तक्रार..

काही दिवसांपूर्वी एका कवितेच्या ग्रुप वर ‘साडी’ या विषयावर लिहिलेल्या चार ओळी —

सोडतेस रात्रीची मिठी, लपेटतेस नव्या दिवसासारखं अंगभर
निऱ्या व्यथा वेदनेच्या खोचून स्वतः शी
घेतेस पदर जबाबदारीचा, वर पिन शालीनतेची
निरखतेस आरशात माझ्यासकट संसाराचं रूप..
.
.
.
माझी उगाच तक्रार तुला नेसायला वेळ लागतो खूप…

— अभिजीत

वाजले की तीन तेरा..!

लॉकडाऊनच्या मुहूर्तावर, कोरोनासुरमर्दीनी लसीला वंदन करून आणि रवी जाधव, गुरु ठाकूर, अजय अतुल, बेला शेंडे, अमृता खानविलकर आदींची माफी मागून सादर करीत आहोत आमच्या आगाऊ ‘लसरंग’ चित्रपटातील लावणी खास आपल्यासाठी –

वाजले की तीन तेरा..!

कोरोनाची नवी लाट
आता आलिया भरात
रोग वय, धर्म, जात
काही पाहीना…
कदी कवा कुटं कसा
कोरोना हा होतो असा
पैसा जातो भसाभसा
जीव ऱ्हाईना…

राखली की मर्जी तुमच्या जोडीनं नं मी आले..
कुंभमेळ्यात शाही स्नानात, चिंब ओली मी झाले…

राया सोडा आता तरी,
पोलिस नाक्यानाक्यावरी
दंडुक्याचा मार भारी साजणा..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

पुतनेवानी रुप झालं, गेले होते कधी पार्लरात
खुळावले किती दीस क्वारंटाईन केलं घरात
भवताली घोळ घाली मारामारी ही केंद्र राज्याची
नको घाई बघा बाई हाय नजर कुण्या वाझ्याची

नारी गं रानी गं हाय नजर कुण्या वाझ्याची

विकली शेती , मोडली एफडी,
पैका केला गोळा
स्विगी, अनबॉक्स, झोमॅटो खाऊन
गादीवरती लोळा

आता कुठवर झाकू, पैसा कुठवर राखू
एक भिशी मला माझी राहू द्या

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!
कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली..

लाखामदी बिल आलं, झाली उधारी खात्याखात्यात
काय होळी काय दिवाळी रंग फटाका कुठं घरात
बंद सारं, उघडे बार
शेअर मार्केट बी पुढं पळंना
आडोशाच्या दुकानाचं
कसं गुपित राखू कळंना..

नारी गं रानी गं कसं गुपित राखू कळंना..

इंस्टाग्रामवर डौल माझा
फेसबुकावर तोरा
फार्मसिस्टच्या ओळखीत आणली
रेमडेसिवीर सोळा’,
हवी आहे गुटखा बिडी, तरी कळ काढा थोडी
तलफ आताची ही पुढे जाऊ द्या..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

कशापायी फिरता
मास्क न घालता
हात न धुता
दाजी आता भेटू की लस घेतल्यावरी

सीरमची आली
भारत बायोटेकची आली
आता रशियाची स्पुटनिक बी आली..

चला राहू या ना घरी,
वाजले की तीन तेरा..!

– अभिजीत दाते
(आवडल्यास नावासहित पुढे पाठवायला हरकत नाही)

मला तूच शोधीत ये ना कधी..

जुन्या सावकारी ऋणासारखा
कसा जीवना तू उणा सारखा

विसरलाच जाणार मीही उद्या
शकासारखा वा हुणासारखा

जरी सत्य आले पुरासारखे
उभा ठाकलो मी तृणासारखा

अशी कागदा नाळ तोडू नको
इथे शब्द माझा भ्रुणासारखा

मला तूच शोधीत ये ना कधी
तुझ्या शोधतो मी खुणा सारखा

— अभिजीत

पंचा आणि जन्मठेप..!

दोन ऑक्टोबरला भाषणं बघ..
अठठावीस मेला चर्चा बघ..
तीस जानेवारीला श्रद्धांजल्या बघ..
सव्वीस फेब्रुवारीला आदरांजल्या बघ..

साबरमतीला पिकनिक काढ.
अंदमानला सहल काढ.

रेडिओवर ‘वैष्णव जन तो’ ऐक
मोबाईलवर ‘जयोस्तुते’ ऐक

सत्याचे प्रयोग वाच.
सहा सोनेरी पानं पण वाच.

दांडीयात्रा आठव, मार्सेलिसची उडी आठव.

हवं तर यांच्या सत्याग्रहाची थट्टा कर.
त्यांच्या शुद्ध भाषेच्या आग्रहाची टिंगल कर.

आणि काहीच जमत नसेल तर यांना टकलावरून चिडवत, त्यांना माफीवीर म्हणून हिणवत
आयत्या स्वातंत्र्याचा उपभोग घे..!

पण कुणाच्याच वाटेवरून जायचा विचार करू नको,

कारण तुला पंचा मानवणार नाही आणि जन्मठेपही झेपणार नाही

— अभिजीत दाते

आज सोशल डिस्टन्सिंग पाळतो हरी

सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी यांची माफी मागून एक लॉकडाऊन स्पेशल विडंबन

आज सोशल डिस्टन्सिंग पाळतो हरी
राधिके, जरा अजून थांब तू घरी ॥धृ.॥

तो तिथे हवालदार वाट रोखतो
पास दाविल्याविना पुढे न सोडतो
आर्जवे करुनही मुळी न ऐकतो
सांगते अजूनही तुला परोपरी ॥१॥

सांग श्याम मंडईत काय जाहले
मास्क घातल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास लाठीमार मार लागले
एकटीच वाचशील काय तू तरी ॥२॥

तो घरीच महाभारतात रंगला
वेबमालिकांसवे खुशाल दंगला
तो पहा पुनश्च लॉकडाऊन वाढला
काम कर घरुन पण म्हणेल नोकरी ॥३॥

मूळ गीत – आज गोकुळात रंग खेळतो हरी

का रे कोरोना

(गदिमा, सुधीर फडके आणि आशाताईंची माफी मागून हे कोरोना विडंबन)  

का रे कोरोना, का रे इबोला
अपराध माझा असा काय झाला
का रे कोरोना

घरी सर्व कामे मला एकटीला
कुणी ना विचारी येई सोबतीला
होम क्वारंटाईन तू वेगळ्या दिशेला  
अपराध माझा असा काय झाला

मास्कवाचुनी मी कुठे जात नाही
सोशल डिस्टंसिंग रे हळू बोल काही
हात साबणाने घेई धुण्याला  
अपराध माझा असा काय झाला

चार मे असावा असे रोज वाटे
हेच स्वप्न यावे पहाटे पहाटे
नको पाहणे हे पुन्हा भाषणाला
अपराध माझा असा काय झाला  

अभिजीत दाते

मनात जळते आहे एक शहर..

घराकडे पोचवतो आहे का
बघ रस्ता आठवतो आहे का

दु:खी आहे बहुधा हा जोकर
थोडा जास्त हसवतो आहे का

तास मिनिट सेकंदाचा चाबुक
काळ मला राबवतो आहे का

भेटीवेळी आला हा पाउस
भेट बघू लांबवतो आहे का

भूक तिला गाते अंगाई अन्
नाईलाज निजवतो आहे का

वाट पाहते एक रात्र हल्ली
एक दिवा मालवतो आहे का

मनात जळते आहे एक शहर
मीच फिडल वाजवतो आहे का

— अभिजीत दाते

चर्चा

रोज सवाशे कोटी चर्चा
पण अंती वांझोटी चर्चा

विसर मला मुद्द्यांचा पडतो
खास तुझी हातोटी चर्चा

प्रश्न लंगडे,बहिरे उत्तर
मुकी,आंधळी, थोटी चर्चा

भागवेल का तहान माझी
बंद नळाची तोटी चर्चा

भविष्य,बापू,स्कॅंडलनंतर
मकान, कपडा, रोटी चर्चा

वणवा होऊ शकली असती
ठरली पण शेकोटी चर्चा

— अभिजीत दाते
(०८-०५-२०१८)

अशी नियती असू दे की…

अशी नियती असू दे की
बरोबर ती असू दे की

नव्याने कोरडे होऊ
नवी भरती असू दे की

व्यथेला भाव येऊ दे
तुझी चलती असू दे की

सुखाची वेगळी व्याख्या
स्वतःपुरती असू दे की

दिव्यांच्या रोषणाईतच
जुनी पणती असू दे की

ज़री मी झिंग़लो नाही
नशा कळती असू दे की

कुणी नाही तिथे पोचू
दिशा भलती असू दे की

नभाला सोडले मागे
पुढे धरती असू दे की

पुन्हा प्रेमात माझ्या ती
खबर उडती असू दे की

— अभिजीत दाते  (३०-०९-२०१९)

हरिहर – देर गए पर दुरुस्त आए..!

DSC_0032

एप्रिल २०१५ च्या वासोटा ट्रेकनंतर ट्रेकिंगशी संबंध तुटलाच. नाही म्हणायला कॅलिफोर्नियात ट्रेल केले खरे पण त्याला सह्याद्रीतल्या ट्रेकची सर नाही.सह्याद्रीत ट्रेक करताना इतिहासपुरुष आपलं बोट धरून चालवतोय असं वाटतं.त्यामुळे भारतात परतल्यावर कधी एकदा ट्रेकला जातोय असं झालं होतं. पण काही ना काही कारणाने तारीख पे तारीख होत राहिलं. अखेर गांधी जयंतीचा मुहूर्त मिळाला.ठिकाण ठरलं हरिहर उर्फ हर्षगड..!

हरिहर आपल्या त्रिकोणी माथ्याने त्र्यंबकच्या डोंगररांगेत गोंडा घाटावर नजर ठेवून दिमाखात उभा आहे. हरिहरचं वैशिष्ट्य म्हणजे कातळात जवळजवळ सत्तर अंशात कोरलेल्या साठ मीटर उंच पायऱ्या.असं म्हणतात की या पाय-यांची भुरळ ब्रिटिश अधिकारी ब्रिग्सलाही पडली आणि तोफेच्या माऱ्याने पायऱ्या उध्वस्त करण्याचा विचार त्याने बदलला. काहीसा धोकादायक पण काळजी घेतल्यास आनंद आणि थराराची अनुभूती देणारा असा हा हरिहर. इगतपुरीपासून साधारण ४८ आणि मुंबईहून सुमारे १२१ किलोमीटर.

ट्रेक ठरल्यावर कधी जायचं कसं जायचं यावर विचारमंथन सुरु झालं. आदल्या दिवशी रात्री निघायला कुणी तयार होईना. मग सकाळी लवकर निघायचं आणि पायथ्याच्या हर्षवाडीतून वर चढायचं असं ठरवलं . साधारण तासाभराची चढाई आहे. हरिहरावर निरगुडपाड्याहूनही जाता येतं. या चढाईला दोन ते अडीच तास लागतात. नितीन, त्याचा भाऊ प्रथमेश, रोहित, शैलेश, सौरभ आणि मी अशी गॅंग जमली. सागरगडाच्या ट्रेकपासून फोर व्हिलरच्या आरामदायक प्रवासाची सवय झालेले आमचे मावळे. ट्रेन,एसटी वगैरेचा प्रवास असला की पाच सहाला हजर राहाणाऱ्या मंडळींनी निघेपर्यंत सात वाजवले. नितीन, रोहित आणि मी एका गाडीत तर प्रथमेश, सौरभ आणि शैलेश एका गाडीत असे कळव्याहून निघालो. वाटेत आसनगावाजवळ नाश्ता केला आणि कसारा-विहीगाव-खोडाळा मार्गे निघालो. कसारा घाटाच्या सुरुवातीलाच एक रस्ता विहीगावला जातो. याच रस्त्यावर विहीगावचा प्रसिद्ध अशोक धबधबा आहे. याच वाटेवर पुढे वैतरणा धरणाचं बॅकवॉटर लागतं. मग तिथे थोडं फोटोसेशन केलं आणि पुढची वाट पकडली. या वाटेला पुढे घोटी वैतरणा वाट येऊन मिळते. नाशिकहून यायचं असेल तर ही वाट सोईची आहे. ही वाट पुढे त्र्यंबकला जाते. या वाटेवरून एक कच्चा रस्ता हर्षवाडीला गेला आहे. इथपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला. अकरा वाजता पोहोचलो पण बेत ठरल्याप्रमाणे पार पडत होता. हर्षवाडीचा रस्ता दगडधोंड्यानी भरलेला आहे. एका चढावर नितीनची डिझेलभक्षक कार चढली पण प्रथमेशची सीएनजी कार प्रयत्न करूनही चढेना. शेवटी इंजिनातून धूर यायला लागला. तेव्हा तो ग्रुप मागे फिरला. पुढे गेलेले आम्ही अर्धा तास वाट बघून पुन्हा मागे आलो. नेटवर्कची बोंब असल्यामुळे काय झालं ते कळवायला मार्ग नव्हता. बऱ्याच वेळाने एकदाचा फोन लागला आणि मंडळी निरगुडपाड्याला थांबली आहेत असं कळलं. मग सगळे निरगुडपाड्याला आलो आणि तिथून किल्ल्यावर जावं असं ठरलं. पोहे खाल्ले आणि किल्ल्याच्या वाटेला लागलो तेव्हा साडेबारा वाजत आले होते. आधीच एक तास उशीर,त्यात चढाईचा एक दीड तास वाढला. टाइमटेबलाचा पार बोऱ्या वाजला. पण आता एवढे आलोच आहोत तर जाऊयाच वर असा विचार केला. रोज साडेपाचला जोरदार पाऊस होतोय तेव्हा वेळेवर उतरा असा सल्ला टपरीवरच्या मामांनी दिला. तेव्हा तीन साडेतीनला परतीचा प्रवास सुरु करायचा असं नक्की करून किल्ल्याच्या वाटेला लागलो.

IMG_0936

झपाझप पावले टाकत, वाटेत भेटेल त्याला वाट विचारत निघालो. कुठे चुकलो कुणास ठाऊक,पण आपण बऱ्याच उजवीकडे आलो आहोत असं जाणवलं. एका धबधब्याच्या माथ्यावर पोचल्यावर परत वाट शोधायला सुरुवात केली. इथून दूरवर पायऱ्या दिसत होत्या पण जाण्याची वाट सापडत नव्हती. मग डावीकडे चालत निघालो आणि थोड्या वेळाने वाट सापडली. एव्हाना उन्हाने चांगलाच घाम काढला होता. मजल दरमजल करत पाय-यांपाशी येऊन पोचलो. इथे लिंबूपाणी मिळाल्यामुळे थोडी तरतरी आली. मग पाय-यांना भिडलो. या पायऱ्या गोरखगडाची आठवण करून देतात. प्रत्येक पायरीला एक खोबण आहे जी पकडून आपण वर चढू शकतो. जसजसं वर जावं तसतशी उंचीची जाणीव होऊ लागते. नवख्या ट्रेकर्स आणि उंचीची भीती असणा-यांनी जरा काळजी घ्यावी. पहिला टप्पा  पार केल्यावर दरवाजाची कमान लागते. तिथून पुढे जाण्यासाठी डोंगराच्या पोटातून रस्ता कोरला आहे. पुढे डोंगराच्या पोटातूनच वर जाण्यासाठी पायऱ्या लागतात ज्या पेठच्या कोथळीगडाची आठवण करून देतात. भर उन्हात या पायऱ्या दमछाक करतात. अर्थात माथ्यावरचा वारा आणि समोरचा नजारा हा सगळा शीण घालवून टाकतो. समोर फणी हिल आणि ब्रह्मपर्वताचा पसारा दिसतो. हा सगळा अवकाश डोळ्यात साठवून घेतला. “राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा” असं ज्या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राचं वर्णन गोविंदाग्रज करतात त्याचं हरिहर स्वरूप अनुभवलं. खालच्या पठारावरून बघितलं की हरिहरचा माथा शिवाच्या पिंडीसारखा दिसतो आणि पाय-यांचा कातळमार्ग हरीच्या कपाळावरच्या गंधासारखा शोभून दिसतो.’हरिहर’ हे नाव अगदी पटतं. अशी कलाकृती घडवणा-या निसर्गाला,त्याला आकार देणा-या कामगारांच्या, कलाकारांच्या हातांना , त्याच्यासाठी लढणा-या सैनिकांना आणि या कलाकृतीच्या सौंदर्याचा मान ठेवणा-या ब्रिग्सच्या सौंदर्यदृष्टीलाही मनोमन दाद दिली.

IMG_6582

या सगळ्यापासून दूर, अलिप्त, निर्विकार, तटस्थ घड्याळाने चारची वेळ दाखवली आणि सगळे परत वर्तमानकाळात आलो. उशीर झाल्याची जाणीव होतीच, त्यात दुरून प्रभू रामचंद्राची सेना येताना दिसू लागली. सोबत हवेतला गारवाही वाढायला लागला होता. थोडक्यात पावसाची लक्षणं होती. तेव्हा हरिहरच्या माथ्याला भोज्या करून खाली उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. पाय-यांशी येईपर्यंत टपोरे थेंब पडायला लागले. पाय-यांकडे तोंड करून उतरताना अंदाजाने पाऊल ठेवावं लागत होतं. आधीच पाठीवरच्या सॅक्स, त्यात कड्यावर दबा धरून बसलेली वानरसेना आणि हळूहळू जोर धरू लागलेला पाऊस. चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे निसरड्या झालेल्या पाय-यांवर काही अपघात होऊ नये म्हणून काळजी घेत होतो. शैलेश एकदा घसरला होता पण लगेच त्याने स्वतः ला सावरलं. हळूहळू सर्वांनी पाय-यांचा टप्पा पार केला. तोवर पाऊसही थोडा सैलावला. मग पटापट उतरायला लागलो. वाट हरवणं सापडणं चालू होतंच,पण उतरताना त्याची तितकीशी फिकीर नसते. अखेर साडेपाचच्या सुमारास पायथ्याशी पोचलो. डांबरी सडकेशी येऊन पोचतो न पोचतो तोच मुसळधार पाऊस सुरु झाला. मागे वळून पाहिलं तर हरिहरचा माथा दिसतच नव्हता. पार पावसाळी ढगात हरवून गेला होता. उतरायला थोडा उशीर केला असता तर पावसात अडकून पडलो असतो. पावसाची काहीच तयारी सोबत नेली नव्हती. वेळेवर निघालो हे नशीब. अर्थात हरिहरचा माथा पूर्ण बघता आला नाही याची रुखरुख होतीच. असो. सर सलामत तो ट्रेक पचास.

DSC_0036

अर्धा तास कोसळल्यावर पावसाने उसंत घेतली. एव्हाना पावसात वाट काढत दुपारची टपरी गाठली होती. मग चहा घेऊन ताजेतवाने झालो आणि लगेच गाड्या मुंबईच्या दिशेने दामटल्या. येताना घाटात ट्रॅफिक वगैरे लागलं नाही. साडेदहाला कळवा स्टेशन आणि अकराला घर. ट्रेकने थकल्याभागल्या देहाचं घराने स्वागत केलं. आता काही दिवस तरी चर्चेला एक नवीन विषय.. रुटीनला कंटाळलेल्या जीवाला एक बदल.. आठवणींच्या संचितात आणखी एक भर.. मला लिहायला एक नवा हुरूप..

त्या रात्री झोपायच्या आधीच मी लेखाचं शीर्षक ठरवून टाकलं होतं – “हरिहर” – देर गए पर दुरुस्त आए..!

—  अभिजीत

529274f1-f36a-4346-86d7-e14bf9b8e96b

(डावीकडून रोहित, शैलेश, सौरभ, प्रथमेश, मी आणि नितीन)