Posted by: अभिजीत दाते | ऑक्टोबर 4, 2007

माझ्यापाशी..!

शब्द भिजलेले तुझ्या अधराशी
बोल काही माझ्यासवे, थांब ना जराशी..!

खिडकीशी घुटमळे, मन सांजवारा
सळसळ पडद्याची कानी ये जराशी..!

निःशब्दाची लय वाहे जीवघेणी
ओलेती पापणी लवते डोळ्याशी..!

ओंजळीत तुझा शब्द शब्द घ्यावा
आणि निखळावा ताराही आकाशी..!

हात चांदण्याचे तुझे हाती यावे
हळुवार व्हावे स्पर्श मोरपिशी..!

त्या एका क्षणात आयुष्य सरावे
आणि जन्मा यावे पुन्हा तुझ्या देशी..!

थांब स्वप्न माझे सरू दे एवढे
सुरू होती पुढे दुनियेच्या वेशी..!

तिथे नियतीचा गुंतवेल धागा
खेळवेल दोघां जग दरवेशी..!

काय देऊ तुला, कवितेवाचून
तेच एक धन, आहे माझ्यापाशी..!

                    
                         –    अभिजीत  दाते


प्रतिसाद

  1. खूपच छान आहे कविता आवडली. :-)
    -विद्या.


Leave a response

Your response:

प्रवर्ग