१३ जुलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या बाँबस्फोटावर सुचलेल्या या ओळी…
चेहर्यावरती धैर्य मात्र आतून सतत कण्हायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?
दुःख, वेदना मला कशाला, माझं काहीच गेलं नाही
बांधव वगैरे प्रतिज्ञेपुरतं, माझं कुणीच मेलं नाही
क्षणभर गहिवर आणून नंतर शीला, मुन्नी गुणगुणायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?
अप्रेझल, विंडो सीट, फेसबुक, डेली सोप एवढाच आमचा कोष असतो
बाकी सरकार, समाज नाहीतर आपल्या बॅडलकचा दोष असतो
लालबागच्या राजाच्या रांगेत तासन् तास शिणायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?
गेले ते सुटले खरोखर, इतरांचं जगणं टळत नाही
कुत्र्याच्या मौतीसारखं मरणं तरी आम्हाला छळत नाही
आपलं थडगं आपल्या हाती आणखी किती खणायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?
फणा असुनसुद्धा आमची गांडूळ जात असली पाहिजे
कारण म्हणे सेक्युलर छबी उभ्या जगाला दिसली पाहिजे
भाबडेपणी महासत्तेचं स्वप्न आम्ही विणायचं
असल्या वागण्यालाच का सांगा ‘मुंबई स्पिरिट’ म्हणायचं ?
– अभिजीत दाते

Kavita avadli
MUMBAI SPIRIT ha shabdch muli sarkarne swatachi laaj zaknyasathi
kelele sanshodhan ahe
Ganesh Godase
kavita khup manali bhavali.