देवळात… (गजल)
October 30, 2007 by Abhijeet
थांबले पाऊल आता..
गाठले राऊळ आता..
स्वप्न सारे सत्य झाले
मन परी व्याकूळ आता..
का स्वतःच्या वेदनेतच
राहतो मश्गुल आता..
वाळवंटी थेंब नाही
मृगजळाची भूल आता..
पेलवेना साहवेना
ही व्यथेची झूल आता..
आयता मी नाग होतो
सोडले वारूळ आता..
अन तुझ्या छायेत आलो
दे तुझी चाहूल आता..
लावितो थोडी कपाळी
पावलांची धूळ आता..
होऊ दे निर्माल्य चरणी
या तनूचे फ़ूल आता..!
– अभिजीत दाते