आणि आदित्य तर फोर व्हीलर घेऊन येतो म्हणाले. एरव्ही लाल डब्बा, फारतर एखादी जीप बघितलेल्या आमच्या ट्रेकला यावेळी फोर व्हीलरमुळे चार चाकं लागली (चार चांदच म्हणायचं होतं, उगाच जरा..:-))

अखेर १३ सप्टेन्बरचा तो सुदिन उगवला. मी, नितीन, रोहित, अभिजीत (दळवीकुलोत्पन्न) शैलेशसोबत कोपरखैरण्याहून निघणार होतो, तर आदित्य, त्याचे भाऊ अक्षय, अतुल आणि पुष्कराज थेट बोरिवलीहून येणार होते. आपल्याच गाडीतून प्रवास असल्याने मंडळी सुशेगात होती. कुणीच झोपेशी तडजोड वगैरे करण्याच्या भानगडीत पडला नाही. त्यामुळे कोपरखैरण्याला सारे जमेस्तोवर आठ वाजले आणि आमच्या ट्रेकच्या इतिहासात प्रथमच दोन एसी गाड्यांतून मावळे अलिबागच्या दिशेने निघाले. वाटेतल्या खड्ड्यांमुळे ट्रेक आताच चालू झालाय की काय असं वाटत होतं. गप्पाटप्पा करत वडखळपर्यंत प्रवास झाला. तिथे मस्त पोटपूजा करून खंडाळ्याची वाट धरली. तब्बल बाराला खंडाळ्याला पोचलो. तिथून आणखी २-३ किमी आत जाऊन एके ठिकाणी गाड्या पार्क केल्या आणि पायपीटीला सुरुवात झाली.

तसा समोर दिसतच नाही. तो लपून हळूच भो करणा-या खट्याळ मुलासारखा वाटतो. नाही म्हणायला ट्रेक सुरु होतो तिथे एक मस्त धबधबा दर्शन देतो. तिथे मस्त फोटोसेशन करून पुढे निघालो. वाट तशी सरधोपट आहे. चुकण्याची भीती नाही. वाटेवर गवताची मस्त दुलई अंथरल्यासारखं वाटत होतं. मधेच छोटे छोटे ओहोळ छान पाऊस झाल्याची साक्ष देत वाहत होते. एका वळणावर सागरगड आणि त्याला खेटून उभ्या असलेल्या वानरलिंगी सुळक्याने दर्शन दिलं. मग तिथे जरा रेंगाळलो. या वाटेवरून चालताना कोथळीगडाच्या वाटेची आठवण होते. खाली हिरवीगार दरी आणि दूरवर समुद्राचं चकाकणारं पाणी. मजल दरमजल करत बुरुजापाशी येऊन पोचलो. एव्हाना दुपारचे ३ वाजले होते. पण उन्हाचा त्रास झाला नाही. तसंही सागरगडावर आसरा असा नाहीच. सगळा खुला मामला. मग बुरुजाच्या भिंतीला खेटून ग्रुपने एक मस्त फोटो काढून घेतला. नंतर वाट काढत काढत एकदाचे माथ्यावर जाऊन पोचलो. माथ्यावरून सभोवतालचा परिसर मस्त दिसतो. माथ्यावर एक तलाव दिसला. त्यात म्हशी यथेच्छ डुंबत होत्या. त्यांचा हा रोजचा ट्रेक असणार. माथा तसा बराच मोठा आहे. समोर वानरलिंगीचा सुळका दिसत होता. साधारण १००-१२० मी उंच असलेल्या या सुळक्यावर बऱ्याच गिरीमित्रांनी यशस्वी चढाई केली आहे. अन्यथा केवळ वानरांनाच शक्य म्हणून त्याचं नाव वानरलिंगी. माथ्यावरून समुद्र दिसतोच, पण कुलाबा किल्ला आणि त्याचे खांदेरी, उंदेरी हे भाईबंद पण दृष्टीस पडतात. माथ्यावर बरीच जुनी बांधकामं दिसतात, यावरून एकेकाळी हा गड आंग्रे आणि स्वराज्याची मोठी कामगिरी बजावत असला पाहिजे हे नक्की. माथ्यावर वारा सारखा मोकाट सुटल्यासारखा वाहत असतो. त्यामुळे गड चढताना झालेले श्रम जाणवतच नाहीत.

बराच वेळ फोटोग्राफी आणि भोजनात घालवून मग मागे फिरलो. मी आणि दळवी जरा वाकडी वाट करून एका टोकाला निघालो. आमच्या बडबडीने बहुधा तिथल्या एकाची झोप चाळवली असावी. नाराजीतच सळसळत आमच्या पुढून निघून गेला. चांगला हातभार लांब होता. बहुधा श्रीयुत घोणस असावेत. त्याच वाटेवर एक गोमुखही दिसलं. पाण्याचा अखंड प्रवाहो चालला होता. पाणी एका कुंडात पडत होतं. जवळपास पाण्याची साठवण दिसत नव्हती, त्या अर्थी तलावातून भुयारी मार्गाने हे पाणी इथे आणलं असावं. या सर्व सोयी बघता पूर्वी इथे माणसांचा चांगलाच राबता असणार हे नक्की. पुढे एक मंदिर दिसलं. खालून दिसणारा तो भगवा ध्वज इथेच लावला होता. मंदिराचा फारच आधुनिक जीर्णोद्धार झाला होता. बाहेर एक दगडात कोरलेली मूर्ती दिसली. बहुतेक वीरोबा असावा. हा धनगरांचा देव. त्याला दंडवत घातला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. तास दिडतासातच पायथ्याशी पोचलो. मग चहा वगैरे घेऊन ताजेतवाने झालो आणि गाड्या मुंबईच्या दिशेने हाणल्या. ठरवल्याप्रमाणे संध्याकाळी ६ वाजता परतीचा प्रवास सुरु झाला होता. ट्रेक तसा रमतगमत झाल्यामुळे थकलो वगैरे नव्हतो, पण एवढं चालायची सवय गेल्यामुळे पाय जरा कुरकुरत होते इतकंच. पण शैलेशभाऊ जोशात होते. त्यामुळे सकाळी ज्या वेगात आलो होतो, त्याच वेगात परतीची वाट कापायाला सुरुवात झाली. वाटेत पुन्हा वडखळला थोडा वेळ थांबलो. गणपती विसर्जनाची तयारी सुरु होती. अनंत चतुर्दशी झाल्यावर आता पुन्हा कुठलं विसर्जन असा प्रश्न मला पडला. नंतर एका पेणमधल्या नातेवाईकाकडून कळलं की त्याला साखर चवथीचा किंवा गौऱ्या गणपती म्हणतात. अनंत चतुर्दशीनंतरच्या चतुर्थीचा हा दीड दिवसाचा उत्सव पनवेल, पेण, उरण वगैरे भागात असतो. त्या गर्दीतून वाट काढल्यावर मग सुसाट निघालो आणि नऊच्या सुमारास पुन्हा कोपरखैरण्यात दाखल झालो. परत असाच मस्त ट्रेक ठरवू असं म्हणत एकमेकांचा निरोप घेतला.

यावेळी अगदी लक्झरियस म्हणावा असा ट्रेक झाला खरा. पण खरं सांगू, या सह्याद्रीची ओढच काही वेगळी आहे. लाल डब्यातून जावं लागलं म्हणून ती कधी कमी होत नाही की एसी गाडीतून जाणं झालं म्हणून वाढीलाही लागत नाही. बस आपल्या इतिहासाबद्दल अभिमान हवा आणि निसर्गावर प्रेम हवं.. बाकी काळजी घ्यायला तो सह्याद्री आहेच…

— अभिजीत दाते

IMG_25323757525951

(डावीकडून नितीन, पुष्कराज, अक्षय,अतुल, दळवी, शैलेश, रोहित, आदित्य आणि मी)

राजमाची : एक भन्नाट अनुभव..!

raajmachi1

काळ : जूनचा पहिला आठवडा स्थळ : मुंबई शहर वा त्याचं कोणतंही उपनगर

“नेमेचि येतो मग पावसाळा” या तत्त्वाला अनुसरून आभाळ काळवंडून यायला सुरुवात झालेली असते. हवेतला उकाडा अगदी टिपेला पोचलेला असतो. रुमालाला घाम टिपतच पुस्तकं, दप्तर, छत्र्या, रेनकोटची खरेदी चालू असते. शहरातली नाले सफाईची कामं सत्तर ऐशी टक्केच पूर्ण व्हावी या बेतानं चालू असतात. आपल्या रुटीनचा एक भाग बनलेली वर्तमानपत्रं “यावर्षी किती पाऊस पडणार?”,”मिठी यंदा पुन्हा मिठी घालेल का?”,”आपत्कालीन यंत्रणा कशी कुचकामी ठरते आहे”,”रेल्वे पावसात नेहमीचं रडगाणं गाणार का ?” वगैरे मान्सून स्पेशल विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात गुंतलेली असतात. आणि अचानक एक दिवस “भटकंती” वा अशाच एखाद्या सदराखाली एक ठिकाण दर वर्षी हक्क असल्यासारखं अवतीर्ण होतं. मगभक्तीभावानं एखादं स्तोत्र वाचावं तशी पेपर रद्दीत जाईपर्यंत त्या सदराची पारायणं होतात. इथे जायचंच असं ठरवलंही जातं. पण हा विचार डबक्यात तरंगणा-या कागदाच्या नावेसारखा कधी बुडुन जातो ते कळत देखील नाही.पुढच्या पावसाळ्यात पुन्हा कुठल्याशा पेपरात पुन्हा ते “स्थळमाहात्म्य” वाचून त्या विचारांचे बेडूक पुन्हा डराव डराव करायला लागतात. या वेळीही तसंच झालं. पण यंदा चंगच बांधला होता. मग फार वेळ न दवडता पावसाने थाटात एन्ट्री घेताच मित्रांना ई-खलिते अर्थात ईमेल रवाना झाले “चलो राजमाची”.

राजमाचीचं नाव ब-यापैकी कानावर पडलं असल्याने एनडीएसच्या सवंगड्यांनी लगेच रिप्लाय पाठवले. भीमाशंकर,पळसदरी, खंडाळा प्रमाणे पावसाळी स्पॉट्समध्ये राजमाचीचाही वरचा नंबर लागतो. पावसाळ्यात राजमाची धबधबे आणि ट्रेकर्स या दोन्हींनी ओसंडून वाहत असतो. नव्या कंपनीत एव्हाना “समानशीलव्यसनेषु सख्यम” या तत्त्वाने ब-यापैकी कंपू जमवला होता.अमेय, अमोल, शैलेश, बागडे, प्रसाद, वैशू आदी एनडीएसची कार्टी आणि नितिन, रोहित, पुष्कराज, सुप्रिया इत्यादी सीजीआयचे पंटर सोबत न्यायचं ठरलं. किशोर सपत्नीक येणार होता. काही व्यक्ती ट्रेकला न येतासुद्धा ट्रेकला आलेल्या मंडळींपेक्षा जास्त चर्चेत असतील याची काही कल्पना नव्हती. मी नेहमीप्रमाणे “राजू गाईड”च्या भूमिकेत..!

ट्रेकची तारिख ठरली आणि पावसाने दडी मारली. इतरही काही कारणाने ट्रेक आठवडाभर पुढे गेला आणि २८-२९ जूनची एकदाची तारिख ठरली. पाऊस गायब झाल्याने हा ट्रेक कोरडाच जाणार की काय असं वाटत होतं. पण “अगर किसी चीज को दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हे उसे मिलाने में लग जाती है” इति ओम शांती ओम..! अगदी तसंच ट्रेकला दोन तीन दिवस बाकी असताना पावसाने धुमधडाक्यात पुनरागमन केलं आणि आम्ही उत्साहाने ट्रेकच्या तयारीला लागलो. मुक्काम करायचा असल्यामुळे रात्रीच आणि दुस-या दिवशीचं जेवण आणि राहण्याची व्यवस्था “हॉटेल शिरिष” मध्ये केली होती.सॅक इत्यादी भरुन तयार ठेवली आणि गजराची गरज नाही हे माहित असूनही नेहमीप्रमाणेच गजर लावून झोपी गेलो. ट्रेकच्या उत्साहात कधी एकदाचे सहा वाजतायत असा विचार करता करता कंटाळून साडेपाचलाच उठलो. पण टाईमपास करत आवरण्याच्या सवयीमुळे डेक्कन पकडण्यासाठी धावपळ झालीच. रेल्वेसकट जवळजवळ सगळेच वेळेवर हजर झाल्याने बसलेला आश्चर्याचा धक्का ओसरेपर्यंत किशोर अजून आला नाही असं कळलं. शेवटी प्रथा मोडणं वाईटच. मग बाकीच्यांचा प्रवास सुरु झाला. ओळखीपाळखीचे सोपस्कार झाल्यावर गप्पागाण्यांना सुरुवात झाली. कर्जतचे वडापाव खाऊन आणखीच चेव चढला असावा. कुठून ही ब्याद आपल्या डब्यात आली असं सहप्रवाशांना नक्कीच वाटलं असणार. सुदैवाने लोणावळ्याला आम्ही ट्रेन सोडली आणि त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. किशोर मागच्या ट्रेननेच येतोय असं कळलं आणि आम्ही सामानासकट प्लॅटफॉर्मवर बैठक मांडली. उरलासुरला भुकासूर शांत होईपर्यंत किशोर येऊन पोचला. मग सगळी मिरवणूक तुंगार्लीला निघाली. तासभर झालेला उशीर आणि मंडळींचा चालायचा उत्साह बघून तुंगार्लीपर्यंत रिक्षाने जाण्याचा ठराव एकमताने संमत झाला.

तुंगार्लीला रिक्षा पोचली. सर्वांनी आळोखेपिळोखे देऊन सगळा आळस झटकला आणि राजमाचीच्या वाटेला लागलो. तुंगार्ली धरणावर दोन चार फोटो काढले आणि पुढे निघालो. आता चार पाच तास फक्त आम्ही तेरा जण आणि अवतीभवतीचा निसर्ग आणि मधूनच आला तर पाऊस अशी सैर सुरु झाली. पक्का रस्ता संपून कच्च्या रस्त्याला लागलो. वर ढग बरसण्याची हूल देत नुसतेच वा-याबरोबर उणगत होते. मध्येच एखादा चुकार थेंब वाट चुकल्यासारखा जाणवत होता. रस्ता ब-यापैकी मळलेला असल्याने वाट चुकण्याची शक्यता नव्हती. शिवाय मुक्काम करायचा असल्याने वेळेत पोचायची गरजही नव्हती, त्यामुळे रमतगमत चाललो होतो. एका वळणावर “दीदार-ए-राजमाची” झाला.दुरुन डोंगर साजरे म्हणतात ते काय उगाच..! पण आम्हाला त्याच्या अंगाखांद्यावर बागडायचं होतं. मंजिल अभी दूर है असं म्हणत पायपीट चालूच ठेवली. मधेच चढ मधेच उतार अशी वळणावर वळणं घेत चाललो होतो. मधूनच समोरच्या बोरघाटातून शिट्ट्या घुमवत जाणारी रेल्वे नजरेस पडत होती. थोड्या वेळाने पोटाने आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. मग दोनच्या सुमारास गवत वगैरे आडोशाची जागा बघून झुणका भाकरीचा नैवेद्य पोटोबाला अर्पण केला. तो प्रसन्न झाल्यावर पुढे चालायला सुरुवात झाली. आता निसर्गसान्निध्य म्हणजे काय याचा प्रत्यय यायला लागला होता. आवाज नाही, गडबड नाही. फक्त वा-याचीच काय ती बडबड आणि आमच्या गप्पा. वाटेत एका ठिकाणी लहानसा धबधबा दिसला. लगेच सगळे भिजायला धावले. सोबत फोटोसेशन चालू होतंच. बराच वेळ तिथे हुंदडल्यावर तीनच्या सुमारास पुढे निघालो. आता राजमाची दृष्टीक्षेपात येऊ लागला होता. दरीची विहंगम दृश्येही दिसू लागली होती. डिजीटल कॅमे-याचे फ़्लॅश पडतच होते. मजल दरमजल करत वाटेतल्या ओढ्याशी येऊन पोचलो. मुसळधार पाऊस पडला म्हणजे या ओढ्याला पार करणं कठीण होउन जातं. सध्या इतका पाऊस पडला नसल्याने कटकट नव्हती. बाजूलाच गरमागरम चहाची व्यवस्था होती. मग चिवडा, फ़रसाण वगैरे चहाला आणखी स्वादिष्ट करणा-या वस्तू एकेकाच्या बॅगेतून बाहेर पडल्या. चहा तयार होईपर्यंत अर्थात पाण्यात खिदळलो हे काय सांगायला हवं. शिवाय रोहितचा हॅन्डीकॅम सोबत असल्याने या जलक्रिडेचे यथासांग चित्रण करून घेतले. चहा संपवून पुढच्या वाटेला लागलो. आता राजमाची जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. चहा पिऊन फ़्रेश झालेली पावलं आता झपाझप पडू लागली होती. वाट श्रीवर्धनला वळसा घालून मनरंजनच्या पायथ्याशी असलेल्या उधेवाडीच्या दिशेने चालली होती. आतापावेतो विरळ असलेली झाडी आता दाट होऊ लागली होती. वेशीपाशी मारुती आणि गणपतीची शेंदराने मढवलेली मूर्ती दिसली. शक्ती आणि युक्तीचा अनोखा संगम..! “शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधती” असं आपल्या महाराष्ट्र गीतात वर्णन आहेच की..! चालता चालता एका वळणावर समोरचं दृश्य पाहून थबकलोच. अर्धगोलाकृती कुंडासारख्या आकारात दोन देखणे जलप्रपात बेभानपणे खाली कोसळत होते. अगदी मोमेंट ऑफ द डे..! परत कॅमेरे सरसावले. एका बाजुला असे देखणे धबधबे, मागच्या बाजूला श्रीवर्धन आपला बुरुज डौलाने मिरवत उभा. त्यांच्या मधुन जाणारी लहानशी वाट आणि या सर्वांपुढे अगदीच लहान वाटणारे आम्ही..! जीव अगदी लहान लहान होउन जातो अशा वेळी..!
Digicam aahe na mag kaadha have thevadhe photo

मंडळी बराच वेळ तिथे रेंगाळली. शेवटी अंधार पडायच्या आत गावात दाखल झालेलं बरं असं म्हणत सहाच्या सुमारास तिथून पुढचा रस्ता पकडला. आता थांबण्याचा प्रश्न नव्हता. पंधरा मिनिटातच राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या उधेवाडीत दाखल झालो. गाव तसं लहानच. पंधरावीस घरांचं. पण इथे ट्रेकर्सच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची छानच सोय होते. सुरेश जानोरे यांच्या घरी राहण्याची सोय अगोदरच करुन ठेवली होती. हातपाय धुऊन फ्रेश झाल्यावर कांदा भजीवर ताव मारला. गावात वीजेची सोय नाही. सौरदिव्यांचाच काय तो उजेड. जेवणाची तयारी होईपर्यंत मेंढीकोटचा डाव रंगला. मग साडेनऊच्या सुमारास जेवणाची पंगत बसली. झुणका भाकरीचं साधं पण चविष्ट जेवण. तशी भाकरी शहरातसुद्धा मिळते हल्ली.पण चुलीवर बनवलेल्या भाकरीची चव काही औरच..! जेवणानंतर सामुदायिक स्प्राईट आणि स्पिरिट प्राशनाचा कार्यक्रम झाला. मग डम्बशराझ चालू झालं. धड प्रकाश नसतानाही टॉर्च आणि कंदिलाच्या उजेडात डम्बशराझ खेळायला धमाल आली. दमलेले सगळे पटापट झोपी गेले.

सकाळी जाग आली ती बाहेर धो धो कोसळणा-या पावसाच्या आवाजाने. कालच्या हाफ डेनंतर पाऊस पुन्हा कामावर रुजू झाला होता. अर्धा पाऊण तासाने त्याचा जोर ओसरला. तोवर कांद्यापोह्याची न्याहारी तयार झाली होती. मग आपल्यात आता कांदापोहे कुणाचे कधी सुरु होणार याची चर्चा रंगली. मग श्रीवर्धनच्या वाटेला लागलो. पाऊस थांबला असला तरी वारा चांगलाच झोंबत होता. वाटेत भैरवनाथ देवळापाशी थांबलो. इथून उजवीकडे जाणारी वाट श्रीवर्धनला तर देवळाच्या मागून डावीकडे जाणारी वाट मनरंजन माचीवर घेऊन जाते. श्रीवर्धनच्या वाटेला लागलो.वाटेत एक गुहा लागते. तिथे दोन तीन खोल्या आहेत. अर्ध्या तासातच श्रीवर्धन माथा गाठला. जोरदार वारा आणि मधूनच येणा-या सरींमुळे चालताना तारांबळ उडत असली तरी मजाही येत होती. वाटेवरचं लुसलुशीत गवत वा-याच्या लयीवर हिंदोळत होतं. असं वाटत होतं की श्रीवर्धन म्हणजे किल्ला नव्हे तर मिशीला पीळ देत उभा असलेला महाराजांच्या सैन्यातला धिप्पाड मर्द मावळाच आहे आणि ही त्याच्या अंगावरची लवच वा-यावर हलते आहे. माथ्यावर भगवा डौलाने फडकत होता. थोडा वेळ तिथे थांबलो. आता आजुबाजूला ढगांनी घेराव घातला होता. जणु महाराजांच्या किल्ल्याला मोगलांच्या सैन्यानेच वेढा घातला आहे. जिथे बघावं तिथे फक्त हिरवा आणि पांढरा रंग..! असं वाटत होतं की विश्वकर्म्याच्या रंगाच्या पेटीतून हे दोन रंग सांडलेत ते थेट इथंच. पावसाचा जोर जरासा ओसरला तसे परतीच्या वाटेला लागलो. लगोलग मनरंजन माची गाठायची होती. मनरंजन तसा उंचीने लहान आहे. त्यामुळे पंधरावीस मिनिटातच माथा गाठला. मनरंजनवर पाण्याची लहान मोठी बरीच टाकी आहेत. तिथूनच गावात पाण्याची सोय होते. मनरंजनवर असताना एकदम धो धो पाउस कोसळायला सुरुवात झाली. लगेच गावात परतायला निघालो, पण तोपर्यंत पावसाने पुरती आंघोळ घातली होती आणि वीजांच्याऐवजी दातच कडकड वाजायला लागले होते. नशीब जास्तीचे कपडे घेऊन ठेवले होते. या धामधुमीत बारा कधी वाजले कळलंच नाही. मग लगेच जेवायला बसलो. मेनू होता तांदळाची भाकर आणि चवळीची उसळ. २-३ भाक-यातच पोट भरलं. लगेच परतीच्या वाटेला लागायचं होतं. पाऊस थांबला होता. म्हणून जेवण आटोपताच लगोलग निघालो.

परतीला जर वेगळा एखादा मार्ग असेल तर शक्यतो तोच मार्ग पकडायचा हा माझा पूर्वीपासूनचा शिरस्ता. त्यामुळे येताना तुडवलेल्या वीस किलोमीटर रस्त्याऐवजी कोंदिवड्यात उतरणारा उताराचा मार्ग निवडला. मुंबईहुन येणारे बरेचसे ट्रेकर्स येताना लोणावळ्याहून येतात आणि याच मार्गाने परततात. रस्त्याची नीट माहिती घेऊन साधारण सव्वादोनला कोंदिवड्याच्या दिशेने निघालो. हा मार्ग उतरणीचा असला तरी वाट चिखलाने भरलेली होती. शिवाय आणखी दोन तीन ग्रुप उतरत असल्यामुळे वाटेवर चांगलीच गर्दी झाली होती. पण त्या निसरड्या वाटेवरुन भरभर चालणं जमत नसल्याने घाटातल्या ट्रॅफिक जॅमसारखी परिस्थिती उद्भवली होती. आता पावसाची रिपरिपही चालू झाली होती. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं, अन्यथा घसरगुंडी अटळच. वाटेत एखादा ओढा लागला म्हणजे हातपाय, चपला वगैरे स्वच्छ धुऊन घेत पुढे जात होतो. दोन दिवसाच्या पायपीटीमुळे ही वाटचाल आणखीनच कठिण वाटू लागली होती. त्यामुळे नवशिक्या ट्रेकर्सचा वेग चांगलाच मंदावला होता. उतार असुनही चिखलामुळे वृक्षवेलींचा आधार घेत सावकाशच चालावं लागत होतं. पेशन्स आणि स्टॅमिना यांची परिक्षाच जणू. पण धीमी का होईना आमची वाटचाल चालूच होती. सवयीच्या ट्रेकरसाठी ही अंगवळणी पडलेली गोष्ट असली तरी इतरांसाठी थोडी कठिण नसली तरी सोपी बाब नक्कीच नव्हती. त्यात आठ आठ तास एसीत खुर्चीवर बसून काम करायची सवय. त्यामुळे आखडलेल्या शरिराला एकदम एवढं दामटणं म्हणजे वरातीत निवांत चालणा-या घोड्याला एकदम डर्बी रेसमध्ये उतरवण्यासारखंच..!

तीन तासाच्या तंगडतोडीनंतर एकदाचे कोंदिवड्यात येऊन थडकलो. आमच्यातली अतीउत्साही मंडळी पुढे धावतच सुटली होती. आम्ही स्लो मेंबर घेऊन निवांतपणे मार्गक्रमण करत असल्याने थोड्या वेळाने पोचलो. कोंदिवड्याहून कर्जत दहा किलोमीटरवर. सव्वापाच झाले होते. लांबून आलेल्यांना वेळेवर घरी पोचता यावं म्हणून ताबडतोब कर्जतला जाणारी विक्रम रिक्षा पकडली. सुदैवाने वाटेत उतरताना फ़ार त्रास न दिलेला पाऊस पुन्हा कोसळायला लागला. जणू “धन्यवाद” म्हणत असावा. अर्ध्या तासातच कर्जत गाठलं. साडेसहाची मुंबईला जाणारी लोकल लागली होती. आपली थकलीभागली शरीरं घेऊन मुष्किलीने जागा मिळवली. स्टेशनवरचा वडा पाव चाखत ट्रेकबद्दल भरभरुन बोलायला सुरुवात झाली. राजमाचीच्या मंदिरात भेटलेले विदेशी पाहुणे, श्रीवर्धनवर रंगलेला डम्बशराझचा खेळ, रात्रीच्या आणि दुपारच्या जेवणाची लज्जत, हवा तेव्हा हवा तसा भेटलेला पाऊस. विषयांची कमी नव्हती. तासाभरात गाडी डोंबिवलीला येऊन थडकली. माझी उतरायची वेळ झाली. ट्रेक खरोखरच यादगार केल्याबद्दल सगळ्यांना थँक्स म्हटलं. सर्वांच्या चेह-यावर एक मस्त अनुभव मिळाल्याचं समाधान दिसत होतं. ते पाहून ट्रेक अरेंज करायला केलेली एवढी “धडपड” सार्थकी लागल्यासारखं वाटलं. उद्या पुन्हा ऑफिस गाठायचं होतं. पुन्हा त्याच रुटीनच्या जंजाळात गुरफटायचं होतं. पण आता नवी उमेद, नवा उत्साह घेऊन आलो होतो.

या ट्रेकने दमवलं खरं. अगदी काल परवापर्यंत दुखणारे पाय आणि फोटो ट्रेकचा हँगओव्हर अजून तसाच आहे याची जाणीव करुन देत होते. हळूहळू पाय दुखायचे थांबतील, फोटोसुद्धा बघून बघून जुने होतील, पण या ट्रेकच्या आठवणी अशाच मनात रुंजी घालत राहणार हे नक्की. इथे पुन्हा पाऊस पडेल, पुन्हा ट्रॅफ़िक खोळंबेल, पुन्हा पाणी साचेल. पुन्हा कुणीतरी पावसाला शिव्या देईल. त्याला म्हणावंसं वाटेल की इथे राहून पावसाला शिव्या देण्यापेक्षा, राजमाचीला जाऊन पावसाच्या ओव्या आठव.

कुणीतरी म्हटलं आहेच,

“स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा.
आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस हा.
वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी,
अन मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊस हा..!

“बस्स..या ट्रेकची ही झिंग नक्की पुरेल…किमान हा पावसाळा तरी..!

अभिजीत दाते

trekkers

कोहोजची सफर

kohoj1

“आयला या ऐला वादळाची..!” गेले कित्येक दिवस असे उद्गार माझ्या तोंडून येत होते. वर्तमानपत्र आणि दूरदर्शन वाहिन्यांवर होणा-या मान्सून चर्चा ऐकून ऐला, एल निनो वगैरे शब्द परिचयाचे झाले होते. मुंबईचा पाहुणा जून संपत आला तरी येण्याचं नाव घेईना. पाणीकपातीच्या वीजा मात्र कडकडत होत्या. ट्रेकचा मौसम आला पण माहौल मात्र तयार झाला नव्हता. पावसाची वाट बघत ‘दामिनी’तल्या सनीसारखं ट्रेकचं तारीख पे तारीख चाललं होतं. अखेर जुनच्या अखेरच्या आठवड्यात एखाद्या गवयाने सलामीलाच दृपद धमार आळवावा तसा पावसाने ठायीत मल्हार चालू केला. सायन, मिलन सबवे वगैरे पावसाला आंदण दिलेल्या एक दोन ठिकाणी पाणी साचल्याची दृश्यं बघितली टीव्हीवर आणि पटलं की पाऊस आलाय बरं..! मग ट्रेकच्या ठिकाणाची आणि तारखांची जुळवाजुळव सुरु झाली. दरवेळी आमच्या पश्चिम उपनगरातल्या सवंगड्यांना ट्रेकहून परतताना उशीर व्हायचा. त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या साईडला ट्रेक करू असं आश्वासन मागच्या ट्रेकला मी दिलं होतं. त्याला जागत पालघर भागात वाडा – मनोर रस्त्यावर असलेल्या कोहोजची निवड केली.अकरा जुलैचा शनिवार ट्रेकसाठी मुक्रर झाला.नेहमीसारखी ई-मेलची देवाणघेवाण सुरु झाली आणि मी बेत आखायला सुरुवात केली.

हा ट्रेक बाकी ट्रेकसारखाच असल्याने नेहमीच्या ट्रेकच्या वेळी घडणा-या घटनांची पुनरावृत्ती होणार हे माहीत होतं. आधी हो,मग नाही मग पुन्हा हो असं चाललं होतं. त्यामुळे ट्रेकचा ग्रुप आहे की खो-खो ची टीम असा प्रश्न मला पडला तर नवल नव्हतं. दर दिवशी संख्या बदलत होती. अखेर आदल्या दिवशी रात्री ठीक दहा वाजता सहा जण आणि तीन जणी अशा एकूण नऊ व्यक्ती येणार असल्याचा साक्षात्कार झाला.शनिवारी सकाळी साडेसातला ठाण्याला भेटायचं ठरलं. नितीन कळव्याहून,अमेय मुलुंडहून तर मी,विनायक आणि अभिलाष डोंबिवलीहून येणार होतो.वैभव तर ठाणेकरच.वैशाली बोरीवलीवरून,तर शीतल आणि प्रगती ही जोडगोळी कांदीवलीहून यायची होती. नितीन,अभिलाष, विनायक,वैभव वगैरे माझे सध्याच्या कंपनीतील सहकारी, तर अमेय आणि वैशू एनडीएसपासूनचे मित्र. शीतलची आणि माझी ऑर्कुट आणि जी टॉकपुरती ओलख. मागे एकदा चॅटवर पुढच्या वेळी मला पण बोलाव ट्रेकला असं ती म्हणाली होती. म्हणून तिला सहज मेल टाकला होता. ती येईल असं वाटलं नव्हतं. पण ती तिच्या मैत्रीणीसोबत,प्रगतीसोबत आली आणि त्या दोघींनी अख्खा ट्रेकही व्यवस्थित पूर्ण केला.

आदल्या दिवशी ऑफ़िसमधून निघायला आणि पर्यायाने घरी पोचायला उशीर झाल्याने ठाण्याला पोचयला मलाच साडेसात ऐवजी आठ वाजले.बाकीचे अगोदरच पोचले होते. मागोमाग वैशाली आणि शीतल,प्रगती पोचल्या. शीतल आणि प्रगतीची ओळख करुन दिल्यावर ब-याच जणांच्या भुवया उंचावल्या आणि माझ्या देहावर मूठवर मांस चढलं.(अशा मांसाची हल्ली फ़ार गरज आहे मला.बारीक झालोय अगदी..!) कुंजविहार मध्ये न्याहारी उरकून पावणेनऊच्या सुमाराला ठाणे – वाडा एसटी पकडली. ठाणे – भिवंडी – वाडा असा प्रवास होता. वाड्याहून सहा आसनी (फक्त म्हणायला)रिक्षामधून पुढे निघायचं होतं. बसने भिवंडी ओलांडलं आणि शहरीपणाच्या एकेक खुणा पुसट व्ह्यायला लागल्या. आसमंत गर्द हिरव्या रंगाने व्यापून टाकायला सुरुवात केली. गाडी अकरा वाजता वाडा स्थानकात पोचली. मग खाण्यापिण्याची (फक्त पाणी प्यायची परवानगी होती) तरतूद करून वाड्याहून कोहोजच्या पायथ्याशी असलेल्या वाघोटे गावी जायला सहा आसनी रिक्षा पकडली. वाड्यात पावसाने जोरदार स्वागत केलं. पार वाघोटे येईपर्यंत पाऊस कोसळत होता. अर्ध्या तासाने वाघोटे गावात पोचलो. समोरच्या डोंगरावर धुक्याने चांगलंच अतिक्रमण केलेलं दिसत होतं. साधारण पावणेबाराच्या सुमारास ख-या अर्थाने ट्रेकला सुरुवात झाली.

वाटेच्या सुरुवातीलाच हृदयाच्या आकारात असलेलं एक तळं आहे. तिथे थोडं फोटोसेशन करून घेतलं. दोन्ही बाजुला हिरवंगार गवत वा-यावर डुलताना दिसत होतं. तिथुन एकदोघांना वाट विचारत पुढे निघालो. वाटेत एक पाझर तलावही आहे. तलावाच्या मगेच कोहोजगड आहे. हे दृश्य लगेच कॅमे-यात बंदिस्त करुन टाकलं. तिथे थोडा वेळ घालवून पुढे निघालो. कोहोजला वळसा घालून वाट पुढे जात होती. माथ्यावरचं काही एक दिसणार नाही याची काळजी ढग घेत होतेच. आता शेतातली वाट संपून गर्द झाडीतली वाट सुरु झाली. आजुबाजुला असलेल्या मार्गदर्शक खुणांचा मागोवा घेत पुढे चाललो होतो. तरीही शेवटी वाट चुकलो. हमरस्ता सोडून चुकून पाण्याच्या वाटेने निघालो होतो. हळुहळू ती वाट बिकट होत गेली तसं वाट चुकल्याचं लक्षात आलं. मग इकडेतिकडे भटकून वाट शोधावी लागली. विनायकला ती एकदाची सापडली. मग पुन्हा मेन वाटेकडे मोर्चा वळवला. ही वाट चांगली रुंद होती. नंतर झाडी गर्द होत गेली आणि वाट निमुळती होत गेली. त्या भानगडीत पुन्हा वाट चुकलो. पण यावेळी जास्त वेळ वाया गेला नाही आणि सपाट पायवाट सोडून चढाच्या वाटेला लागलो. आतापर्यंतची वाट त्यामानाने सोपी होती. इथे चांगलाच चढ जाणवत होता. अनुभवी शिलेदार नव्यांना व्यवस्थित सांभाळून घेऊन जात होते. शीतल आणि प्रगतीचा हा पहिलाच ट्रेकचा अनुभव असला तरी त्यांची अजिबात कुरकूर नव्हती. वाटा चुकणं, वाटा शोधणं वगैरे आतापर्यंत झालेल्या ट्रेक्समुळे निदान माझ्या तरी अंगवळणी पडलं होतं. त्यातच तर खरी गंमत असते महाराजा..! “Don’t follow other’s footsteps. Make your own road and leave a trail.” हे वाक्य आम्ही शब्दश: खरं करत असतो.

मजल दरमजल करत कोहोजच्या खिंडीत येऊन पोचलो. इथे पुन्हा समोर दिसत असलेया शिखराला वळसा घालून आपण पुढे जातो. इथे वर शिखरावर चढाई करताना कुणा गिर्यारोहकाला अपघात झाला आहे. तसा संगमरवरी फलक तिथे आहे. अर्थात तो वाचण्याच्या पलिकडे आहे. इथे खालच्या दरीतून मस्त वा-याच्या झुळकी येत असतात आणि थकवा क्षणात पळून जातो. तिथे थोडा वेळ घालवून पुढे निघालो. आतापावेतो वर पोचायला हवं होतं. पण निघायला झालेला उशीर आणि वाट चुलल्यामुळे बराच वेळ फुकट गेला होता. आता वेग वाढवणं आवश्यक होतं. अजून किती वेळ लागेल याचा अंदाज नव्हता. घड्याळात दोन वाजले होते. मग मी, विनायक आणि वैभव बाकिच्यांना मागे ठेवून बाणाच्या खुणा शोधत झपाझप पुढे निघालो. सुमारे वीस पंचवीस मिनिटांच्या पायपीटीनंतर सपाटीवर येऊन पोहोचलो. जवळपास ढगातच होतो. एक क्षण समोर काहीच दिसेना. मग वा-याने ढग हटले आणि समोरच कुसुमेश्वर महादेव मंदिर दिसलं. तिथे सामान ठेवलं आणि वैभव, विनायकला तिथेच थांबायला सांगून मी पुन्हा खाली निघालो. एव्हाना खालच्या मंडळींनी वर निघायला सुरुवात केली होतीच. त्यामुळे मला फारसं उतरावं लागलं नाही. यथावकाश सगळेजण वर येऊन पोहोचले. आता ढग निघून गेले होते आणि समोरच्या कड्यावरचा मानवी आकाराचा सुळकाही दिसला. खरं तर तिथे जायच्या बेताने आलो होतो, पण इथे येईतो साडेतीन झाले. त्यामुळे देवळापाशीच ट्रेक संपवायचं ठरलं. देवळात तीन शिवपिंडी आहेत. घुमटावर आणि इतरत्र आलेल्या लोकांनी आपली नावं लिहून परिसर विद्रूप करून टाकला आहे. आजुबाजुला जरा भटकलो आणि मग पोटपुजेला बसलो. आता पावसाला सुरुवात झाली. तसाही तो अधून मधून पडत होताच. मी विंडचीटरची भानगड ठेवलीच नव्हती. माझं विंडचीटर शीतलकडे होतं. त्यामुळे पावसात भिजण्याचा आणि नंतर भन्नाट वा-यात आपोआप वाळण्याचा पुरेपूर आनंद मी लुटला. खाणं आटोपून गड भटकायला निघालो. कड्यावरुन खाली पडणा-या ओहळांचं पाणी वा-यामुळे वर फेकलं जात होतं आणि त्याच्या तुषारात भिजायला मस्त मजा येत होती. तिथल्याच एका वाहत्या झ-यात पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या आणि मग एका कड्याशी गप्पा मारत बसलो. तासभर कसा गेला कळलंच नाही. उठायला अगदी जीवावर आलं होतं.
शेवटी पावणेपाचला परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. तासाभराच्या विसाव्याने सारे ताजेतवाने झाले होते. ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने उतरायला सुरुवात केली. उतरताना निसरड्या वाटेवरुन थोडं जपून चालावं लागत होतं. उतरताना वाट चुकण्याचं फारसं टेंशन येत नाही. कारण कुठे ना कुठे ती वाट पायथ्याशी नेऊन सोडतेच. पण एकाहून अधिक वर येण्याच्या वाटा असतील तर मात्र गोंधळ होतो. आम्हीदेखील आजवर ब-याचदा उतरताना दुस-याच ठिकाणी उतरलो आहोत. ही जवळ जवळ असलेली गावं असतात. इथेही तेच झालं. पायवाटेने चालता चालता वाघोटे ऐवजी गो-हे गावात उतरलो. तोवर सात वाजुन गेले होते. वाघोटे रस्त्याला अगदी खेटुन होतं तर गो-हे मुख्य रस्त्याच्या बरंच आत होतं. त्यामुळे पुन्हा अकरा नंबरच्या बसचा प्रवास अटळ होता. चालत चालत रिक्षा स्टॅन्ड गाठला, पण एकही रिक्षा नव्हती. आता अंधारायला लागलं होतं. सरतेशेवटी पालघरला निघालेल्या एका टेंपोवाल्याने मस्तान नाक्यापर्यंत सोडायचं मान्य केलं. तिथून मुंबईला जायची सोय झाली असती. अशा प्रकारे रिकाम्या अंधा-या टेंपोमधून आमचा प्रवास सुरु झाला. गो-हे – कंचाड मार्गे मस्तान नाक्याकडे निघालो. आता गाण्यांची मैफल सुरु झाली. चालून चालून दमली असली तरी मंडळींचा उत्साह शाबूत होता. या सगळ्यात मस्तान नाका कधी आला कळलंच नाही. मस्तान नाका वाड्याला मुंबई – अहमदाबाद महामार्गाशी जोडतो. तिथे पोहोचेपर्यंत साडेआठ होऊन गेले होते. नाक्यावरच्या विठ्ठल कामतांच्या मनोर प्राईड मधे चहा घेतला. तिथे चौकशी केल्यावर कळलं की तिथून यावेळी बस वगैरेची काही सोय नव्हती. मग मुंबईकडे जाणा-या टेंपो,ट्रक्सना हात दाखवायला सुरुवात केली. नशिबाने लगेच एक टेंपो मिळाला. दहिसर नाक्यापर्यंत सोडायला तयार झाला. मग बिनटपाच्या टेंपोमधून प्रवास सुरु झाला. ‘जाने तू या जाने ना’ मधल्या ‘नजरे मिलाना नजरे चुराना’ ची पर्यायाने जेनेलियाची वगैरे आठवण झाली. वर आकाश, मोकळा रस्ता आणि मस्त गार वारा. अधून मधून गतीरोधकांमुळे बसणारे धक्के सोडले तर मजा येत होती. पुन्हा गाण्यांना सुरुवात झाली. दीड तासाच्या प्रवासानंतर दहिसर नाक्याला पोचलो. या खटाटोपात साडेदहा वाजले होते. मग शीतल, प्रगती आणि वैशाली रिक्षाने बोरिवलीकडे रवाना झाल्या आणि बाकीचे आम्ही घोडबंदरमार्गे ठाण्याला आलो. मग लोकलने डोंबिवली गाठली आणि सव्वाबाराला घर..!

ट्रेक पूर्ण न झाल्याची रुखरुख असेलच, पण त्या निमिताने शीतल आणि प्रगतीचाही ट्रेकयोग जुळून आला. ट्रेकसाठी दोन नवीन साथीदार मिळाले. ऑर्कुटवरची मैत्री केवळ टाईमपास न राहता कशी वृद्धींगत होऊ शकते त्याचंही प्रत्यंतर आलं. ट्रेक प्लॅनिंगचा आणखी एक अनुभव पदरात पाडून घेतला. एक दिवस सगळे ताण तणाव,शहरी धावपळीहून वेगळा असा छान गेला. ट्रेकमधल्या अडचणीही एन्जॉय केल्या.चार्ल्स टेंपलटनने म्हणून ठेवलं आहेच,
Inconveniences are often challenges wrongly considered.
Challenges are always inconveniences rightly considered.

आता वाट बघायची आणखी एका चॅलेंजची तोवर या ट्रेकच्या आठवणी आहेतच..!

—  अभिजीत

kohoj2

कलावंतीणीच्या सुळक्यावर

kalavantin1
कलावंतीण म्हटलं की सहसा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो तमाशाचा फ़ड. ढोलकीवरची थाप, टाळ्या शिट्यांचा गजर, हवेत उडवली जाणारे फेटे पागोटी आणि तालावर थिरकत नखरेल अदांनी ठुमकत, मुरकत येणारी नटरंगी नार. सगळा भलताच नाजुक मामला. राकटपणा,कणखरपणा तिथे औषधालाही सापडायचा नाही. मग आमच्यासारख्या ट्रेकर्सचं तिथे काय काम? पण आहे, ट्रेकर मंडळींनीही रंगून जावं असाही एक फ़ड आहे. ही कलावंतीण आहे मुंबई पुणे महामार्गावरील पनवेलपासून १७ किलोमीटरवर असलेल्या ठाकूरवाडी गावात. तमाशातली नार जशी एखाद्या भरदार गावरान मर्द गड्याशेजारी तोऱ्यात उभी राहते, तशी ही कलावंतीण प्रबळगडासारख्या बुलंद दुर्गाला खेटून टेचात उभी आहे. नुकताच या कलावंतीणीच्या फ़डाला जाण्याचा योग आला आणि एखाद्या रगेल, रंगेल रसिकाने तमाशात भान हरपून जावं तशी आम्हीही या ट्रेकची मजा घेतली.

राजमाचीचा ट्रेक करुन बरेच दिवस झाले होते. हिवाळ्याची सुरुवात म्हणून नवीन ट्रेकचं डोक्यात होतं. सलग दोन दिवसाची सवड काढणं जमत नव्हतं. तशात एक दिवस मेलमधून कलावंतीणीच्या सुळक्याचे फोटो बघायला मिळाले आणि ठरवलं की यावेळी इथंच जायचं. मुंबईपासून फार लांब नसल्याने एका दिवसात सहज होण्यासारखा ट्रेक होता. मग काय, नेटवरुन माहिती गोळा करणं, नेहमीच्या ग्रुपला मेल पाठवणं इत्यादी सोपस्कार केले. तारीख ठरली तेवीस नोव्हेंबरची. सुरुवातीला ३-४ जणांचेच रिप्लाय आले. शिवाय ट्रेकचा दिवस उजाडेपर्यंत गळतीचा अनुभव असल्याने थोडी धाकधूक होतीच. पण या वेळेला सूर्य पश्चिमेला उगवला होता की काय कोण जाणे, मेंबर्सची संख्या वाढतच गेली आणि चक्क डझनभर मंडळी जमली की महाराजा..!

सकाळी साडेसातला पनवेलच्या एसटी डेपोत भेटायचं असं ठरलं. तसं बघायला गेलं तर पनवेलहून सकाळी सातला ठाकुरवाडीला जायला बस आहे. पण आमची मंडळी गोरेगाव, दादर इतक्या लांबून येणार होती त्यामुळे साडेसातची वेळ ठरवली. म्हणजे आठ वाजेपर्यंत तरी पोचतील या हिशोबाने. मी आदल्या रात्री सगळी जय्यत तयारी करुनच झोपी गेलो होतो. पण या वेळी झोपेने दगा दिला. उठायला उशीर झाला, पण धावपळ करुन बस स्टॉपवर पोचलो. बस अर्धा तास उशीरा आली त्यामुळे साडेसातला पनवेलला असण्याऐवजी डोंबिवलीलाच होतो. अखेर सव्वाआठला पनवेलला पोचलो. माझ्या मागोमाग बाकीचे पण पोचले. रोहित, वैभव वगैरे साडेसातलाच येऊन बसले होते. मग हॉटेल द्वारका मध्ये न्याहारी आटपून घेतली. सोबत ट्रेकला उन्हात उपयोगी पडेल म्हणून फळफळावळ पण घेऊन ठेवली. मागच्या आठवड्यात दोन दिवस गेस्ट अपिरीयन्स देऊन थंडी गायब झाली होती. त्यातच निघायला झालेला उशीर या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रेक कसा होणार याची चिंता होती. नशिबाने लगेच ठाकुरवाडीला जायला सिक्स सीटर मिळाली. आम्ही तिलाच ट्वेल्व्ह सीटर केली आणि नऊला पनवेल सोडलं. नाईक,दळवी,अमेय,किशोर,बागडे असे एनडीएसचे जुने सोबती होते. शिवाय नितीन,पुष्कराज,रोहितने राजमाचीला आलेली धमाल पुन्हा अनुभवण्यासाठी हजेरी लावली होती. वैभव मोरे,शैलेश परब आणि योगराज वगैरे प्रथमच आमच्यासोबत ट्रेकला येत होते. आणि या सर्वांसोबत सेनापती (त्यांनीच ठेवलेलं नाव..फक्त “सेना” ऐवजी कधीकधी इतरही नावं येत राहतात..असो)कम गाईड कम एंटरटेनरच्या नेहमीच्या भूमिकेत अर्थातच खुद्द मी..!

पनवेल सोडून मुंबई-पुणे महामार्ग धरला की डावीकडे नजर टाकली की एक डोंगररांग आपलं लक्ष वेधून घेते. इथेच वसलेत प्रबळगड, इर्शाळगड आणि कलावंतीण. पनवेलपासून सुमारे सतरा किलोमीटरवर असलेलं ठाकुरवाडी हे पायथ्याचं गाव. हायवेवरच्या शेडुंग फाट्यावरुन डावीकडे वळून ठाकुरवाडीच्या वाटेला लागलो. एव्हाना सगळे ट्रेक मूडमध्ये यायला लागले होते. आमचे जुने सवंगडी मग असे काही सुटतात की एखादा नवा भीडू पण त्यांच्यात बिनदिक्कतपणे सामील होतो. आपण यांच्यासोबत पहिल्यांदाच जातोय असं मुळी वाटतच नाही. अर्ध्या पाऊण तासात ठाकुरवाडीला पोचलो. गावात जेवणाची छान सोय होते. आम्ही सर्वांची जेवणाची व्यवस्थित सोय केली आणि गावातल्या मारुतीला हात जोडून साधारण सव्वादहाच्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. काही तास तरी शहरी धकाधकीपासून, कंटाळवाण्या रुटीनपासून, प्रोजेक्ट वर्कपासून मुक्ती मिळणार या सुखद जाणिवेसह..!

ठाकुरवाडी गाव तसं लहानच. गावात सध्या ‘धारप असोसिएट’तर्फे बंगलो स्किमचं काम चालू आहे. त्यामुळे टुमदार घरांची दाटी दिसत होती. गावाचा चेहरा न बदलता अशी विकासाची गंगा येत असेल तर तिचं स्वागतच व्हायला हवं. हे सारं अर्थात तिथल्या रहिवाशांना विश्वासात घेऊनच. नाहीतर ‘रेव्ह पार्टी’ सारख्या धनदांडग्यांच्या चाळ्यांनी गावं बदनाम व्हायला वेळ लागणार नाही. प्रगतीमागून येणारी तिची पिलावळ वेळीच थोपवणं शेवटी आपल्याच हातात.

सव्वादहाला ट्रेक चालू केल्यामूळे झपाझप चालावं लागत होतं. अन्यथा सूर्याजीरावांच्या कोपाला तोंड द्यावं लागलं असतं. वाटेत एका काट्याने मला चांगलाच प्रसाद दिला. बुटाचं जाडजूड सोल भेदत थेट पायातच घुसला बेटा. नशिब फार लागलं नाही अन्यथा ट्रेकचा पार बोऱ्या वाजला असता. असाच रमतगमत आणि गप्पा मारत पण शक्य तितल्या जलदगतीने मार्गक्रमण करत ट्रेक चालू होता. वाटेत सावली दिसली म्हणजे दमही खात होतो. डिजीकॅमचा क्लिकक्लिकाटही चालू होता. तासाभराने एका छोटेखानी देवळापाशी आलो. शेंदूरचर्चित म्हणाव्या अशा मारुती आणि गणपती यांच्या मूर्त्या होत्या. शक्ती आणि बुद्धीचा संगम दाखवणारी ही जोडगोळी ट्रेक करताना बऱ्याचदा दृष्टीस पडते. त्यांना वंदन करुन पुढच्या वाटेला लागलो. ऊन्हाचा परिणाम आता दिसायला लागला होता. मंडळी रेंगाळायला लागली. तासाभरात माची गाठली. इथे जराशी चुकामुक झाली खरी, पण सुदैवाने फार वेळ गेला नाही. माचीवर चार पाच घरं आहेत. तिथे लिंबू सरबत आणि पोटपूजा झाल्यावर मंडळी ताजीतवानी झाली. मग पुन्हा चढाईला सुरुवात झाली. सव्वाच्या सुमारास प्रबळगड आणि कलावंतीण मधल्या खिंडीत दाखल झालो.

खिंडीतून समोर होणारं कलावंतीणीचं दर्शन घेतल्यावर ‘नावात काय आहे’ असं शेक्सपियर का म्हणाला ते कळतं. समोर दिसतो तो उभा चढ. पायऱ्या चटकन दिसून येत नाहीत. या कड्याला कलावंतीण असं का म्हटलंय देव जाणे. ते बघून नितीन आणि नाईकने खिंडीतच थांबण्याचा निर्णय घेतला. आम्ही बाकीचे दहा जण पुढे सरसावलो. पायऱ्या चढताना चांगलीच दमछाक होत होती. समोरच प्रबळगडाचे बेलाग कडे दिसत होते. पायऱ्या संपल्या आणि रॉक पॅचशी पोचलो. हा माथ्यावर जाण्याचा शेवटचा टप्पा. हा रॉक पॅच ट्रेकिंगची सवय नसलेल्यांना घाम फोडेल हे निश्चित. एकमेकांना मदत करत स्वतः रॉक पॅच तर चढलाच शिवाय आणखी एक ग्रुपलाही मदतीचा हात दिला. नाहीतर त्यांचा ट्रेक तिथेच आटपला असता. अर्थात या सगळ्याला अर्धा पाऊण तास लागला आणि दोनच्या सुमारास भगव्या ध्वजापाशी जाऊन पोचलो.

आटोपशीर अशा या गडमाथ्यावर बघण्यासारखं काही नाही. मात्र समोर मलंगगड ते माथेरान पर्यंतची डोंगररांग सुरेख दिसते. या रांगेतले म्हसमाळ, चंदेरी, पेब चटकन ओळखता येतात. अर्धा तास गडमाथ्यावर घालवून परतीच्या वाटेला लागलो. रॉक पॅचशी पुन्हा कसरत करत उतरलो आणि खिंडीत आलो. तिथे थोडा वेळ आराम करुन कलावंतीणीचा निरोप घेतला. मैफल असो की फ़ड, रंगात असतानाच संपवावा म्हणजे त्याच्या आठवणी चिरकाल मनात रुंजी घालत राहतात.

माची गाठायला अर्धा तास पुरेसा होता. पुन्हा एकदा जरासा विसावा घेऊन चारला परतीचा प्रवास चालू केला. रस्ता माहीत असल्याने चुकण्याचा प्रश्न नव्हताच. वाटेत येतानाच हेरून ठेवलेल्या एका उंच खडकावर फोटो काढून घेण्याची संधी मी दवडली नाही. (प्रत्येक ट्रेकला भारंभार फोटो काढण्यापेक्षा असा एखादाच हटके फोटो काढून घ्यायला आवडतं बुवा आपल्याला.) साडेपाचच्या सुमारास ठाकुरवाडीत दाखल झालो. आमचा सकाळचा रिक्षावाला आमची वाटच बघत होता. मग जेवणाचं पार्सल उचलून रिक्षात बसलो. अर्ध्या तासात पनवेल गाठलं. मग एका हॉटेलात थोडं जेवण आणि चहा उरकला. ग्रुप इथेच पांगणार होता. मुंबईची मित्रमंडळी रेल्वेने जाणार होती. मी आणि वैभव लाल डब्बा पकडायला डेपोत आलो. साडेसातची बस पकडली आणि नऊच्या सुमारास अर्थात अर्धा तास उशिराच घरात हजर झालो. एका छानशा ट्रेकचं सूप वाजलं.

याही ट्रेकचं फलित तेच. परतलो ते नवीन अनुभव, उत्साव आणि एनर्जी गाठीशी घेऊनच. तो आनंद आणि ती खुमारी काही औरच. डेस्कटॉपवरच्या कृत्रीम स्क्रीनसेव्हरला कंटाळलेल्या मनाला खर्याखुर्या निसर्गाची भेट घडली. या चौकटीत जगताना असे काही सुवर्णमध्य शोधावे लागतात. शेवटी लक्षात राहतात हे असेच क्षण. अखंड पसरलेल्या वाळवंटातल्या ओएसिससारखे. जगायला बळ देतात. ते सरलं की पुन्हा शिरायचं त्या निसर्गाच्या कुशीत आणि निसटून जात असलेले ते क्षण पुन्हा मुठीत भरून घ्यायचे. तो वाटच बघतोय आपले दोन्ही बाहू पसरून…!

— अभिजीत
OLYMPUS DIGITAL CAMERA

नाणेघाटाची सैर

naneghat1

हिरव्या पिवळ्या माळावरून”
हिरवी पिवळी शाल घ्यावी !
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी !

कविवर्य विंदांच्या या समर्पक काव्यपंक्ती. आकाश फाडत वर उसळलेले सुळके आणि अंगावर काटा आणतील असे भीषण कातळकडे..! रौद्रपणातही एक सौंदर्य असतं असं म्हणतात. त्याची पुरेपूर प्रचीती सह्याद्री भटकताना येते. नुकत्याच नाणेघाटाच्या भटकंतीत याच्या पुनःप्रत्ययाचा योग आला. परवाच साहित्य संमेलनात अध्यक्ष चित्तमपल्ली म्हणाले की “निसर्गाला शरण जा”. अशा भ्रमंतीत निसर्गापुढे आपण आपोआपच नतमस्तक होतो.

रोजची धावपळ आणि लोकलची दगदग..! पार वैतागलो होतो. कुठेतरी फिरून यायचं असा विचार केला. कंपनीतल्या इतरांनीही होकार दर्शवला आणि ट्रेकिंगचे बेत मनात शिजू लागले. नाणेघाटावर शिक्कामोर्तब झालं आणि शिलेदारांची जमवाजमव सुरु झाली. सात,आठ,दहा म्हणता म्हणता आकडा जेमतेम सहावर आला. पण जायचं नक्की होतं. एकोणतीस जानेवारीचा रविवार ठरला.

सकाळी पावणेसातला कल्याणला हजर झालो. बाकीची मंडळी जमेपर्यंत सव्वासात वाजले. मग चहापान आटपून साडेसातला विठ्ठलवाडी-नेवासा बसने कल्याण सोडलं. गाडीत मोजकेच प्रवासी होते. प्रवास अगदी आरामात झाला. पावणेनऊला टोकावडे गावात दाखल झालो. समोरच उत्तुंग डोंगररांगा दिसत होत्या. टोकावडे गावातच भजीची न्याहारी उरकली आणि पुढच्या वाटेला लागलो. गार वाऱ्याची सोबत मिळाली आणि आमचा ट्रेक खऱ्या अर्थाने सुरु झाला.असा गार वारा ऑफ़िसमधील ए.सी.ची सवय झालेल्या देहाला किती सुखद वाटतो हे काय वेगळं सांगायला हवं ? अशा हवेत चालण्याचा मुळीच कंटाळा येत नाही. आमचीही अशीच रमतगमत वाटचाल चालू असताना सहज वाटेने जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला हात दाखवला आणि तो थांबलाही. चालकाने मुळीच न कुरकुरता सर्वाना सामावून घेतलं. त्यामुळे काही वेळातच नाणेघाटाकडे जाणारी वाट दाखवणारा दगड आहे, तिथे पोचलो. किशोरने चालकाला पैसे देऊ केले पण त्याने नम्रपणे ते नाकारले. खेडेगावात सर्रास असे अनुभव येतात. त्याला धन्यवाद दिले. त्या ट्रॅक्टरवर एक मस्त फोटो काढून घेतला. ट्रॅक्टरवाल्याचा पत्ता लिहून घेतला आणि पत्त्यावर फोटो पाठवतो असं सांगून पुढे मार्गस्थ झालो.

नाणेघाटाची वाट चढणीची असली तरी तशी सोपी आहे. वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक बाण आपला रस्ता चुकलेला नाही याची खात्री करून देत असतात. मजल दरमजल करत पुढे चाललो होतो. जसजसं पुढे जावं तसा नाणेघाट आपला पसारा वाढवत चालला होता. दूरवर नानाचा अंगठाही नजरेत भरत होता. प्रत्येक गाण्यागणिक मैफल रंगत जावी आणि गायक खुलत जावा तसा नाणेघाट खुलत चालला होता आणि आमचा ट्रेक रंगत चालला होता.पण काही वेळातच ऊन्हाने आपली इनिंग सुरु केली, त्यामुळे चालण्याचा वेग थोडा मंदावला. पाण्याच्या बाटल्यांची देवघेव सुरु झाली. किशोरला चालण्याची नेहमीची सवय नसल्याने तो लवकर थकला. मग वाटेत एका जागी विसावलो. एव्हाना अकरा वाजत आले होते. पुरेशी विश्रांती झाल्यावर प्रवास पुन्हा सुरु झाला.आता वाटेत मोठाले दगड येऊ लागले होते. दळवीने लगेच नेहमीचा रस्ता सोडून आडवाटेने जाण्याचा नेहमीचा शिरस्ता सुरु केला.अखेर सव्वाबाराच्या सुमारास नाणेघाटाच्या तोंडाशी असलेल्या गुहेशी जाऊन थडकलो.
nanghat2
ही गुहा चांगलीच ऐसपैस आहे आणि बाजुच्या कुंडामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे. त्या पाण्याने सर्व जण पुन्हा ताजेतवाने झाले. गुहेत आणखी एक ग्रुप होता. त्यात महिलाही होत्या. त्यांनी बहुधा जेवणाचा बेत केला असावा. गुहेत भिंतीवर प्राचीन ब्राम्ही लिपित लेख कोरलेले दिसत होते. ते कमी म्हणून की काय, काही अर्वाचीन लिखाणकामही आढळले. आपल्या “प्रिय”जनांची नावे जागोजाग अगदी आठवणीने लिहिलेली होती. थोडा वेळ विसावा घेऊन पुढे निघालो.

दोन डोंगर कपारीतली ही प्राचीन वाट पार सातवाहन काळापासून वापरात असल्याचं मी वाचलं होतं. घाट संपल्यावर आपण एका भव्य पठारावर पोचतो. टोकाला जकातीसाठी ठेवलेला दगडी रांजण दिसतो.समोरच नाणेघाटाच्या चार पहारेकऱ्यांपैकी एक असलेला जीवधन किल्ला आणि त्याला खेटून असलेला खडा पारशी किंवा वानरलिंगीचा सुळका नजरेस पडतो. हडसर, चावंड आणि शिवनेरी हे बाकीचे तीन पहारेकरी आसपासच्या परिसरात आहेत. रांजणाच्या समोरच गजाननाची मूर्तीही दिसते. पठारावरून घाटघर गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे.घाटघरहून बसने जुन्नरला जाता येते.पुण्याहून येणारी ट्रेकर मंडळी याच मार्गाने येतात.पठारावरून दोन्ही सुळक्यांवर जाता येते. सुळक्यांवरून दरीचे विहंगम द्रुश्य दिसते. नानाचा अंगठा चढून गेलं की नवरा नवरी सुळके आणि दुर्ग ढाकोबाचे दर्शन होते.

थोडा वेळ सुळक्यावर भटकून खाली उतरलो. आता सपाटून भूक लागली होती. सुदैवाने जवळच जेवणाची सोय झाली. अन्यथा घाटघर गावापर्यंत चालत जावं लागलं असतं. श्री महादू रावते यांचेकडे जेवणाची सोय झाली. खरंतर जेवणाची वेळ कधीच टळून गेली होती, कारण दोन वाजत आले होते. पण रावत्यांनी चटकन बाजरीची भाकरी आणि बटाट्याच्या भाजीचा बेत आखला. जेवण तयार होईपर्यंत आम्ही अंगणात घोंगडीवर आराम करत पहुडलो. रावत्यांच्या गोठ्यात दोन सुंदर वासरे होती. त्याच्यासोबत खेळत आणि गप्पा मारत असताना जेवण आलंदेखील. मग यथेच्छ गरमागरम भाकरी आणि भाजीवर ताव मारला. चुलीवर शिजवलेल्या भाकरीची चव काही औरच. सोबत दही होतंच.
जेवण आटपेपर्यंत सव्वातीन झाले. मग लगोलग निघायची तयारी चालू केली. आठवणीने वासरांचे फोटो काढले . रावते कुटुंबाचाही फोटो काढला. जाताना आलेल्या वाटेनं न जाता दुसऱ्या वाटेने जायचं आधीच ठरलं होतं. मग रावत्यांकडून नीट वाट जाणून घेतली आणि साडेतीनच्या सुमारास परतीचा रस्ता धरला. भोरंड्याच्या नाल्यातून खाली उतरायचं होतं. ही काहीशी अनोळखी आणि अपरिचित वाट आहे. इथे मार्गदर्शक बाण नाहीत. शिवाय ही वाट फारशी मळलेलीदेखील नाही.त्यामुळे चुकण्याचा संभव होता. पण थ्रिल हवं होतं म्हणा किंवा सोप्या मराठीत खाज..!
घाटघरच्या दिशेने पुढे सरकून डावीकडे वळलो. इथून खाली उतरणारी वाट दिसते. ही बहुधा पाण्याची वाट असावी. वाटेत मोठाले दगड आणि झुडपं होती. नाणेघाटाच्या वाटेपेक्षा उतारही बराच होता. वाटेतल्या धनगरांना वाट विचारत पुढे निघालो. त्यांनी सतत उजवीकडे वळा, डावीकडे वळू नका असं बजावलं. ते लक्षात ठेऊनच वाटचाल चालली होती. पण कधी डावीकडे वळलो कुणास ठाऊक, कारण पुढे नीट वाट दिसेना. एव्हाना साडेपाच होत आले होते. आणखी अर्ध्या तासात रस्त्यावर पोचणं अपेक्षित होतं. पण पायाखालची वाट अचानक बंद झाली होती. आपण चुकलो हे लक्षात आलं. आता उन्हंही कलायला लागली होती आणि सावल्या पसरू लागल्या होत्या. आमच्याकडे विजेरी होती पण शक्यतो तिचा वापर न करता काळोख पडायच्या आत निघायचं होतं. थोडा विचार केला आणि पुन्हा उजवीकडे वर चढायला सुरुवात केली. इथे काट्यांचं रान होतं, तरीही त्यातून अंग काढत पुढे निघालो. झपझप चालायला सुरुवात केली. ही वाट तरी बरोबर होती की नाही कुणास ठाऊक..! घड्याळाचा काटा सहावर पोचला तशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. नाही म्हणायला दुरून रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांचे आवाज कानावर येत होते, पण रस्त्याकडे जाणारी वाट सापडत नव्हती. अखेर पंधरा मिनिटांनी पुलाकडे जाणारी वाट दिसली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. सव्वासहाच्या सुमारास रस्ता गाठला. चालतच फांगणे भोईरवाडीच्या स्टॉपवर पोचलो. सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा आणि समाधान दोन्ही दिसत होतं. थोड्या वेळातच टोकवड्याला जाणारी बस आली आणि परतीचा प्रवास सुरु झाला. टोकवड्याहून कल्याणला जाणारी बस पकडली. बसमध्ये चांगलीच गर्दी होती त्यामुळे उभ्यानेच प्रवास झाला. साडेआठला कल्याणला पोचलो. मग प्रत्येक जण आपापल्या वाटेने मार्गस्थ झाला.

अशा रितीने एक अविस्मरणीय यात्रा पार पडली. शरीर थकलं, पाय दुखले पण अनुभवाचं विश्व थोडंतरी सम्रुद्ध नक्कीच झालं असेल यात शंका नाही. “छातीसाठी ढाल” मिळाली की नाही ते माहित नाही पण आव्हानांना निधड्या छातीने सामोरं जायची ताकद कशी मिळते हे कळलं हेही काय कमी आहे !

— अभिजीत
naneghat3

हरिश्चंद्रगड

harish1


क्रिकेटमध्ये लॉर्डसचं म्हणून एक स्थान आहे, टेनिससाठी विम्बल्डनला एक वेगळाच मान आहे. सह्याद्रीतील गिरीभ्रमणाबाबत काय असं कुणी विचारेल तर मुंबई ठाणे पुण्यातील सह्यप्रेमी भटके तरी क्षणाचाही विलंब न लावता एकच नाव घेतील- ‘हरिश्चंद्रगड’. ठाणे, पुणे आणि नगर अशा तीन जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेल्या या गडाबद्दल बरंच ऐकलं, पाहिलं, वाचलं होतं. ट्रेकर्सची पंढरी असा नावलौकिक असलेल्या या जागेला नुकतीच माझ्या मित्रांसोबत भेट दिली आणि उमगलं की या सगळ्या वर्णनात अक्षराचीही अतिशयोक्ती नाही.
माघ वद्य त्रयोदशी अर्थात महाशिवरात्र यंदा शुक्रवारी आली असल्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसाची सुट्टी मिळाली आणि हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकचा किडा पुन्हा एकदा वळवळायला लागला. नेहमीचे ट्रेकचे मेंबर रोहित, नितिन, अभिलाष आणि वैभव वगैरे मंडळींनी प्लॅनिंगला सुरुवात केली. रविवारचा व्हॅलंटाईन डे चा मुहूर्त “काहींना”(त्यात माझा समावेश नाही, याची कृपया समस्त वाचक मुलींनी नोंद घ्यावी:-)) गाठायचा असल्याने शुक्रवारी सकाळी निघून शनिवारी संध्याकाळी परतायचा बेत होता. म्हणजे रविवारी आराम किंवा भेटीगाठी करून पुन्हा सोमवारी कंपनीत हजर..! हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर गावातील शिवमंदीरात आणि माथ्यावरील हरिश्चंद्रेश्वर मंदीरात बर्यापैकी गजबज असेल आणि चुकायचा वगैरे प्रसंग येणार नाही हे ओघाने आलंच. तसं बघायला गेलं तर मुंबई -कसारा-घोटी-राजूर-पाचनई – हरिश्चंद्रगड असाही मार्ग आहे, पण अस्सल भटक्यांची पसंती खिरेश्वर, नळीची वाट आणि साधले घाटाला..!
भगवान शंकर ही देवताच अजब. तिला भरवस्तीत, माणसांच्या समुदायात वगैरे वास्तव्य मुळी पसंदच नाही. एरव्ही भोळा सांब म्हणून ख्यातनाम असलेले बाप्पांचे हे तीर्थरूप भक्तांची परिक्षा बरोबर घेत असतात. कधी अमरनाथ सारख्या बर्फाळ दुष्कर जागी प्रकट होतील, कधी भीमाशंकर, कनकेश्वर सारख्या डोंगरमाथ्यावर, निबीड अरण्यात दर्शन देतील, तर कधी रामेश्वर, कुणकेश्वर सारख्या समुद्रकिनारी राहतील. पण एक आहे की भले तुम्ही शिवभक्त नसा, अगदी नास्तिक असा, पण कुठल्याही शिवस्थानाला भेट दिलीत की तुम्हाला निसर्गातल्या दैवी सामर्थ्याची, अगाढ सौंदर्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. मी महाशिवरात्रीचा उपास तापास वगैरे करत नसलो तरी अगदी नास्तिक वगैरे नाही. त्यामुळे ट्रेकींगचा स्वार्थ आणि झालाच तर थोडा परमार्थ असा एकंदर विचार करून संमती दर्शवली.

आदल्या दिवशी सर्व अनुभवी ट्रेकर मित्रांकडून गडाची व्यवस्थित माहिती घेतली शुक्रवारी सर्वांना लवकर कल्याण एस.टी. स्टँडवर यायला सांगितलं. ऑफिसातून घरी यायला साडे अकरा वाजले आणि तयारी करून झोपेपर्यंत शुक्रवार चालू झालेला होता. नेहमीप्रमाणे गजर लावून झोपी गेलो, पण ट्रेकची उत्सुकता काही झोप लागू देईना. शेवटी पाचचा गजर असताना साडेचारलाच उठलो. आमच्या समोरच शिवमंदीर असल्याने तिथे महाशिवरात्रीला भल्या पहाटेपासूनच भक्तांनी रांग लावलेली असते. मी कधीच या रांगेत वगैरे उभे राहण्याच्या भानगडीत पडत नाही. मंत्रांचे आवाज कानी पडत असतात. त्यामुळे जाग लवकर येते. सहा वाजता तयार झाल्यावर रोहितला फोन केला तर तो नुकताच उठत होता. मग कळलं की साहेबांनी सव्वासहा नव्हे तर सव्वासातची वेळ मुक्रर केली आहे. मग तासभर घरातली कामं आटपत बसलो. सातला घराबाहेर पडलो. मोबाईलमधली शिवमहिम्न स्तोत्राची एम.पी.थ्री चालू केली..
महिम्नः पारं ते परमविदुशो यत्रसदृशी
स्तुतीर्ब्रह्मादिनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः|
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिमाणावधि गृणन्
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः ||

पहाटेची वेळ, हवेच्या गार झुळुका आणि ट्रेकबाबतची उत्सुकता. कल्याणला पोचेपर्यंत तिघींनी छान सोबत केली.
सव्वासातला कल्याणला पोचायची फर्मान बजावणारी मंडळी आठ वाजले तरी उगवायचे नाव घेईनात महाराजा. गडपायथ्याला पोचायचे म्हणजे कल्याण -नगर मार्गावर माळशेज घाट ओलांडल्यावर खुबी फाट्यावर उतरावं लागतं. या प्रवासाला सुमारे अडीच तीन तास लागतात. गाड्या बर्याच असल्या तरी गर्दी पण होती. अखेर साडेआठला मंडळी उपस्थित झाली. आल्या आल्या मी त्याना चांगलंच फैलावर घेतलं. उशीर झाला तर उन्हात चढण्याचा त्रास होईल एवढाच प्रश्न होता. शेवटी पावणेनऊला परळ-अकोले बस पकडून आम्ही कल्याणहून निघालो. खुबी फाटा म्हणताच गडावर निघाले का असं ड्रायव्हरने विचारलं. ‘सॅटीस’मुळे झालेल्या कल्याणच्या ट्रॅफिक कोंडीतून मार्ग काढेपर्यंत नऊ वाजून गेले. मग एकदाचे मार्गाला लागलो. मुरबाड येईपर्यंत काँक्रीटची हिरवाईशी अटीतटीची स्पर्धा चालू होती. गाडीने मुरबाड ओलांडताच हळूहळू सिमेंट काँक्रीटचे नागरी रंग पुसट होत गेले आणि मातीचा परिचित तरीही दूर भासणारा गंध जाणवायला लागला. ड्रायव्हरने गाडी उभी केली थेट टोकवड्याला. मग इथे महाराष्ट्रीयन बर्गर अर्थात वडा-पावाचा आस्वाद घेतला. उपास असणार्यांना अर्थात वेफर्सवर समाधान मानवं लागलं. मागे नाणेघाटला जाताना इथे उतरलो होतो त्याची आठवण झाली. इथून काही अंतरावर नाणेघाटाला जाणारी वाट आहे. गाडी टोकावड्याहून पुढे निघाली तसे उजव्या बाजूला एकेक डोंगर मान वर काढल्यासारखे दिसू लागले. मुंबईच्या मॉल आणि उंच टॉवरच्या दुनियेत वावरणार्या आम्हाला जणू निसर्ग म्हणत होता ते बघा माझे स्कायस्क्रॅपर्स. गाडी हळूहळू माळशेज घाटाच्या कुशीत शिरली तसे ते आणखी खुलत गेले. आम्ही नेहमीप्रमाणे एकदम मागच्या सीटवर बसलो होतो. तिथुन मागच्या खिडकीतुन सहज मागे नजर गेली आणि भव्य अशी डोंगररांग नजरेस पडली. एकेक कडा असा घडवलेला की विचारता सोय नाही. अभिलाषने सॅकमधून कॅमेरा काढला आणि नुसते फोटो काढत सुटला. प्रत्येक वळणावर समोरची रांग अशी काही देखणी पोझ देई की जणू रॅम्पवरच्या मॉडेल्सच. ‘रौद्रपणात देखील सौंदर्य असतं’ म्हणतात ते काय उगाच. निसर्ग आणि विज्ञान जेव्हा हातात हात घालून विकासाची वाट धरतात तेव्हा माळशेज घाटासारखी सुंदर रचना जन्म घेते. अशा ठिकाणी जायचं आणि मानवाच्या कौशल्याचं कौतुक करतानाच निसर्गापुढे नतमस्तक व्हायचं. पण त्याऐवजी दारूच्या अधीन होऊन धिंगाणा घालणार्या काही मंडळींमुळे हे ठिकाण बदनाम होतं आहे. एका वळणावर एक ट्रक कडेला उलटलेला दिसला. ‘नजर हटी दुर्घटना घटी’ हेच खरं. गाडीतल्या एका सहप्रवाशाने दूर बोट दाखवून म्हटलं, “तो समोर दिसतोय तो हरिश्चंद्रगड”. फासले और कम हो रहे है, दूर से पास हम हम हो रहे है..!

घाट संपला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. काही वेळातच खुबी फाट्याला पोचलो. कंडक्टरने स्वतःहून माहिती दिली. बस मधून समोर नजर गेली आणि वाह’ असे उद्गार निघाले. समोर खिरेश्वरच्या छोटेखानी धरणाची भिंत, उजव्या हाताला निळंशार पाणी त्यावरून जाणारी वाट. साडे अकरा वाजले तरी मस्त हवा येत होती. महाशिवरात्रीनिमित्त खिरेश्वर आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिरात जाणार्या लोकांनी भरभरून गाड्या जात होत्या. आम्ही अडीच तास बसून आखडलेल्या पायांना कामाला लावायचं ठरवलं. हा चार किलोमीटरचा रस्ता पार करायला तासभर लागतो. मी घाईघाईत पुढे निघालो आणि वाटेवरच्या खिरेश्वर मंदिरात जाऊन आलो. गर्दी असल्याने मंदिरात जाता आलं नाही पण जत्रेचा फील मात्र आला. हे मंदिरदेखिल बरंच जुनं असावं. तिथून पुन्हा रस्त्यावर आलो आणि चालत चालत खिरेश्वराला पोचलो. बाकीच्यांना शोधण्यासाठी मोबाईलवर फोन कारावा म्हटलं तर रेंजच नाही. आता यांना शोधणार कसं असा विचार करत पुढे चालत राहिलो. तोलारखिंडीकडे जाणार्या वाटेवर गाड्या आणि माणसांची चांगलीच वर्दळ दिसत होती. सुदैवाने फारसा शोध घ्यावा लागला नाही. मंडली उसाच्या रस पीत बसली होती. तिथे दुपारच्या जेवणाचे जिन्नस सोबत घेतले आणि साधारण दीडच्या सुमारास तोलारखिंडीकडे कूच केलं. तोलारखिंडीच्या पुढे गडावर जाण्यासाठी सुमारे सहाशे फूट उंचीचा रॉक पॅच चढावा लागतो. तिथे वरुन दर्शन घेऊन परतणार्या भाविकांमुळे चांगलीच गर्दी झाल्याचं कानावर येत होतं. वाटेवर लोक भेटत होतेच, त्यामुळे वाट वगैरेविचारण्याचा प्रसंग आला नाही. झपाझप पावले टाकत खिंडीत दाखल झालो. अडीच वाजले असावेत. तोलारखिंडीतून समोर जाणारी वाट कोतूळ गावी जाते. गडावर जाण्यासाठी डावीकडची वाट पक डायची. इथे एक शेंदूर फासलेले व्याघ्रशिल्पही दिसते. रॉक पॅचपाशी पोचलो तेव्हा एकच गर्दी झालेली दिसत होती. सुदैवाने एका स्वयंसेवी संस्थेचे काही लोक लोकांआ चढा-उतरताना मार्गदर्शन करताना दिसत होते. त्यामुळे शिस्तीत सगळं चाललं होतं. गर्दीत अनेक वयस्कर माणसं दिसली. मग जाणवलं आपण एवढ्या वयाचं झाल्यावर आपल्याला हे असं झेपेल का? सह्याद्रीची ओढ राहील हे नक्की, पण ट्रेक वगैरे जमेल की नाही कुणास ठाऊक..! मजल दरमजल करत, उतारावर तोल सावरत तास दीड तासच्या पायपीटीनंतर एकदाचा तो रॉकपॅच सर झाला. वर नशिबाने सरबताची सोय होती. थोडं बरं वाटलं सरबत प्याल्यावर. आता चढणीची वाट नव्हती, पण मंदिराला जाण्यासाठी आणखी तासभर चालायचं होतं. लगेच पुढे निघालो. ही वाट बालेकिल्ल्याला वळसा घालून जाते. जमलं तर उद्या इथे येऊ असा विचार केला. पावलांचा वेग जरा वाढवला आणिअलं मंदिरापाशी पोचलो तेव्हा जवळ जवळ साडेचार झाले होते. मंदिर पताकांनी सजवलेले होते. कळसावर ध्वज फडकत होता. भाविकांची दाटी दिसत होती. एकदम जत्रेचा माहोल. छोटी छोटी दुकानं मांडलेली दिसत होती. तंबू राहुट्या दिसत होत्या. मुख्य मंदिरात गर्दी असल्याने तोवर शेजारच्या बाल गणेशाचं दर्शन घेतलं. समोर तारामती शिखर लक्ष वेधून घेत होतं. या शिखराच्या पायथ्याला बर्याच गुहा आहेत. तिथेच कुठेतरी आज रात्री मुक्कम करायचा होता. इथेच चांगदेवांनी तप केलं होतं म्हणतात. समोरच पुष्करणी दिसत होती. तिच्यात स्नान करण्यासाठी झुंबड उडाली होती. बरीच ट्रेकर मंडळीही दिसत होती. एका बदलापूरच्या ग्रुपची ओळख झाली. त्यांनी आदल्या दिवशी येऊन सगळी सजावट वगैरे केली होती. समोरच्या तारामती शिखरावरही नवा भगवा ध्वज उभारला होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता सूर्यास्ताची वेळ जवळ यायला लागली तसे लगेच कोकणकड्याकडे निघालो. रायगडाचे टकमक टोक, लोहगडाचा विंचूकाटा, राजग़ड तोरण्यावरच्या माच्या तशी कोकणकडा ही हरिश्चंद्रगडाची खासियत. यू.एस.पी. म्हणा हवं तर..!
harish2
कोकणकडा मंदिरापासून साधारण पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. अर्धा किलोमीटर पसरलेला वाटीसारखा अंतर्वक्र आणि सुमारे सतराशे फूट खोल असलेला कोकणकडा म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार आहे. निसर्गाने कुठल्या विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे कुणास ठाऊक, पण तोंडात बोटं घालायला लावतो खरंच. इथे वाराही भरपूर. खालच्या दरीत गवताची हलकीशी पेंढी किंवा कपडा वगैरे टाकला तर वार्याच्या झोतासरशी पुन्हा वर येतात. पावसाळ्यात तर या दरीत आणि एकंदरीत गडपरिसरात इतके ढग असतात की दिसणं मुश्किल होतं. पावसाळ्यात इथे इंग्रज सेनापती कर्नल स्पाईक्सला इंद्रवज्र अर्थात पूर्ण ३६० अंशातलं इंद्रधनुष्य दिसलं होतं. पावसाळ्यात इथे फेरी मारणार्या काही नशिबवान लोकांना ते दिसतंही. सूर्यास्त होईपर्यंत कोकणकड्यावर होतो. इथून दिसणारी सह्याद्रीची रांग लाजवाबच. सूर्यास्तापूर्वी सोनेरी रंगात न्हाऊन निघणारा कोकणकडा सूर्यास्तानंतर करड्या रंगात दिसतो. हा रंगाचा खेळही बघण्यासारखाच. सूर्यास्त आटोपल्यावर परत मंदिराकडे परतलो. रात्रीच्या निवार्याची सोय करायची होती. गुहेत मुक्कामाची ही दुसरी खेप. याआधी मी लोहगडच्या गुहेत मुक्काम केला होता. आता अंधार पडत चालल्याने शेकोट्या पेटल्या होत्या. मंदिरात दिवे पेटले होते. भजन किर्तन चाललं होतं. पुष्करणीतलं पाणी फारच अस्वच्छ होतं, म्हणून शास्त्रापुरते पाय धुतले आणि मंदिरात आलो. हरिश्चंद्रेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. शेजारच्या टाक्यातून पिण्यासाठी पाणी भरून घेतलं आणि गुहेच्या शोधात निघालो. चांगलाच अंधार पडला होता. बाहेरचं दृष्य बघून ऐतिहासिक पौराणिक मालिकेतील रात्रीचं दृष्य आठवत होतं. वर आकाशात अक्षरशः शेकड्याने तारे दिसत होते. नेहरू तारांगणात दिसतात तसे. समोरच्या गणेश गुहेत जागा मिळाली. तिथे आधीच एक कुटुंब आणि बाकी काही मंडळी होती. पण आम्ही तिथेच थोडीफार जागा बघून विसावलो. आता पायांनीही ते दमले असल्याची जाणीव करुन द्यायला सुरुवात केली. भूकही लागली होती. मग साबुदाण्याची खिचडी, राजगिर्याचे लाडू, चिवडा वगैरे जिन्नस बाहेर पडले. एकादशी नी दुप्पट खाशी तसला प्रकार. खाऊन आटोपल्यावर पुन्हा बाहेर जाण्याचा बेत रद्द केला आणि झोपायच्या तयारीला लागलो. गुहेत फारशी थंडी वाजत नव्हती. अंथरूण पांघरूणं होतीच. डासांचा त्रास नव्हता, बहुधा त्यांचाही महाशिवरात्रीचा उपास असावा..! पण गुहेतल्या अनेक “महंमद घोरी”मुळे धड झोप मिळाली नाही. आधीच जागा कमी, त्यात पाठीला टोचणारी खालची जमीन आणि हा आवाज. पुन्हापुन्हा जाग येत होती. अखेर वैतागून रात्री अडीचला उठलो आणि दुसरीकडे जाऊन झोपलो. अंथरूण आधीच बाकिच्यांनी बळकावल्यामुळे पांघरुणच खाली अंथरावं लागलं आणि पांघरुणाशिवाय तसाच कुडकुडत झोपलो.
सकाळी बाकीची मंडळी उठल्यावर मी कालची शिल्लक झोप उरकली. वैभव, अभिलाष, नितीन वगैरे मस्त झोप मिळाल्याने भटकायला बाहेर पडले होते. ते येईपर्यंत मी आजूबाजूच्या गुहांत चक्कर मारून आलो. तिथल्या गुहांना बुबुर खाना, साहेबाची गुंफा आणि गणेशाची गुंफ़ा अशी नावं आहेत. आम्ही मुक्काम केला त्या गणेश गुहेत गणपतीची भली थोरली मूर्ती होती. खालच्या बाल गणेश मंदिरातील मूर्तीसारखीच. गुहेबाहेरच्या टाक्यातील पाण्याने फ्रेश झालो. मग हॉटेल तारामतीकडे मोर्चा वळवला. इथे चहा पोहे असा नाश्ता आटपून पुन्हा मंदिरापाशी आलो. सकाळच्या उन्हात मंदिरावरील नक्षीकाम छान दिसत होतं. जवळच्या केदारेश्वराचे दर्शन घेतले. केदारेश्वराच्या मंदिरात फूटभर उंचीचे आणि घेराचे असे भव्य शिवलिंग आहे. पिंडीच्या सभोवती खंदक आहे. खंदकातील पाणी थंडगार असते. त्या पाण्यातूनही भाविक पिंडीला प्रदक्षिणा घालत होते. आम्ही लांबूनच नमस्कार केला. थोड्या वेळातच पालखीची मिरवणूक निघाली. पालखीत शंकराच्या धातूच्या मूर्तीसोबत हरिश्चंद्र, तारामती यांचे मुखवटे विराजमान होते. भजनात मंडळी तल्लीन होऊन नाचत होती. मला पंढरीच्या वारीची आठवण झाली. ही सुद्धा ट्रेकर्सची पंढरीच नाही का..!

मग मोर्चा वळवला तो तारामती शिखराकडे. ४८०० फूट उंचीवरचे हे सह्याद्रीतील दुसर्या क्रमांकाचे शिखर. अर्ध्या तासातच शिखरावर पोचलो. इथून खालचा खिरेश्वरचा परिसर दिसतो. तसेच समोरच्या माळशेज घाटातील वळणेही. काल आलो तो रस्ताही दिसत होता. वरून खालचे मंदिर आणि पालखी दिसत होती. आता प्रसादाच्या पंगती बसायला लागल्या होत्या. शिखरावर कालच उभारलेला भगवा ध्वज फडकत होता. शिखरावर देखिल एक छोटेसे शिवलिंग दिसते. मनसोक्त फोटो काढुन बालेकिल्ल्याच्या वाटेला लागलो. अर्ध्या तासाच्या पायपीटीनंतर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी आलो. एक वाट बालेकिल्ल्याच्या शेजारून पुढे जात होती. ही जुन्नर दरवाज्याची वाट असावी. बालेकिल्ल्याची वाट निसरडी वाटत होती. म्हणून मग मी आणि रोहित असे दोघेच पुढे निघालो. बाकिचे परतीच्या वाटेवर वाट बघत थांबणार होते. आम्ही निसरड्या वाटेवरुन पडक्या बुरुजापर्यंत वर चढलो. पुढची वाट धड दिसत नव्हती आणि सकाळपासून बरंच चालणं झालं होतं. त्यामुळे बालेकिल्ल्याचा नाद सोडून खाली उतरलो. नंतर वाटेत भेटलेल्या गावकर्याकडुन कळलं की आम्ही भलत्याच वाटेने प्रयत्न करत होतो. काही अपघात वगैरे झाला नाही हे नशीब. मग परतीच्या वाटेला लागलो. वाटेत बाकीचे भेटले. एका ठिकाणी थंडगार लिंबू सरबत घेऊन निघालो. एव्हाना दीड वाजला होता. आता रॉकपॅचवर गर्दी नसल्याने झपाझप उतरलो. मग तोलारखिंडीतून तासाभरात खिरेश्वरला हजर झालो. आज वाट सुनसान होती. कालची गजबज एकदम गायब. तिथून टेंपो पकडुन खुबी फाट्यापर्यंतचा प्रवास. खुबी फाट्याला लगोलग कल्याणला जाणारी बस मिळाली आणि माळशेज घाटातून मुरबाडमार्गे साडेसहाला कल्याणमध्ये दाखल झालो. मग लोकलने डोंबिवली आणि साडेसातला घर..!

बरेच दिवस मनात रुंजी घालत असलेला ट्रेक अखेर झालाच. या ट्रेकची नशा काही औरच. माळशेजची सफर, खिरेश्वर, गुहेतला मुक्काम आणि कोकणकड्यावरचा सूर्यास्त. काहीच न विसरता येण्याजोगं. कोकणकडा, तारामती शिखर, केदारेश्वर मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात मुक्काम करून राहणार आहेत. हरिश्चंद्रगडाचं सगळंच अविस्मरणीय. कोकणकड्याची भव्यता, तारामती शिखराची उंची, डोळ्यात न मावणारा गडाचा आवाका, आभाळाशी स्पर्धा करणारे सह्याद्रीचे कडे, त्यातून बेभान वाहणारा वारा आणि या सगळ्याचा स्वामी हरिश्चंद्रेश्वर. इथला निसर्ग तुम्हाला वेड लावतो आणि स्वतःलाच विसरायला लावतो. इथल्या कड्यांचा दुरुन दिसणारा रंगही काळासावळा, अगदी पांडुरंगासारखा. उगाच नाही याला ट्रेकर मंडळींची पंढरी म्हणत. या पंढरीचे वारकरी व्हायला कुणालाही आवडेलच, नाही का?

— अभिजीतhumpaanch