बाकी आहे…! (गजल)
February 20, 2008 by Abhijeet
सरला प्याला झिंग जराशी बाकी आहे.
अजून थोडे दुःख उराशी बाकी आहे.
दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे.
माझे ‘मी’पण खोल तळाशी बाकी आहे.
तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावणधारा,
हिशोब माझा जुना उन्हाशी बाकी आहे.
नैवेद्याचा केला त्यांनी गाजावाजा,
तेच जेवले; देव उपाशी बाकी आहे.
हवी नको ती सुखे तुझ्यास्तव मागून झाली.
अता मागणे काय नभाशी बाकी आहे ?
नको भास्करा किरणांसाठी तुझी मुजोरी,
दीप येथला स्वयंप्रकाशी बाकी आहे..!
– अभिजीत दाते
excellent !!!!!!!!!!
keep it up.
Regards
Girish
खतरी………..
मस्तच……….
असचं चालू द्या………
khupch chan…manala saprsh karnari gazal..