तिला सांगून टाकीन म्हणतो, पण धाडस होतच नाही..!
मग मनात राहते सारे, तिजपर्यंत पोचत नाही..!
बेचैन एकटा भिजतो
अन तसाच ओला थिजतो
जागेपणी पाहतो स्वप्ने
स्वप्नात तेवढा निजतो
पण पहाट होण्याआधीच ते सरते थांबत नाही..!
मग मनात राहते सारे, तिजपर्यंत पोचत नाही..!
ती भेटीस जेव्हा येते
कायम घाईतच असते
मी हिरमुसला होताना
ती खळीदारशी हसते
पण प्रीती तरीही माझी तिजवरची आटत नाही..!
मग मनात राहते सारे, तिजपर्यंत पोचत नाही..!
मी करतो लाख बहाणे
पण करते दैव उताणे
कसले नशिबाचे फ़ासे
तोकडीच आमची दाने
ही कसली साडेसाती, ज्योतिषास उमगत नाही..!
मग मनात राहते सारे, तिजपर्यंत पोचत नाही..!
ती होईल कुण्या दुजाची
मग दैना आयुष्याची
या जन्माचे तर सोडा
अडचण साता जन्मांची
ती आठव्या जन्मीसुद्धा मज मिळेल वाटत नाही..!
मग मनात राहते सारे, तिजपर्यंत पोचत नाही..!
– अभिजीत दाते

sahi lihili ahes. jamun geliye. me hyach practicality baddal bolat asto nehami.
this is life……the reality. swapna nai satyatali hich tar simaresh ahe yaar.
i simply like the way u have expressed my life!!!
~Bandu
By: me ek bandu on ऑक्टोबर 4, 2007
at 1:38 pm