एका साच्यामधले आपण
त्याच्या नाट्यामधले आपण
निवडुंगाची थट्टा करतो
गुलाब काट्यामधले आपण
पबजीमध्ये हरवुन गेलो
आट्यापाट्यामधले आपण
सावज कोणी शिकारी कुणी
केवळ भात्यामधले आपण
जोवर भेटत नाही नारद
तोवर वाल्यामधले आपण
गतकाळाचे मिरवत ओझे
जुनाट वाड्यामधले आपण
सुपातल्यांनो आज हसूया
परवा जात्यामधले आपण
कठीण पेपर आहे दुनिया
एका वाक्यामधले आपण
— अभिजीत दाते