’हळवेपण’ या मराठी अल्बमच्या प्रकाशनावेळी संदीप खरे यांनी दिलेली दिलखुलास दाद

’हळवेपण’ या मराठी अल्बमच्या प्रकाशनावेळी संदीप खरे यांनी दिलेली दिलखुलास दाद

अभिजीत दाते – सुधांशु जोशी या कवी-संगीतकार जोडीच्या ’हळवेपण’ या मराठी अल्बमचे प्रकाशन संदीप खरे यांच्या हस्ते डोंबिवली येथे झाले. त्यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी अल्बमला आणि कलावंतांना दिलखुलास दाद दिली आणि शुभेच्छा दिल्या.

या अल्बमची गाणी रसिकांसाठी मानबिंदू या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

’हळवेपण’ या मराठी अल्बमविषयी संगीतकार सुधांशु जोशी

अभिजीत दाते – सुधांशु जोशी या कवी-संगीतकार जोडीच्या ’हळवेपण’ या मराठी अल्बमचे प्रकाशन संदीप खरे यांच्या हस्ते डोंबिवली येथे झाले. या अल्बमबाबत सुधांशुने आपले मनोगत व्यक्त केले.

या अल्बमची गाणी रसिकांसाठी मानबिंदू या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

‘हळवेपण’ अल्बम प्रकाशन सोहळा..

कळविण्यास आनंद वाटतो की, मी आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा ‘हळवेपण’ हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय, डोंबिवली येथे पार पडणार आहे.

आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण..!

'हळवेपण' अल्बम प्रकाशन सोहळा..

ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण..!

gudiगुढीपाडवा आणि नववर्षानिमित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

या पाडव्याला ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण होतायत. वाचणार्‍यांचा उमेद वाढवणारा प्रतिसाद आणि स्वच्छंदी लेखनात मिळणारा निखळ आनंद यामुळे माझ्या आरंभशूरतेला हा ब्लॉग अपवाद ठरला असं म्हणावं लागेल. हे श्रेय आणि जितकं अधुनमधुन डोकं वर काढणार्‍या लेखकाचं, तितकंच वाचकांचंही.

अशीच या ब्लॉगची वाटचाल चालू राहो इतकीच सरस्वतीचरणी प्रार्थना..!

“मी कुठे म्हटलं “माझी” कविता आहे !
तोच एक लिहीता आणि लिहविता आहे.
शब्द, छंद त्याच्याच लेखणीतूनच उतरून येतात,
रिताच मी अन कागदसुद्धा रिताच आहे..!

आपलाच,

अभिजीत

पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा — marathigazal.com

मराठी गझल  सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे  आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तेव्हा गझल चाहत्यांनी जरूर भेट देऊन गझलांचा आस्वाद घ्यावा.

दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नविन भाग ऐकायला मिळेल तेव्हा दर आठवड्याला भेट द्यायची विसरू नका… 🙂

गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!

 नूतन वर्षाभिनंदन..!

gudhi

नमस्कार,

गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!

गुढीपाडव्याची आणखी एक आठवण म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी या ब्लॉगचा आरंभ झाला. एक गुढीच उभारली म्हणा ना..!  सुदैवाने या उपक्रमाला नेहमीच्या आरंभशूरतेचं ग्रहण लागलं नाही. तुमच्या उमेद वाढवणार्‍या, प्रोत्साहन देणार्‍या प्रतिक्रिया दर वेळी नवीन पोस्ट टाकण्याचं बळ देत राहिल्या. आणि हा हा म्हणता वर्ष उलटलं. प्रत्येक नवीन पोस्ट टाकताना उत्साह आणि तुमच्या प्रतिक्रियांबद्दलचं कुतुहल अशा संमिश्र भावना मनात पिंगा घालत राहिल्या आणि पुढेही घालत राहतील. या निमित्ताने बर्‍याच नवीन ओळखी झाल्या. त्यांचे मार्गदर्शन आणि सुचनावजा प्रोत्साहन या भांडवलावरच या ब्लॉअची वाटचाल पुढे चालू राहिली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जोवर हे असं मातृभाषाप्रेम शाबूत आहे तोवर मराठीला नामशेष होण्याची भीती नाही.

असंच बर्‍यापैकी लिखाण पुढेही माझ्या हातून घडो आणि तुमच्या सूचना, प्रतिक्रिया अशाच मिळत राहोत हीच सरस्वतीच्या चरणी प्रार्थना..!

जाता जाता एवढंच म्हणेन की…

“मी कुठे म्हटलं “माझी” कविता आहे !
तोच एक लिहीता आणि लिहविता आहे.
शब्द, छंद त्याच्याच लेखणीतूनच उतरून येतात,
रिताच मी अन कागदसुद्धा रिताच आहे..!

आपलाच,

अभिजीत

आणि येतो पावसाळा…!

sudden-rain_jr29054.jpg   

      

        मे महिना सरत आलेला असतो, आसमंतातला उकाडा आता शिगेला पोचलेला असतो आणि त्याची चर्चा सुरु होते. तो कुठवर आलाय? अजुन किती दिवस लागतील? वर्तमानपत्रात त्याच्या बातम्यांकडे डोळा लागलेला असतो. तसा कुठे कुठे तो आपली वर्दी देत असतोच. आणि एक दिवस “दक्षिण दिग्विजय” करुन जेत्याच्या थाटात तो दाखल होतो. उन्हाचे पहारे हा हा म्हणता उठतात आणि अनभिषिक्त राजाच्या दिमाखात त्याची सद्दी सुरु होते.
        मी मान्सून बद्दल बोलतोय हे एव्हाना लक्षात आलं असेलच. उन्हाच्या काहिलीने मन सुनं सुनं झाल्यावर येतो तो मान्सून. अर्थात पाऊस. निसर्गचक्राचा सृजनशील आविष्कार. सुर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ़ होते. हलकी असल्याने ती वर वर जाते. या वाफ़ेचे ढग बनतात. हे ढग डोंगरांमुळे अडतात आणि थंडाव्यामुळे वाफ़ेचं पुन्हा पाण्यात रुपांतर होतं, हाच पाऊस असं आपण शाळेत घोकंपट्टी करत शिकलेलं असतं. पण या ऋतुचक्राला गदिमांसारखा सिद्धहस्त कवी  आपल्या प्रतिभेने एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो …

  नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर
  कशी शहाण्यांची मनं , नाही नदीला माहेर !
  काय सांगू बाप्पांनो, तुम्ह आंधळ्याचे चेले
  नदी माहेरा जाते म्हणून तर जग चाले .
  नदीचे सारे पाणि पोटी घेतो हा सागर
  पण तिला खुणावतो जन्म दिलेला  डोंगर           
  डोंगराच्या मायेसाठी रूप वाफ़ेचे घेऊन
  नदी उडत जाते पंख वार्‍याचे लेवून
  पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा
  पान्हा फ़ुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा…! 

         
         अगदी पहिल्या सरीपासूनच हा पाऊस आपल्याला प्रेमात पाडतो. पहिल्या पावसानंतर येणार मृद्गंध… जणू प्रसवाला सज्ज झालेल्या धरित्रीचा हुंकार…!  टपोर्‍या थेंबांना पाहून कुणा युवतीच्या पायातील पैंजणांची आठवण व्हावी …
 दोन्ही आवाजात तेच माधुर्य आणि तेच अंगावर सुखद शिरशिरी आणणं …!

          पण शहरवासीयांसाठी पाऊस महत्त्वाचा असतो फ़क्त धरणातल्या पाणीसाठ्यासाठी किंवा एखाद्या वर्षा सहलीपुरता. तसा वागला की मग तो अगदी आज्ञाधारक ठरतो. पण त्याने जरासा खट्याळपणा सुरु केला की मग तारांबळ उडवून देतो. मग हीच मंडळी पावसाच्या नावाने बोटं मोडायला सुरुवात करतात. अशाच दोन विचारातला वाद कवी सौमित्र यांनी भांडणार्‍या प्रेमी युगुलाच्या निमित्तानं छानच टिपलाय…

                   पाऊस म्हणजे चिखल सारा , पाऊस म्हणजे मरगळ..
                   पाऊस म्हणजे गार वारा , पाऊस म्हणजे हिरवळ..

                   पाऊस कपडे खराब करतो , पाऊस वैतागवाडी..
                   पाऊस म्हणजे भिजरी पायवाट , पाऊस म्हणजे झाडी..

                   पाऊस रेंगाळलेली कामं , पाऊस म्हणजे सुट्टी उगाच..
                   पावसामध्ये गुपचुप निसटून मन जाऊन बसतं ढगात …

         प्रेमी युगुलांसाठी पाऊस म्हणजे पर्वणीच. एकाच छत्रीतून एकमेकांना सावरत, एकमेकांच्या नजरेत हरवत भिजत भिजत भटकण्याची लज्जत काही औरच…! अचानक वीज चमकते आणि ती घाबरुन अलगद त्याला बिलगते आणि तोही आपल्या स्पर्शाने तिला दिलासा देतो. किती रोमॅंटीक..! ” प्यार हुआ , इकरार हुआ ” किंवा “लगी आज सावन की फ़िर वो झडी है”  सारखी गाणी नकळत ओठावर येतात. मराठीत सुद्धा “घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा”  , “भेट तुझी माझी स्मरते”  किंवा “ऋतू हिरवा” सारखी श्रवणीय गाणी आहेतच. अशा कितीतरी गाण्यांतून, कवितांमधुन पाऊस आपल्याला चिंब भिजवत आला आहे.
          पण इथे भिजायला वेळ आहे कुणाला ! ऑफ़िसच्या एसीची सवय झालेल्या जीवाला थंडगार पावसाळी वारं सोसत नाही. सदानकदा इस्त्रीच्या कपड्यात वावरणारे आम्ही… आम्हाला त्यावर पावसाचे शिंतोडे उडालेले खपत नाहीत. दोन शिंका आल्या म्हणजे आम्ही डॉक्टरकडे धाव घेणार. आमच्या खिडकीच्या काचा बंद करून घेणार.” घराने मला आज समजावले, भिजुनी घरी रोज परतायचे”  या ओळी आम्ही कधी अनुभवणारच नाही. मग पाऊस आम्हाला जीवाभावाचा वाटणारच कसा !  आणि आमच्या रूक्ष जीवनात नवी पालवी तरी कुठुन फ़ुटावी ! असंच कोरड्याने जगत राहणार की मोठेपणाची झूल बाजुला ठेवून दोन सरी झेलणार !

                 स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा
                 आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस हा…
                 दरवळे देहात कोणी रोजच्या वळणावरी
                 नित्य नव्या उंबर्‍याशी वाढतो पाऊस हा…
                 वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी
                 अन् मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊस हा…

         तो आपली इनिंग सुरु करेलच आता . बघा आपल्या खिडकीची काच थोडी उघडता आली तर…

         पहिल्या पावसाच्या तुम्हाला ओल्याचिंब शुभेच्छा…!
         ……     अभिजीत दाते

१८५७ चे स्वातंत्र्यसमर

1857

      १० मे २००७ . स्वतंत्र भारत देशात श्वास घेणार्‍या आपल्या जनतेपैकी फ़ार कमी लोकांना हे ठाऊक असेल की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्याचा पाया दीडशे वर्शांपूर्वी या दिवशी घातला गेला . “शिपायांचे बंड” म्हणून इंग्रजांनी हेटाळलेल्या , पण पुढे “हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्यसमर” म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गौरविलेल्या एका लढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे याच दिवशी फ़ुंकली गेली . मंगल पांडे नावाच्या ठिणगीने उठलेल्या या आगीने पाहता पाहता वणव्याचे रूप धारण केले आणि इंग्रजी राज्य भस्मसात होऊन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती . ही आग शमवण्यात इंग्रजांना यश आलं असलं तरी याच आगीतून पुढे क्रांतीचे निखारे फ़ुलले . झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई , श्रीमंत नानासाहेब पेशवे , बहादूरशहा जफ़र, अवधची बेगम हजरतमल , कुंवरसिंग, रंगो बापूजी आणि सेनापती तात्या टोपे अशी अनेक तेजस्वी ज्वाळा या वणव्यातून उठल्या आणि पुढे अनेक अनाम वीरांनादेशकार्यासाठी प्रेरणास्त्रोत बनून गेल्या .
      केवळ अपयशी ठरला म्हणून या उठावाचे महत्त्व कमी होत नाही . हिंदु मुस्लिम ऐक्याचे आगळे दर्शन या निमित्ताने घडले . दुर्दैवाने आपण ते टिकवू शकलो नाही . आज या घटकेला त्याची निकडीची गरज निर्माण झाली आहे . या लढ्याची आणि त्यातल्या लढवय्यांची जेवढी दखल खुद्द इंग्रजांनी घेतली , तितकी आपल्याला कधी घ्यावीशी वाटली नाही . याचा अर्थ आपण या वीरांना विसरलेलो आहोत असा नाही . स्मारकं उभारून आणि चौक, रस्ते इत्यादींना नावे देऊन त्यांची स्मृती केवळ कागदावरच किंवा भाषणापुरतीच कशी राहिल याची पुरेपुर काळजी सत्ताधार्‍यांनी घेतलेली आहे . म्हणूनच राणी लक्ष्मीचे गोडवे गाणार्‍या समाजात स्त्री भ्रूणहत्या सर्रास घडताना दिसतात . “पुराणातली वांगी पुराणात” तद्वत “इतिहासातली वांगी इतिहासात” असंच चित्रदिसतं . शिवाजी आणि लक्ष्मी जरूर जन्मावेत पण शेजारी अशी आपली मनोवृत्ती झालेली आहे . या पार्श्वभूमीवर १८५७ च्या वीरांचे स्मरण न करणे हा करंटेपणा ठरेल . हा उठाव चेतवला तो कुणा राजा रजवाड्याने नव्हे , तर मंगल पांडे , एका साध्या शिपायाने . थोडक्यात सामान्यातूनच अशा असामान्य पर्वाचा आरंभ होतो हे वास्तवनक्कीच प्रेरणादायी आहे .
     या स्वातंत्र्ययुद्धातला एक काळजाला चटका लावणारा पण तितकाच बाणेदार प्रसंग असा…
     या स्वातंत्र्ययुद्धातला चिरडण्यात ब्रिटिशांना यश आल्यावर कैदेत असलेल्या शेवटच्या बादशहाला, बहादूरशहा जफ़रला त्याचे हुजरे कुचेष्टेने एक तबक पेश करतात . त्यावरचे मखमली आच्छादन बाजूला केल्यावर बादशहाला आपल्या दोन पुत्रांची मस्तके दिसतात . हुजरे जफ़रला म्हणतात की हिंदुस्थानची तलवार आता शांत झाली आहे . त्यावर त्या बहादूरशहाने त्या प्रसगातही धीरोदात्तप असे उद्गार काढले की ,

             “वादीयों मे लू रहेगी जब तलक ईमान की
             दिल्ली क्या लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की..!”

    आज वादीयां तशाच आहेत , तेग सुद्धा आहे . पण देशाभिमानची झुळुक वाहत नाही ही आमची  शोकांतिका..!

“जय हिंद”

 —         अभिजीत दाते
   
  
   

“दख्खनची राणी” नि “घाटाचा राजा”

vinod

      मुंबई आणि पुणे या दोन संस्कृत्यांना जोडणारा प्रमुख दुवा म्हणजे ‘डेक्कन क्वीन’ . तशा या मार्गावरून आणखी बर्‍याच गाड्या धावतात , पण डेक्कन क्वीनचा रूबाब काही औरच . “दख्खनची राणी निघाली खुशीत , शेकडो पिल्ले तिच्या कुशीत ” असं तिचं वर्णन एका काव्यात वसंत बापट यांनी केलं आहे . या राणीचा डौल एरव्ही असेल मोठा , पण गेल्या रविवारी डोंबिवलीच्या “घाटाच्या राजा”पुढे अंमळ फ़िकाच पडला .

      मुंबई – पुणे सायकल शर्यतीचा एकेकाळचा विजेता आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटू डोंबिवलीकर विनोद पुनामियाने पुणे – डोंबिवली हे १४० किमीचे अंतर २ तास १४ मिनिटे आणि ५० सेकंदात पार करून दख्खनची राणीला तब्बल १८ मिनिटांनी मागे टाकलं . सकाळी सात दहाला पुण्याहून निघालेली विनोदची सायकल डोंबिवलीला येऊन थडकली आणि आधीच उत्साहप्रिय डोंबिवलीकरांनी जल्लोषात त्याचं स्वागत केलं . ठाण्याचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांच्या हस्ते पुनामियांचा सत्कार करण्यात आला .

      पुनामियांनी हे अंतर किती वेळात पार केलं आणि नेमक्या किती फ़रकाने डेक्कन क्वीनला हरवलं या तपशीलापेक्षा हा विक्रम करताना पन्नाशीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांच्यातील जिद्द , मेहनतीची तयारी आणि इच्छाशक्तीला सलाम ठोकायला हवा . विशी तिशीची उमरच आव्हानं पेलण्याची नसते तर पन्नाशीतही मनात जिगर असेल तर आव्हानं पेलता येऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं . त्यांच्याकडून हा बोध घ्यायला काहीच हरकत नाही . शेवटी वय शरीराला असतं जिद्द , इच्छाशक्तीला नव्हे हेच खरं . क्रिकेट एके क्रिकेटने नादावलेली तरूणाई सायकलिंगच्या अशा आव्हानात्मक खेळाकडेही वळली तर पुनमियांची ही गवसणी खर्‍या अर्थाने यशस्वी ठरेल, नाही का ?

मराठी गज़लेची नवी भरारी – मराठीगज़ल.कॉम

        “केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली” किंवा “सुन्या सुन्या मैफ़लीत माझ्या” सारख्या गज़लांनी आपल्या मनावर आजतागायत गारूड केलेलं आहे. माधव ज्युलियनांनी मराठीत लावलेलं हे गज़लेचं रोपटं पुढे अनिल, पाटणकर आणि अर्थातच सुरेश भट यांच्यामुळे फ़ोफ़ावलं. याच गज़लेला आणखी एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी तिला महाजालाचं दालन खुलं करुन दिलंय प्रसाद शिरगावकर आणि वैभव जोशी यांनी.
         गज़ल कशी लिहावी यावर मार्गदर्शनापासून ते पोस्ट झालेल्या रचनांवर चर्चा अशा विविधांगाने हे संकेतस्थळ सजलं आहे. सोबत “गज़लेची बाराखडी” हे भटांचं विवेचन आहेच. मग कधी भेट देताय मराठीगज़ल.कॉमला ? मराठी गज़लेला तुमची दाद हवी आहे..!