Posted by: अभिजीत दाते | जून 26, 2008

काळजी…

शेतकरी चढतो फासावर नको काळजी !
आपणास मिळते ना भाकर, नको काळजी !

पेढ्या, बँका बुडती येथे, बुडेनात का.
स्विस बॅकेतुन ठेवा लॉकर, नको काळजी !

पाच सनांनी भरेल येथे खुर्चिस्वयंवर,
बिज्वर तरिही ठराल उपवर, नको काळजी !

पचतो आहे तोवर पैसा खात रहावे.
होऊन झाले काय आजवर, नको काळजी !

याने केला दावा, त्याने केस ठोकली,
न्यायनिवाडा नाही सत्वर, नको काळजी !

शिमगा येथे रोजच पेटत असते होळी.
पोळी घ्यावी भाजून त्यावर, नको काळजी !

भावभावना अश्रू मुबलक ग्लिसरिनयोगे,
संधीपुरता यावा गहिवर, नको काळजी !

प्रहार खोटा यांचा, त्यांचे रडणे खोटे.
एक तमाशा सारे संगर, नको काळजी !

गुणवत्तेहून जेथे ठरते संख्या मोठी,
पाचच ते अन आम्ही शंभर, नको काळजी !

– अभिजीत दाते


Leave a response

Your response:

प्रवर्ग