बंद होते..(गजल)
December 27, 2007 by Abhijeet
बरसणे येथे घनांचे बंद होते .
पावसाळे आसवांचे बंद होते .
मी जिथे गेलो फुले वेचावयाला,
उमलणे तेथे कळ्यांचे बंद होते .
धूर का आश्वासनांचा आज नाही ?
कारखाने भाषणांचे बंद होते .
घातला हैदोस होता दानवांनी
नेत्र भोळ्या शंकराचे बंद होते .
तू नको दैवास आता दोष देऊ ,
ओठ त्यावेळी कुणाचे बंद होते ?
दाटले होते जरी डोळ्यात पाणी
दार माझ्या पापण्यांचे बंद होते .
मोडुनी पडल्या किती मानात माना ,
वाकणे त्यांच्या कण्याचे बंद होते .
आज यांच्या “वागण्याने” संप आहे ,
काल त्यांच्या “मागण्यांचे” बंद होते..!
– अभिजीत दाते