Posted by: अभिजीत दाते | मार्च 27, 2009

पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा — marathigazal.com

मराठी गझल  सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे  आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तेव्हा गझल चाहत्यांनी जरूर भेट देऊन गझलांचा आस्वाद घ्यावा.

दर आठवड्याला आधीचा भाग जाऊन नविन भाग ऐकायला मिळेल तेव्हा दर आठवड्याला भेट द्यायची विसरू नका… :)

Posted by: अभिजीत दाते | मार्च 16, 2009

फैसला

तुझ्या हृदयातल्या कोर्टात माझा फैसला होता.
पुरेशी साक्षही होती; पुरावा चांगला होता.

कसा पाऊसही आला पुढे धावून मदतीला.
कदचित आसवांमधल्या मिठाला जागला होता.

तुझ्या जुलमावरी त्यांना पुरेशा वाटल्या शंका.
कुणी जखमांवरी माझ्या भरवसा ठेवला होता ?

कशाला जामिनाच्या अन बचावाच्या करु वार्ता
तुझ्यावाचून जगण्याचा कुठे मज हौसला होता.

कुणावर आळ घेऊ अन कुणाला आळवू आता ?
तुझ्यावर जीव “तो” सुद्धा जडवुनी बैसला होता.

–  अभिजीत दाते

Posted by: अभिजीत दाते | फेब्रुवारी 17, 2009

मी तरी देऊ किती आवाज आता..!

मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येइना अंदाज आता..!

हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!

यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!

प्रेम जे मुदलात होते, माफ केले
राहिले पण आठवांचे व्याज आता..!

पाहता तुज छाटले बाहूच दिसले.
ताज, मी पाहू कुठे मुमताज आता..!

– अभिजीत दाते

Posted by: अभिजीत दाते | फेब्रुवारी 12, 2009

बरेच काही..!

आठवशिल तर आठवेलसे बरेच काही
अजुनी आहे राहिले तसे बरेच काही

मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला,
ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही

क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला.
निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही

तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो
घडले आहे जागवेलसे बरेच काही

जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो
श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही

आज किनारी उरलेले वेचण्यास आलो,
वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..!

– अभिजीत दाते

Posted by: अभिजीत दाते | जानेवारी 22, 2009

जत्रा..!

अविनाश ओगले यांच्या “जत्रा” या सुंदर गझलेचं हे विडंबन.

 

(“वधूवर मेळावा” नावाच्या जत्रेला)
उपवर वधू वरांच्या करतात येथ जत्रा.
दोनास चार करण्या भरतात येथ जत्रा.

नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या,
वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा.

झाले ठिकाण जत्रा चेहरे न्याहाळण्याचे.
चिरडून सर्व हृदये सरतात येथ जत्रा.

वरबाप ना दयाळू हुंड्यास का कठोर,
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा.

आता पुढील वर्षी पुन्हा नवीन आशा.
स्वर्गातल्याच गाठी स्मरतात येथ जत्रा ?

–  अभिजीत दाते

« Newer Posts - जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग