लागायाचा कसा कुणाला तुझ्या मनाचा थांग
मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..!
नको बहाणे अजुन राणी
सांग एकदा हळूच कानी
चंद्र बहरला, फ़ुलून आली
रात्र साजणी , दाही दिशांनी
खुणावते तुजला काही नक्षत्रांची रांग..!
मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..!
कुंद हवांनी धुंद किनारे
नकळत अपुल्या जाणून सारे
कळले बघ या रानफ़ुलांना
कळले पण का तुला इशारे !
प्रीतीच्या वाटेवर शब्दांचे तोरण बांध..!
मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..!
निःशब्दातून जे उलगडते
शब्दातून ते का ना घडते ?
तुझ्या मनीही आहे जर ते
ओठावर का येऊन अडते !
स्पर्शात रोमांच तुझ्या अन नजरेतून आव्हान..!
मी आहे फ़क्त तुझी मला एकदा सांग..!
– अभिजीत दाते

