आज थोडेसे चुकीचे वागण्याचा बेत आहे.
आज तुजला एकट्याने गाठण्याचा बेत आहे.
भेटते मजला पुन्हा ती त्याच त्या वळणावरी का
मज कळेना योग हा की गुंतण्याचा बेत आहे.
अंगणी माझ्या कशाला कवडशांनी फेर धरला
ही तुझी चाहूल की हा चांदण्याचा बेत आहे.
टाकली पेटीत जेव्हा मी जराशी जास्त नाणी
देव वदला, आज भलते मागण्याचा बेत आहे.
एकदा भेटून स्वप्नी एकमेका धीर देऊ
की तुझा ढाळीत अश्रू जागण्याचा बेत आहे.
रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही
आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे.
– अभिजीत दाते


सुंदरच!
शेवटचे दोन तर क्या बात है!!
पुलेशु
By: आल्हाद alias Alhad on जुलै 5, 2009
at 4:35 pm
रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही
आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे.
– अभिजीत दाते
Apratim………….. dusare shabd nahit
By: SUJIT on जुलै 21, 2009
at 10:40 सकाळी