Posted by: अभिजीत दाते | ऑगस्ट 29, 2008

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी..!

(विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने..)

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!

राजा वदला कशी बिनसली “न्युक्लिअर डील” ची भाषा.
माझ्या नशीबासवे खेळती या “पंज्याच्या” रेषा.
त्या राणीच्या डोळा पण ना दाटून आले पाणी ..! ..१

तिला विचारी राजा, खासदार कसे फोडावे ?
का डाव्यांनी पाठिंब्याचे हात असे सोडावे ?
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी..! ..२

राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा.
उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा.
अन राजाला लगेच पटली “मायाजाल” निशाणी..! ..३

त्या राणीने मिटळे डोळे “क्रॉस व्होटिंग” होताना.
त्या राजाचा भाव वाढला गीत तिचे गाताना.
विरोधकांच्या मुखात उरली “सिंग इज किंग” विराणी..! ..४

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!

–  अभिजीत दाते


प्रतिसाद

  1. Ekdam Mast

    Date farch chan

  2. कविता खूप आवडली

  3. nice one.


Leave a response

Your response:

प्रवर्ग