स्वतःची ओळख स्वतःलाच पटत नाही तेव्हा…
मी विचारतो आरशातल्या प्रतिबिंबालाच माझा परिचय.

आरसाही म्हणतो कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय खरं..अनेक वर्षांपूर्वी.
पण आता कसलातरी थर चढल्यासारखा वाटतोय चेहर्‍यावर…

मी खरवडून काढू पाहतो पुन्हा पुन्हा चेहर्‍यावरचा संधीसाधूपणाचा मुखवटा, स्वार्थाची पुटं,
आणि उगाचच होतो रक्तबंबाळ..!

मग आरसा हसून म्हणतो,
“तू स्वतःलाच बघत आलास माझ्यात वर्षानुवर्ष, बुडून राहिलास आपल्याच कैफ़ात..

आता चेहरा खरवडणं जमत नसेल तर निदान माझ्या अंगावरचा वर्ख तरी खरवडून टाक.

मग मीही होईन पारदर्शी,
माझ्यातून आरपार जग दिसेल तुला,

आणि त्या जगातल्याच कुणाच्यातरी डोळ्यात तुला दिसेल तुझा खराखुरा चेहरा..!”

 –  अभिजीत दाते

Posted by: अभिजीत दाते | मे 18, 2009

ती केवळ सोबत होती..

मायबोली गझल कार्यशाळा – २ मध्ये लिहिलेली ही गझल.. 

ती केवळ सोबत होती, सहवास म्हणालो नाही
गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही

तू वागलीस तो सारा व्यवहार जगाचा होता
अपराध कधीही माझा केलास म्हणालो नाही

राखेत निखार्‍यासम मी, धग आहे अजून बाकी
तव हाती आहे जगणे, वार्‍यास म्हणालो नाही

ऐकतो इथे भरलेला आहे बाजार व्यथेचा
मी विकेन तरिही माझ्या दुःखास म्हणालो नाही

खांद्यावर या विश्वाच्या परिघास कसे पेलू मी ?
ज्या रेषेवरती जगलो तिज व्यास म्हणालो नाही

श्वासांच्या घेउन कुबड्या आहेत सचेतन सारे
मी जीवन ऐसे नुसत्या जगण्यास म्हणालो नाही

–  अभिजीत दाते

Posted by: अभिजीत दाते | एप्रिल 28, 2009

कैफात चूक झाली..!

कैफात चूक झाली, डोळे भरून आले.
“सैतान” ती म्हणाली, डोळे भरून आले.

टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या,
रचला कलंक भाली, डोळे भरून आले.

निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या
कल्लोळ भोवताली, डोळे भरून आले.

वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा.
मृत्यूच एक वाली, डोळे भरून आले.

तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन.
खपली पुन्हा निघाली, डोळे भरून आले.

– अभिजीत दाते

Posted by: अभिजीत दाते | एप्रिल 3, 2009

भारनियमन..!

(संदिप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांची क्षमा मागून)

एसी असता फ्रीज असता गरम होऊ लागले.
जाहले इतुकेच होते भारनियमन वाढले.

मीटरावीण सदनी त्याच्या बल्ब कैसा पेटला.
आकड्याने चोरताना काल त्याला पाहिले.

एवढे का घोळ करिसी वीज नियामक मंडळा,
तू दिलेले बिल खिशाला फार वाटू लागले.

वीज जाता बंद टीव्ही संगणकही पांगळा.
पोर ते क्रिडांगणावर खेळ मांडू लागले.

लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे.
मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले.

भर पहाटे अन दुपारी वीज काढून टाकली.
राहती इन्व्हर्टरावर, सुख तयांना लाभले.

– अभिजीत दाते

मूळ गीत – मेघ नसता वीज नसता
कवी – संदिप खरे

Posted by: अभिजीत दाते | मार्च 27, 2009

ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण..!

gudiगुढीपाडवा आणि नववर्षानिमित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

या पाडव्याला ब्लॉगला दोन वर्ष पूर्ण होतायत. वाचणार्‍यांचा उमेद वाढवणारा प्रतिसाद आणि स्वच्छंदी लेखनात मिळणारा निखळ आनंद यामुळे माझ्या आरंभशूरतेला हा ब्लॉग अपवाद ठरला असं म्हणावं लागेल. हे श्रेय आणि जितकं अधुनमधुन डोकं वर काढणार्‍या लेखकाचं, तितकंच वाचकांचंही.

अशीच या ब्लॉगची वाटचाल चालू राहो इतकीच सरस्वतीचरणी प्रार्थना..!

“मी कुठे म्हटलं “माझी” कविता आहे !
तोच एक लिहीता आणि लिहविता आहे.
शब्द, छंद त्याच्याच लेखणीतूनच उतरून येतात,
रिताच मी अन कागदसुद्धा रिताच आहे..!

आपलाच,

अभिजीत

« Newer Posts - जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग