Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

पूर्वी

फार नव्हता फरक पूर्वी
यायची पण सणक पूर्वी

शोषले कुठल्या जळूने
रक्त होते भडक पूर्वी

वाढले अंतर कशाने
हीच होती सडक पूर्वी

लाट होऊन यायची ती
व्हायचो मी खडक पूर्वी

औपचारिक होत गेली
भेट होती तडक पूर्वी

राहिले आहे पुसटसे
कोरलेले ठळक पूर्वी

मागणी होती सुखाला
मात्र नव्हती चटक पूर्वी

हरवला उत्सव कुठे तो
ज्यात होते टिळक पूर्वी

—  अभिजीत दाते
(लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाच्या २०१५ दिवाळी अंकात प्रकाशित)

 

वयासवे..

वयासवे म्हणतात मला हो निबर वगैरे तू
गाठशील तेव्हाच सुखाचे शिखर वगैरे तू

गुलाब चाफा शेवंती मोगरा माळताना
नकोस विसरु कोप-यातली तगर वगैरे तू

प्रतिष्ठापना तशी कधीची केली आहे मी
सवडीने पण बघ ह्दयाचे मखर वगैरे तू

आठवणींच्या जत्रेजागी मॉल इमोशनचे
केले मित्रा गाव मनाचे शहर वगैरे तू

बांधा, जिवणी, नजर, लाजणे पुरे जीवघेणे
खळी गालची त्यावर म्हणजे कहर वगैरे तू

शाली, स्वेटर, ब्लॅंकेटच मी पांघरतो अजुनी
ख-या उबेला दे ना आई पदर वगैरे तू

कातळ होउन रायगडाचा वीज उरावर घे
ताजमहाली हो वा संगमरवर वगैरे तू

— अभिजीत दाते

नमस्कार..

गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’

प्रथमच आधी प्रसंग ठरवून आणि आधी बांधलेल्या चालीवर लिहायचा प्रयत्न केलाय.
आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर नक्की शेअर करा..

अभिजीत

काय फ़रक पडतो…

नसेल कोणी तुझ्याबरोबर, काय फ़रक पडतो
कोणी नंतर कुणी अगोदर, काय फ़रक पडतो

तुझ्या रथाचा लगाम त्याच्या हाती आहे ना
उभे ठाकले समोर शंभर, काय फ़रक पडतो

वस्त्राने नग्नता मनाची कुठे झाकते रे
तुझे भरजरी माझे लक्तर, काय फ़रक पडतो

फुले मिळावी म्हणून केली बरीच धडपड पण
नशिबामध्ये होते अत्तर, काय फ़रक पडतो

काळा, गोरा, कुरुप, सावळा तुमच्या लेखी मी
आईच्या नजरेने सुंदर काय फ़रक पडतो

क्षणाक्षणाला जगण्यावरती सवाल करती ते
मग मी देतो इतके उत्तर, काय फ़रक पडतो

— अभिजीत दाते

राजे..

पुन्हा एकदा ती उठाठेव राजे
पुन्हा तेच हर हर महादेव राजे

जरी थाटमाटात दोन्ही जयंत्या
उद्याला कुठे आजचा चेव राजे

कुठे लुप्त झालेत बाजी वगैरे
कसे खोपड्यांचे इथे पेव राजे

लढूनी जिथे गाजला सिंह तुमचा
तिथे गाजते आमची ‘रेव’ राजे

कुठे शक्य झाले समजणे तुम्हाला
म्हणोनीच केले तुम्हा देव राजे

— अभिजीत दाते (१९/०३/२०१४ शिवजयंती)

आणखी..

नकोच माझा विषय आणखी
जरा टळू दे प्रलय आणखी

विसर तुझा पडला असता पण
जिवास नव्हती सवय आणखी

महाल नाही घरटे आहे
कुणास देउ ह्रदय आणखी

हवीहवीशी हार मिळेना
नकोनकोसे विजय आणखी

तुझ्यासवे नाव जोडलेले
हवे कोणते वलय आणखी

सजाच होती एक प्रकारे
दिलेस जेव्हा अभय आणखी

— अभिजीत

रिमझिम..

बाहेर सुखाचा पाऊस कोसळत असताना,
मी मात्र एकटाच उभा होतो आडोशाला आपल्याच कोषात..

त्याच वाटेने जाणाऱ्या दुःखाने हाक मारली मला,
आणि घेतलं आपल्यासोबत एकटेपणाच्या छत्रीत;.
घेत काळजी मी भिजणार नाही याची .

एका वळणावर आली अचानक तुझ्या सोबतीची झुळूक;
उडून गेली अलगद एकटेपणाची छत्री वाऱ्यावर;
आला नात्याला सुवास मृद्गंधाचा..

आता भिजत चाललो आहोत दोघेही
दूर मनाच्या क्षितिजावर दिसणाऱ्या समाधानाच्या इंद्रधनूच्या दिशेने.

बाहेरचा पाऊस थांबलाय कधीच;
आणि अंतरात सुरु आहे रिमझिम… रिमझिम…!

अभिजीत दाते