तुमच्या देशी श्वासही आता दुष्कर बापू.
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?
काट्यांतुनही गुलाब वेचा, तुम्ही म्हणता
व्यक्ती नाही, वृत्ती ठेचा, तुम्ही म्हणता
पण ते नाहीत मानव केवळ फत्तर बापू..!
तुम्हास केवळ नोटेवरती स्मरती सारे.
तुमची नावे घेऊन राडे करती सारे.
नाही तुम्ही, नशीब हे बलवत्तर बापू..!
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?
नव्या युगी या कसे चालतील जुने दाखले.
अहिंसक आम्ही आहो दुर्बल जगा वाटले.
मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..!
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?
अस्तित्वाचे अग्नीकुंड आहुती मागते.
क्रांती आणि स्वातंत्र्यास्तव रक्त लागते.
कुठवर पुरेल गांधीगिरीचे अत्तर बापू ?
आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ?
प्राणही गेला तरी अता बेहत्तर बापू.
आम्हीच आता शोधू आमचे उत्तर बापू..!
– अभिजीत दाते

Great words, precisely accurate. really really reflecting the sentiment. I request you to publish it in leading newspaper.
Great keep writing !#
Amazing!
Nivval apratim.